नोआखाली : (सुधाराम). बांगला देशातील याच नावाच्या जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र व एक लहानसे बंदर. लोकसंख्या १९,८७४ (१९६१). हे डाक्क्याच्या आग्नेयीस सु. १३६ किमी.वर आणि समुद्रापासून १६ किमी. आत मेघना नदीमुखखाडीवर वसले आहे. सुधाराम मजुमदार यांच्या येथील वास्तव्यावरून या शहराला सुधाराम हे नाव पडले असे म्हणतात. परंपरागत इस्लामी संस्कृतीचे केंद्र आणि हिंदु–मुसलमान संघर्षाचे ठिकाण म्हणून हे स्थळ फाळणीपूर्व आणि नंतरच्या भारतीय इतिहासात कुविख्यात झाले. नोआखाली जिल्ह्यातील अमानुष अत्याचारांनी व्यथित होऊन म. गांधींनी या भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जाण्याचे ठरविले. कित्येक महिने सर्व जिल्ह्यांत पदयात्रा करून हिंदु–मुसलमान यांच्यात सलोखा, विश्वास व परस्पर सहकार्य प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अहिंसक मार्गांनी प्रयत्न केला. १८७६ पासून येथे नगरपालिका आहे. येथून कोमिल्लाशी रस्ते व लोहमार्ग यांद्वारे, तर बारिसालशी जलमार्गे वाहतूक चालते. याच्या आसमंतात पिकणाऱ्या तांदूळ, ताग, गळिताची धान्ये यांचे त्याचप्रमाणे पितळेच्या भांड्यांच्या व्यापाराचे हे केंद्र आहे. पितळेची भांडी तयार करणे व हातमागावर कापड विणणे हे येथील प्रमुख व्यवसाय होत. प्राथमिक व माध्यमिक शाळा आणि डाक्का विद्यापीठाशी संलग्न असलेली तीन शासकीय महाविद्यालयेही येथे आहेत.

चौधरी, वसंत