अँबोइना : इंडोनेशिया प्रजासत्ताकातील बेट व शहर. हल्लीचे नाव ‘आंबोन’. अक्षांश ३२९’ ते ३४८’ द. व रेखांश १२७५४’ ते १२८ २५’ पू. हे मालूक् प्रांतात व द्वीपसमूहात, बांदा समुद्राच्या उत्तरेस आणि सेराम बेटाच्या दक्षिणेस ५१·५ किमी. लांब व १६ किमी. रुंद पसरले आहे. बेट डोंगराळ, ज्वालामुखींनी युक्त असून सुपीक किनारपट्टीत मसाल्याचे पदार्थ, तांदूळ, ऊस, नारळ इ. पिके होतात. १५१२ मध्ये पोर्तुगीजांनी बेटाचा शोध लावला. १५९९ पासून बेट जवळजवळ डचांकडेच होते. १६२३ मध्ये डचांनी येथील ब्रिटिश वसाहतीची सरसहा कत्तल केली. १९४२ मध्ये जपानने हे बेट घेतले होते. इंडोनेशियाच्या स्वातंत्र्यसमयी येथे स्वातंत्र्याकरिता बंड झाले होते (१९५०). अँबोइना शहर [लोकसंख्या ७०,००० (१९७०)] ही प्रांताची राजधानी असून तेथे विमानतळ व नाविकतळ आहे. येथे जहाजबांधणीचा मोठा उद्योग असून निर्यात व्यापाराचे हे केंद्र समजले जाते. उत्तम रस्ते व इमारती आणि समशीतोष्ण हवामान यांमुळे हे अतिपूर्वेकडील एक आकर्षक शहर समजले जाते.

लिमये, दि. ह.