स्वात : पाकिस्तानच्या खैबर-पखतुन्ख्वा ( वायव्य सरहद्द ) प्रांतातील एक प्रमुख नदी. लांबी सु. ३२० किमी. पूर्वी तिला सुवास्तू असे संबोधले जाई. हिंदुकुश पर्वतश्रेणीत उगम पावणारे गाब्राल आणि उशू हे या नदीचे शीर्षप्रवाह आहेत. या दोन शीर्षप्रवाहांच्या कलाम येथील संगमापासूनचा पुढील संयुक्त प्रवाह स्वात या नावाने ओळखला जातो. कलामपासून सु. ११० किमी. दक्षिणेस वाहत गेल्यानंतर मंगलाउर येथून काही अंतर ती नैर्ऋत्येस आणि त्यानंतर पंजकोरा ही उपनदी मिळेपर्यंतचे सु. ३२ किमी. अंतर पश्चिमेस वाहते. स्वात-पंजकोरा संगमानंतर ती प्रथम नैर्ऋत्येस व त्यानंतर आग्नेयीस वहात जाऊन पेशावर खोर्‍यात येते. पेशावरच्या मैदानात अनेक फाट्यांनी ती आग्नेयीस वहात जाऊन निसट्टा येथे काबूल नदीला मिळते. काबूल नदी पुढे अटकजवळ सिंधू नदीला मिळते. वरच्या टप्प्यात स्वात नदी अरुंद घळईतून अतिशय वेगाने वाहते.

स्वात नदीला हिमनद्या आणि वितळणारे बर्फ यांपासून पाणीपुरवठा होत असल्याने उन्हाळ्यात तिला भरपूर पाणी असते मात्र सप्टेंबरच्या मध्यापासून ते हिवाळ्याच्या मध्यापर्यंत नदीतील पाण्याचे प्रमाण कमी असते. पेशावर खोर्‍याच्या दृष्टीने ही नदी विशेष महत्त्वाची ठरली आहे. या नदीपासून अपर स्वात व लोअर स्वात असे दोन कालवे अनुक्रमे मालाकंद व अबझाईपासून काढले असून, त्यांद्वारे सु. ६५,००० हेटर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. त्यावर मुख्यत: ऊस व गहू ही पिके घेतली जातात. नदीच्या कालव्यांवर दोन जलविद्युत् निर्मितीप्रकल्प उभारण्यात आले असून, त्यांपासून निर्माण होणारी वीज स्थानिक प्रदेशाला पुरविली जाते. नदीवरील आयूब पूल प्रेक्षणीय आहे. स्वातच्या खोर्‍यात काही पुरातत्त्वीय दृष्टीने महत्त्वाची स्थळे आहेत. आल्हाददायक हवामान आणि विलोभनीय सृष्टिसौंदर्य यांमुळे स्वात खोरे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनले आहे.

निगडे, रेखा