मॉरिशस: हिंदी महासागरातील द्वीपसमूहांचा बनलेला देश. यामध्ये मॉरिशस बेट, रोड्रीगेस बेट, आगालेगा बेटे, सेंट ब्रांडन द्वीपसमूह (कार्गाडोस कराजोस शोल्स) यांचा समावेश होतो. मॉरिशस हे यांतील सर्वांत मोठे व प्रमुख बेट असून त्यावरूनच देशाला मॉरिशस असे नाव पडले आहे. हे बेट मादगास्करच्या पूर्वेस ८०० किमी. तसेच आफ्रिकेच्या सर्वांत जवळच्या किनारी प्रदेशापासून २,००० किमी, अंतरावर आहे. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ९३% क्षेत्रफळ व एकूण लोकसंख्येपैकी ९७% लोकसंख्या एकट्या मॉरिशस बेटाची आहे. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १९° ५० ते २०° दक्षिण व ५७° ते ५७° ४८ पूर्व यांदरम्यान आहे. मॉरिशस बेटाच्या साधारण पूर्वेस ५६० किमी. अंतरावर रोड्रीगेस बेट व उत्तरेस ९६० किमी. वर दोन आगालेगा बेटे आहेत, तसेच सेंट ब्रांडन द्वीपसमूहसुद्धा मॉरिशसच्या उत्तरेसच आहे. देशाची लोकसंख्या ९,६९,१९१ होती (१९८३ अंदाज). एकूण क्षेत्रफळ २,०४० चौ. किमी. असून त्यापैकी मॉरिशस बेटाचे १,८६५ चौ. किमी., रोड्रीगेस बेटाचे १०४ चौ. किमी. व बाकीच्या बेटांचे ७१ चौ. किमी. आहे. मॉरिशस बेटाची दक्षिणोत्तर लांबी ६१ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी ४७ किमी. असून किनाऱ्याची एकूण लांबी २१७ किमी. आहे. मॉरिशसच्या ईशान्येस १,९०० किमी. अंतरावर असलेल्या द्येगो गार्सीआ बेटे या ब्रिटिशांच्या सागरपार प्रांतावर तसेच वायव्येस ५५० किमी. वरील फ्रेंचाच्या आधिपत्याखालील ट्रॉम्लँ बेटावर मॉरिशसने आपला हक्क सांगितला आहे. द्येगो गार्सीआवरील मॉरिशसने सांगितलेल्या या हक्काला जुलै १९८० मधील ‘ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन युनिटी’ (ओएयू) च्या शिखर परिषदेत मान्यता देण्यात आली. मॉरिशस बेटावरील पोर्ट लूई (लोकसंख्या १,४९,९००–१९८३ अंदाज) ही राजधानी आहे.

भूवर्णन: मॉरिशस हे प्रामुख्याने ज्वालामुखी क्रियेतून निर्माण झालेले बेट असून सभोवताली प्रवाळशैलभित्तींची निर्मिती झालेली आहे. बेटाचा उत्तर भाग मैदानी व मध्यवर्ती भाग पठारी आहे. मैदानी प्रदेशाकडून मध्यवर्ती पठारी भागाकडे ६७० मी. पर्यंत उंची वाढत गेलेली आढळते. या पठारी प्रदेशावर लहानलहान पर्वतरांगा व एकाकी टेकड्या असून ते मुख्यतः ज्वालामुखी क्रियेचे अवशेष आहेत. बेटाचा दक्षिण भाग पर्वतीय असून नैर्ऋत्य भागातील पिटोन द ला पेटीट रीव्हीएरे नवार हे देशातील सर्वोच्च (८२६ मी.) शिखर आहे. रोड्रीगेस हेसुद्धा ज्वालामुखी बेटच आहे. सेंट ब्रांडन द्वीपसमूहात प्रवाळशैलभित्ती व शोलयुक्त लहानलहान द्वीपक आहेत. मॉरिशस बेटावर प्रमुख सहा मृदाप्रकार आढळतात. त्यांपैकी बेसाल्ट खडकापासून तयार झालेली काळी मृदा अधिक सुपीक व शेतीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.

