जबलपूर : मध्य प्रदेश राज्यातील इंदूरनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर. लोकसंख्या उपनगरांसह ५,३४,८४५ (१९७१). मुंबई–अलाहाबाद–कलकत्ता व जबलपूर–गोंदिया या लोहमार्गावरील हे प्रस्थानक नागपूरच्या उत्तर ईशान्येस सडकेने २४० किमी. आहे. शहराजवळच नर्मदेवरील महत्त्वाचा पूल आहे. हे नागरी–लष्करी महत्त्वाचे शहर खडकाळ द्रोणीत वसलेले असून भोवती टेकड्या व मोठाले ग्रॅनाइटी धोंडे आहेत. अशाच एका धोंड्यावर पूर्वीच्या एका गोंड राजाचा किल्लेवजा ‘मदनमहाल’ असून जवळच चौसष्ट योगिनींचे मदनपूर मंदिर आहे. १७८१ मध्ये मराठ्यांनी मंडला घेतल्यावर येथे आपले जावळीपाटण हे मुख्य ठाणे ठेवले होते. ब्रिटिश अमदानीत येथे जिल्हाधिकारी, विभाग आयुक्त, वनसंरक्षण अधिकारी इत्यादींच्या कचेऱ्या, मध्य प्रदेशाचे हायकोर्ट, कारागृह इ. असल्यामुळे याचे महत्त्व वाढले. समुद्रसपाटीपासून ३९७ मी. उंचीवर असल्यामुळे त्या भागात जबलपूरची हवा तुलनेने थंडच आहे. आजूबाजूंच्या प्रदेशातील गहू, तेलबिया, तांदूळ, डाळी इत्यादींचीही बाजारपेठ  असून तेल, पीठ, लाकूड, कापड वगैरेंच्या गिरण्या, मृत्तिकाशिल्प, आसवनी, बर्फ, विडी, काच, हातमाग, अभियांत्रिकी इत्यादींचे कारखाने आहेत. तसेच मनोरुग्णालय, मिशनरी आणि त्यांची प्रार्थनामंदिरे, अनाथालय, पूर्वी ठगांच्या बंदोबस्तानंतर त्यांच्यासाठी काढलेल्या उद्योग शाळेचे रूपांतर झालेली मुलांची सुधार-शाळा, विद्यापीठ व त्याला संलग्न महाविद्यालये आहेत. १९०५ नंतर निघालेला अवजड वाहनांचा कारखाना, सेनासामग्रीचा कारखाना, सैनिकी दुग्धालय इत्यादींमुळे जबलपूरला नागरी, सैनिकी, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक व सांस्कृतिक महत्त्व आहे. जबलपूरमध्ये प्रशस्त रस्ते व उद्याने असून भाषा मुख्यतः हिंदी आहे. साक्षरतेचे प्रमाण ५६% आहे. जबलपूरच्या उत्तरेस स्लेट, हेमाटाइट, लोह, मँगॅनीज, शिसे, तांबे, विटा, भांडी, काच इत्यादींस उपयुक्त माती इ. खनिजेही सापडतात. येथून सु. २० किमी. भेडाघाट ही नर्मदेची सुप्रसिद्ध संगमरवरी सु. ३०–३२ मी. उंचीची खडकांतील अद्‌भुतरम्य घळई व तिच्या अग्रभागी ‘धुवांघार’ हा नयनमनोहर धबधबा आहे.

भेडाघाटची संगमरवरी घळई, जबलपूर.

कुमठेकर, ज. ब.