रियाद शहरातील एक दृश्यरियाद: सौदी अरेबियाची राजधानी तसेच देशातील नेज्द विभागाचे मुख्य ठिकाणी. लोकसंख्या १२,५०,००० (१९८०). देशाच्या मध्यवर्ती, पठारी भागात सस. पासून ५२० मी. उंचीवर एका मरूद्यानाजवळ रियाद वसले आहे. हे इराणच्या आखातापासून पश्चिमेस ३८६ किमी. अंतरावर आहे. १८२४ मध्ये सौद राजघराण्याची राजधानी म्हणून रियादची निवड करण्यात आली व तो दर्जा १८८१ पर्यंतच कायम राहिला. १८८१ पासून हाइलच्या रशीद घराण्याने नेज्दवरील आपला प्रभाव वाढविला. १९०२ मध्ये इब्नसौंदने आपल्या घराण्याचे व राज्याचे नेतृत्व परत मिळवले आणि अरेबियाची राजधानी म्हणून रियादची निवड केली. सौदी अरेबियाच्या स्थापनेनंतर (१९३२) देशाची राजधानी म्हणून रियादचीच निवड करण्यात आली. 

पूर्वी शहराभोवती तटबंदी होती. १९३० पासून येथे मोठ्या प्रमाणावर खनिज तेलाचे साठे सापडत गेले तसेच शहराजवळ भूमिगत जलसाठे मोठ्या प्रमाणात सापडल्यामुळे पाण्याचा तुटवडा कमी झाला.परिणामतः शहराचा उत्तरोत्तर विकास होत गेला. जुन्या शहराच्या ठिकाणी आधुनिक सुंदर इमारती, कार्यालये, उत्तम रस्ते, आधुनिक हॉटेले, रुग्णालये, शाळा, सुंदर उद्याने इ. सुविधांनी युक्त अशा नवीन शहराची निर्मिती झाली. १९५० पासून तर तटबंदीच्या बाहेरही शहर बरेच विस्तारत गेले. रियाद हे देशातील प्रमुख व्यापारी, शैक्षणिक व वाहतुकीचे केंद्र आहे. सिमेंट निर्मिची व खनिज तेल शुद्धीकरण हे प्रमुख उद्योग शहरात चालतात. लोहमार्ग व महामार्ग यांनी हे किनाऱ्याशी जोडले असून आधुनिक पद्धतीचा विमान तळही तेथे आहे. दक्षिण इराण, इराणाचे आखात, कॉटार व संयुक्त अरब अमीर राजयांकडून मक्केकडे जाणाऱ्या मार्गावर रियाद असल्यामुळे मुस्लिम यात्रेकरूंची येथे नेहमी वर्दळ असते. देशातील पहिल्या दोन दूरचित्रवाणी केंद्रांपैकी येथे एक केंद्र (स्था. १९६५) आहे. रियाद विद्यापीठ (स्था. १९५७) हे देशातील सर्वांत मोठे विद्यापीठ शहरात असून येथे अक तांत्रिक शिक्षण संस्था तसेच राष्ट्रीय पुरातत्त्व विद्याविषयक संग्रहालयही आहे. येथे घोडे आणि उंट यांच्या शर्यतीचे मैदान आहे. पूर्वी येथे मुख्यतः वहाबीमुस्लिमांची वस्ती सर्वाधिक होती. आज मात्र सर्वदेशीय लोक आढळतात. 

चौधरी, वसंत