मॉरिशस बेटावरून अनेक लहानलहान नदीप्रवाह खोल दऱ्यांतून वाहताना आढळतात. त्यांपैकी ग्रँड रिव्हर साउथ ईस्ट ही सर्वांत लांब (३९ किमी.) नदी आहे. पावसाळ्यात हे प्रवाह तुडुंब भरून वाहतात. पठारी भागात ग्रँड बासींन व मारे ऑक्स व्हाकोआस ही दोन उल्लेखनीय सरोवरे आहेत. त्यांपैकी मारे ऑक्स व्हाकोआस हे पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने विशेष उपयुक्त आहे. याशिवाय इतर चार मोठ्या जलाशयांचा जलसिंचनासाठी उपयोग केला जातो. 

हवामान : मॉरिशसचे हवामान समशीतोष्ण कटिबंधीय सागरी आणि आर्द्र प्रकारचे आहे. समुद्रसपाटीवर तापमान १८° ते ३०° से. यांदरम्यान, तर अंतर्गत भागातील ४६० मी. उंचीवर ते १३° ते २६° से. च्या दरम्यान असते. नोव्हेंबर ते एप्रिल उन्हाळा, तर मे ते ऑक्टोबर हिवाळा ऋतू असतो. उन्हाळ्यातील सरासरी तापमान २४° से. व हिवाळ्यातील सरासरी तापमान २०° से. असते. आग्नेय व्यापारी वाऱ्यांच्या टापूत हा देश येतो. उन्हाळ्यात वाहणारे आग्नेय व्यापारी वारे बेटाच्या मध्यवर्ती पठारी प्रदेशावर व त्याच्या वातसन्मुख उतारावर भरपूर पाऊस देतात. वार्षिक सरासरी पर्जन्यमान पश्चिम किनाऱ्यावर ९० सेंमी., आग्नेय किनाऱ्यावर १५० सेंमी., तर मध्यवर्ती पठारी भागात ते ५०० सेंमी. आहे. एप्रिल ते सप्टेंबर या काळात दररोज पावसाच्या सरी कोसळतात. उन्हाळ्यात येथे अधूनमधून उष्ण कटिबंधीय चक्रीवादळे निर्माण होऊन त्यांपासूनही मॉरिशस बेटावर पर्जन्यवृष्टी होते.

वनस्पती व प्राणी: देशात सु. ६०० वनस्पती प्रकार आढळतात. पूर्वी येथे घनदाट वर्षारण्ये होती. जास्त उंचीचे प्रदेश शेवाळयुक्त अरण्यांनी व किनारी प्रदेश ताडाच्या वनांनी आच्छादलेले होते. तथापि पूर्वीचे फारच थोडे वनस्पती प्रकार सध्या अस्तित्वात आहेत. वनसंवर्धनाच्या दृष्टीने १७७० मध्ये पांप्लमूस येथे एका वनस्पती उद्यानाची निर्मिती करण्यात आली होती. सध्या या बेटांवर आढळणाऱ्या वनस्पतींची लागवड अलीकडे येथे स्थायिक झालेल्या लोकांनी केलेली आहे.

पूर्वी आढळणारे बरेचसे प्राणी आता नामशेष झाले असल्याचे दिसते. यूरोपीय वसाहतकऱ्यांनी आपल्याबरोबर कुत्रा, मांजर, उंदीर, माकड, रानडुक्कर, सांबर, हरिण, मुंगूस हे प्राणी येथे आणले. १८६५ च्या दरम्यान डासांबरोबर तेथे मलेरियाचे आगमन होऊन त्याचा प्रभाव साधारण शतकभर टिकला. डोडो हा पक्षी मूळ ठिकाणचा असला, तरी तो आता येथून जवळजवळ नामशेष झालेला आढळतो. बोलिरिआ मल्टीकॉरिनॅट व कासारीआ डुसुमेरी जातींचे बोआ सर्प ह्या येथील सापाच्या मुख्य जाती आहेत. 

इतिहास व राज्यव्यवस्था: दीर्घ काळापर्यंत मनुष्यवस्ती नसलेले हे बेट प्रथम अरब, स्वाहिली व मलायी खलाशांनी आणि त्यानंतर पोर्तुगीज व इतर यूरोपीय खलाशांनी पाहिलेले होते. अरब किंवा स्वाहिली यांना दहाव्या शतकापासून किंवा त्यापूर्वीपासूनही हे बेट माहीत होते. १५१० च्या सुमारास पोर्तुगीजांनी या बेटाला भेट दिली होती. तथापि १५९८ मध्ये ॲडमिरल व्यीब्रांट व्हान वॉरविज्क याच्या नेतृत्वाखाली डच लोक या बेटावर येईपर्यंत कुणाचेच या बेटाशी विशेष संबंध प्रस्थापित झाले नव्हते. तोपर्यंत तेथे मनुष्यवस्तीही नव्हती. नॅसॉचा राज्यप्रमुख प्रिन्स मॉरिस याच्या नावावरून डचांनी या बेटाला मॉरिशस हे नाव दिले. डचांनी १६३८ ते १६५८ व १६६४ ते १७१० या काळात या बेटावर वसाहती स्थापन करण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर मात्र त्यांनी आपले प्रयत्न सोडून दिले व काही काळ हे चाचेगिरीचे केंद्र बनले. १७१५ मध्ये फ्रेंचांनी हे आपल्या आधिपत्याखाली आणून १७२१ मध्ये त्यांनी रियून्योंवरून वसाहतकऱ्यांना या बेटावर वसाहतीसाठी पाठविले. तसेच त्यांनी या बेटाला ‘एल् दे फ्रान्स’ असे नाव दिले. १७२१ ते १७६७ पर्यंत फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने या बेटाचा राज्यकारभार पाहिला. या काळात येथील वसाहतीचा विकास अगदी मंदगतीने होत होता. दरम्यान पोर्ट लूईची स्थापना केली व भारतातील ब्रिटिशांवर हल्ला करण्याचा तळ म्हणून त्याचा वापर केला. तथापि १७५६ ते १७६३ या सात वर्षांच्या युद्धकाळात ब्रिटिशांविरुद्ध कारवाई करण्यासाठी या तळाचा वापर करण्याचे फ्रेंचांचे प्रयत्न निष्फळ ठरले. १७६७ मध्ये फ्रेंच शासनाने या बेटाचा राज्यकारभार हाती घेतला. फ्रेंच राज्यक्रांतीचा काही काळ वगळता फ्रेंच शासनाने ४३ वर्षांपर्यंत येथील कारभार पाहिला.


ब्रिटिशांनी १८१० मध्ये हे बेट काबीज करून डचांनी ठेवलेले मॉरिशस हे नाव कायम केले. सुरुवातीला केवळ व्यापारी व लष्करी दृष्ट्या महत्त्व असलेले मॉरिशस हे बेट ब्रिटिशांच्या कारकीर्दीत मळ्याच्या शेतीचे व साखरनिर्मितीचे प्रमुख बेट बनले. फ्रेंचांनी येथील प्रमुख ऊसमळ्यांवरील व साखर कारखान्यांवरील आपली मालकी कायम ठेवली. तसेच तेथे ब्रिटिश वसाहतींची उल्लेखनीय अशी वाढही होऊ शकली नाही. त्यामुळे भाषा, कायदा, रूढी व सांस्कृतिक दृष्ट्या फ्रेंचांचाच प्रभाव या बेटावर अधिक राहिला. ब्रिटिश साम्राज्यकाळात गुलामगिरीची पद्धत नष्ट झाल्यामुळे ऊसमळ्यांत काम करणारे आफ्रिकन गुलाम इतर व्यवसायांकडे वळले, त्यामुळे ऊसमळ्यांत काम करण्यास मजुरांचा खूपच तुटवडा भासू लागला. हा तुटवडा भरून काढण्यासाठी १८३५ पासून मळेवाल्यांना भारतातून करारावर मजूर आणण्यास ग्रेट ब्रिटनने परवानगी दिली. १९०७ पर्यंत हे स्थलांतर चालू राहिले. या काळात सु. ४,५०,००० भारतीयांनी मॉरिशस मध्ये स्थलांतर केले. १८५० ते १८६० या काळात मॉरिशस चांगलेच भरभराटीस आले. तथापि १८६६–६८ यांदरम्यान बेटावर फैलावलेली मलेरियाची साथ, शिडाऐवजी वाफेवर चालणाऱ्या जहाजांचा झालेला प्रसार व १८६९ मध्ये सुरू झालेला सुएझ कालवा इ. कारणांमुळे मॉरिशसकडे होणारी जहाजांची वर्दळ कमी झाली. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस येथील आर्थिक परिस्थिती फारच खालावली. पहिल्या महायुद्धाने परिस्थिती अधिकच हलाखीची बनली. परंतु युद्धानंतर साखरेच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे परिस्थितीत थोडीबहुत सुधारणा झाली. १९३० च्या आर्थिक मंदीचा परिणाम म्हणजे १९३७ मध्ये कामगारांमधील असंतोष कमालीचा वाढला. दुसऱ्या महायुद्धकाळापर्यंत परिस्थितीत विशेष सुधारणा झाली नाही. युद्धोत्तर काळात आर्थिक विकासाच्या प्रशासकीय व राजकीय सुधारणांच्या योजना हाती घेण्यात आल्या. परिणामतः स्वयंशासनाचा अधिकार मिळून शेवटी १९६८ मध्ये देशाला स्वातंत्र्य प्राप्त झाले.

मॉरिशसच्या १८३१ च्या संविधानात कार्यकारी मंडळाची तरतूद होती. यात प्रतिनिधित्व करणारे बहुसंख्य नियुक्त केलेले यूरोपीय व काही क्रीओल लोक होते. १८८० च्या संविधानानुसार २७ सदस्यांचे कार्यकारी मंडळ होते. त्यात १० सदस्य निर्वाचित असत. मात्र यात सांपत्तिक स्थितीवरून मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. त्यामुळे १९२६ पर्यंत भारतीयांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क नाकारला गेला होता. १९४७ च्या संविधानानुसार सांपत्तिक स्थितीवर आधारित मतदानाच्या हक्काची तरतूद रद्द करून स्त्री पुरुष अशा दोघांनाही मतदानाचा अधिकार देण्यात आला. सार्वत्रिक मतदान पद्धतीनुसार मार्च १९५९ मध्ये झालेल्या पहिल्या निवडणुकीत डॉ. शिवसागर रामगुलाम (१९००–८५) यांच्या नेतृत्वाखालील मजूर पक्षाने बहुमत मिळविले व सप्टेंबर १९६१ मध्ये ते मुख्यमंत्री झाले. मार्च १९६४ मध्ये पुन्हा ते या पदावर आले. १९४८ पासून भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधींचेच बहुमत राहिले. सप्टेंबर १९६५ मध्ये लंडन येथे भरलेल्या संविधानीय परिषदेच्या वेळी मॉरिशसला अंतर्गत स्वयंशासनाचा संपूर्ण अधिकार देण्यात आला. १ नोव्हेंबर १९६५ मध्ये ग्रेट ब्रिटनने मॉरिशसच्या ताब्यातील द्येगो गार्सीआ बेटांसह चागोस द्वीपसमूहाचे नव्याने निर्माण केलेल्या ‘ब्रिटिश इंडियन ओशन टेरिटरी’ कडे हस्तांतरण केले. मॉरिशसने चागोस द्वीपसमूह आपल्याकडे मिळविण्याचे, विशेषतः १९८० मध्ये अमेरिकेने द्येगो गार्सीआ बेटांवर प्रचंड आरमारी तळ उभारल्यापासून, जोरदार प्रयत्न केले.

मॉरिशसला १२ मार्च १९६८ रोजी स्वातंत्र्य मिळाले व एक महिन्यातच तो संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला. स्वातंत्र्याच्या वेळी मुस्लिम व क्रीओल यांच्यात झालेल्या दंग्यामुळे देशात आणीबाणी जाहीर करावी लागली व शांतता प्रस्थापित करण्यासाठी सिंगापूरहून ग्रेट ब्रिटनच्या फौजा आणाव्या लागल्या. पूर्वीच्या वसाहतीच्या शासनाचे मुख्यमंत्री असलेले डॉ. शिवसागर रामगुलाम हे स्वतंत्र मॉरिशसचे पहिले पंतप्रधान बनले. रामगुलाम यांचा मॉरिशस मजूर पक्ष हा स्वबळावर अथवा इतरांच्या पाठिंब्याने जून १९८२ पर्यंत अधिकारावर राहिला. त्यानंतर ‘मॉरिशियन मिलिटंट मूव्हमेंट’ (एमएमएम्) आणि मॉरिशियन सोशलिस्ट पार्टी (पीएस्एम्) या दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे मॉरिशस बेटावरील सर्वच्या सर्व म्हणजे ६० जागा जिंकल्या व एम्एम्एम् पक्षाचे प्रमुख अनिरुद्ध जगन्नाथ हे मॉरिशसचे पंतप्रधान झाले. मार्च १९८३ मध्ये मंत्रिमंडळातील १२ मंत्र्यांनी राजीनामे दिले. राजीनामा देणारे सर्व एम्एम्एम् पक्षाचेच सभासद होते. त्यामुळे गव्हर्नर जनरल सर दयेंद्रनाथ बुरेनछोबे यांच्या आदेशानुसार नव्याने निवडणुका जाहीर करण्यात आल्या. २१ ऑगस्ट १९८३ रोजी झालेल्या या निवडणुकांत अनिरुद्ध जगन्नाथ यांनी केलेल्या वेगवेगळ्या पक्षांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळून पुन्हा तेच पंतप्रधान बनले. डिसेंबर १९८३ मध्ये गव्हर्नर जनरलपदी डॉ. शिवसागर रामगुलाम यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या मृत्यूनंतर सर वीरसामी रिंगादू यांची गव्हर्नर जनरलपदी नियुक्ती झाली (१९८५).

मॉरिशसमध्ये संसदीय प्रकारची शासनव्यवस्था असून कार्यकारी अधिकार ब्रिटिश राज्यघटनेतील तरतुदीनुसार मॉरिशस सरकारच्या शिफारशीनुसार परंतु ब्रिटिश राजसत्तेकडून नियुक्त केलेल्या गव्हर्नर जनरलकडे असतात. पंतप्रधानाची नेमणूक गव्हर्नर जनरलकडून होत असते आणि पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार तो इतर मंत्र्यांची निवड करतो. पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्रपरिषदेच्या सल्ल्यानुसार तो कारभार पाहत असतो व कायदेमंडळाच्या ७० सदस्यांना जबाबदार असतो. एक सभापती, ६२ निर्वाचित सदस्य, ८ सामावून घेतलेले सभासद आणि महान्यायवादी यांची मिळून विधानसभा बनते. पंतप्रधान आणि इतर जास्तीतजास्त २० मंत्रांचे मिळून मंत्रिमंडळ बनते. एकूण २० मतदारसंघ असून त्या प्रत्येकातून तीन प्रतिनिधी, सर्व ज्ञातींतून मिळून आठ आणि रोड्रीगेसमधून दोन प्रतिनिधी निवडले जातात. विधानसभेची मुदत पाच वर्षांची असते. विधानसभेतील अधिकृत भाषा इंग्रजी असली, तरी सभासदांना फ्रेंच भाषेचा वापर करण्यासही मान्यता आहे. १८ वर्षांवरील सर्वांना मतदानाचा अधिकार आहे. 


पंतप्रधान डॉ. शिवसागर रामगुलाम यांच्या नेतृत्वाखाली मॉरिशस मजूर पक्ष हा राजकीय पक्ष १९४७–१९८२ अशी सतत ३५ वर्षे अधिकारावर होता. या पक्षाला हिंदू, क्रीओल व ‘मुस्लिम कमिटी ऑफ ॲक्शन’ (एमसीए) यांचाही पाठिंबा होता. ‘मॉरिशियन सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी’ (पीएम्एसडी) हा पक्ष फ्रँको मॉरिशियन आणि क्रीओल जमीनदार वर्गाचे बराच काळ प्रतिनिधित्व करीत होता. एम्एम्एम् हा नवीन राजकीय पक्ष १९७० मध्ये उदयास आला. या राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या कारखान्यांतील लोकांना संप करण्यास मनाई करणाऱ्या कायद्याच्या निषेधार्थ या पक्षाने सार्वजनिक संपाचा इशारा दिला. त्यावरून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना १९७१ मध्ये तुरुंगात टाकले होते. १९७६ च्या निवडणुकीत या पक्षाने एम्एलपी पक्षापेक्षा अधिक जागा जिंकल्या. परंतु अधिकारावर येण्यास त्या पुरेशा नव्हत्या. १९८२ च्या निवडणुकीत एम्एम्एम् पक्षाने संसदेच्या एकूण ४२ जागा जिंकल्या. व पीएस्‌एम्‌च्या सहकार्याने अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली देशाचा कारभार हाती घेतला. या दोन पक्षांपैकी एम्एम्एम् हा पक्ष क्रीओलांचे खंबीर प्रतिनिधित्व करणारा होता, तर पीएस्‌एम् हा मूळ हिंदू पक्ष होता. सत्तेसाठी एम्एम्एम् पक्षांतर्गत झालेल्या भांडणांमुळे १९८३ च्या सुरुवातीलाच पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार कोसळले. तसेच त्यांना पक्षातूनही काढून टाकण्यात आले. त्यानंतर जगन्नाथ यांनी ‘मॉरिशियन सोशलिस्ट मूव्हमेंट’ (एम्एस्‌एम्) पक्षाची स्थापना केली. ऑगस्टमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी मजूर पक्षाच्या मदतीने प्रत्यक्षपणे निवडून आलेल्या ६२ पैकी ३७ जागा जिंकल्या. एम्एम्एम् पक्षाने १९, पीएम्एस्‌डी पक्षाने ४ आणि रोड्रिगेसमधील ‘ऑर्गनायझेशन द पीपल रोड्रिगेस पक्षा’ने २ जागा जिंकल्या.

राज्यकारभाराच्या सोयीसाठी मॉरिशस बेटाचे एकूण नऊ प्रशासकीय विभाग (जिल्हे) पाडण्यात आले आहेत. त्यांपैकी सात किनारी व दोन अंतर्गत जिल्हे आहेत. गावपातळीवरचा ग्रामपरिषद हा स्थानिक प्रशासनाचा सर्वांत लहान घटक आहे. १९८२ मध्ये अशा ९८ ग्रामपरिषदा होत्या. ग्रामपरिषदेत निर्वाचित व नियुक्त सदस्य असतात. ग्रामपरिषदेपेक्षा वरच्या पातळीवर जिल्हा परिषदा असून त्यांची संख्या तीन आहे. मुख्य नगरांमध्ये नगरपालिकेतर्फे कारभार पाहिला जातो. नगरपालिकेत २४ निर्वाचित सदस्य असतात. पोर्ट लूई नगरपालिकेत ३० निर्वाचित सदस्य आहेत. 

न्याय व संरक्षण: मॉरिशसमधील कायदे प्रामुख्याने जुन्या फ्रेंच नियमावलींवर व इंग्लिश पूर्वोदाहरणांवर आधारित आहेत. सर्वोच्च न्यायालयात एक मुख्य व इतर सहा न्यायाधीश असतात. याशिवाय देशात फौजदारी अपील, दिवाणी अपील, लवाद, औद्योगिक व दहा जिल्हा न्यायालये आहेत. अंतिम अपील ग्रेट ब्रिटनमधील प्रिव्ही कौन्सिलच्या न्यायदान समितीकडे करावे लागते. पोलीसबल व निमलष्करी बल हे देशाच्या संरक्षणास जबाबदार असते. १९८१ मध्ये त्यांची एकूण संख्या ४,०७७ होती.

आर्थिक स्थिती : मॉरिशस हा कृषिप्रधान देश असून साखर हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा मूळ आधार आहे. मॉरिशस बेटाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ५०% क्षेत्र शेतीखाली, १०% क्षेत्र मानवी वसाहती व रस्त्यांखाली व उरलेल्या ४०% क्षेत्रापैकी बराचसा भाग दाट वनस्पतींनी व गवतांनी आच्छादलेला किंवा ओसाड आहे. देशाच्या एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनात ३०% वाटा साखरेचा असून एकूण निर्यात उत्पन्नापैकी ७०% उत्पन्न साखरेच्या निर्यातीपासून मिळते. साहजिकच ऊस हे देशातील मुख्य पीक आहे. एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ९०% जमीन उसाच्या पिकाखाली आहे. १९८३ मध्ये ५२,५४,००० मे. टन एवढे उसाचे उत्पादन झाले व त्यापासून कच्च्या साखरेचे उत्पादन ६,०४,७४१ मे. टन व मळीचे उत्पादन १,९५,००० मे. टन इतके झाले. देशातील उसाखालील एकूण क्षेत्रापैकी ५५% क्षेत्र केवळ २१ मोठ्या मळ्यांमध्ये केंद्रित झाले आहे व बाकीचे क्षेत्र सु. २८,००० मळेवाल्यांच्या मालकीचे आहे. मोठ्या ऊसमळ्यांचे राष्ट्रीयीकरण करण्याचा सरकार विचार करीत आहे. साखरेची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत, उसावर पडणारी कीड व हवामानाची स्थिती हे येथील उसाच्या पिकावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक आहेत. चहा हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पीक असून त्याच्यावर प्रक्रिया करणारे आठ कारखाने आहेत. १९५९ पासून शासन चहा उत्पादन वाढीला विशेष प्रोत्साहन देत आहे. चहाच्या निर्यातीत व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नात बरीच वाढ झाली आहे. याशिवाय १९८३ मध्ये इतर कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे झाली (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : हिरवा चहा ३१·१, काळा चहा ४·४ (१९८१), बटाटे १५, केळी ७·१, तंबाखू ०·८, भुईमूग १·९, टोमॅटो ११·६, नारळ ५ (१९८२), इतर भाजीपाला १७·५ (१९८१). मॉरिशसवर सर्व प्रकारची उत्पादने घेता येणे शक्य असले, तरी अपुऱ्या जमिनीमुळे सर्व उत्पादने पुरेशा प्रमाणात घेतली जात नाहीत. त्यामुळे बहुतेक खाद्यान्नांची गरज आयातीपासून भागविली जाते. तांदूळ हे येथील प्रमुख अन्न आहे. तांदूळ तसेच दुग्धोत्पादने यांची मोठ्या प्रमाणावर आयात केली जात असून एकूण आयात खर्चात यांचा २०% ते २५% वाटा असतो. १९९० पर्यंत मॉरिशसच्या अन्नधान्याच्या एकूण वार्षिक गरजेपैकी निम्मे अन्नधान्य उत्पादन देशातच घेण्याचे शासनाचे प्रयत्न चालू आहेत.

देशातील पशुधन पुढीलप्रमाणे होते (संख्या हजारांमध्ये) : गुरे ५७, डुकरे ९, मेंढ्या ४, शेळ्या ७०, कोंबड्या १,७०० व बदके २५ (१९८२). १९८१ मध्ये देशात मांसोत्पादन ८,००० मे. टन, गाईचे दूध ८००० मे. टन व कोंबड्यांच्या अंड्यांचे उत्पादन ४,००० मे. टन झाले.

उद्योग: देशातील सार्वजनिक विद्युत्‌निर्मिती प्रकल्पांची क्षमता १,३१,६४० किवॉ. होती (१९८०). विद्युत्‌शक्तीचे १९७० मध्ये असलेले १३६ द. ल. किवॉ. ता. उत्पादन १९८३ मध्ये ३७१ द. ल. किवॉ. ता. झाले असून त्यापैकी १६% जलविद्युत्‌शक्ती होती. साखर कारखान्यांतून मिळणाऱ्या चोयट्या या उपउत्पादनाचा विद्युत्‌निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जात असून १९८२ मध्ये त्यापासून ४५ द. ल. किवॉ. ता. विद्युत्‌शक्ती निर्माण झाली. १९८४ पासून शँपेन जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाला असून त्यापासून प्रतिवर्षी ४० द. ल. किवॉ. ता. वीज निर्माण केली जाते. देशात खनिज संपत्ती फारच अल्प आहे. दगडांच्या खाणीत १४५ लोक काम करीत असून त्यापासून १९८० मध्ये १५ द. ल. रुपये उत्पन्न मिळाले. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी ३५ क्षेत्र जंगलव्याप्त आहे. १९८२ मध्ये लाकडाच्या ओंडक्यांचे उत्पादन ४३,००० घ. मी. व कापलेल्या लाकडाचे उत्पादन ४,००० घ. मी. झाले. मासेमारी विकासासाठी जपान व रशियाकडून तांत्रिक मदत घेतली जात आहे. १९८३ मध्ये एकूण ३,९०० मे. टन मासे पकडण्यात आले.


मॉरिशसमध्ये ऊस, चहा यांसारख्या कृषिउत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांचेच प्रमाण अधिक आहे. लहानलहान उद्योगांतून बीर, सौम्य पेये यांसारख्या स्थानिक उपभोगाच्या पेयांचे उत्पादन घेतले जाते. अल्कोहॉल, रम, बीरचे प्रकार, सौम्य पेये यांचे १९८३ मधील उत्पादन (हेलि. मध्ये) अनुक्रमे २३,६४६ ३८,८९८ (१९८१) १,४९,७२० ३,००,२९७ याप्रमाणे झाले. १९७० मध्ये शासनाने निर्यातवस्तुनिर्मिती उद्योगांच्या विकासाची योजना आखली असून अशा उद्योगांच्या प्रोत्साहनार्थ विशेष करसवलत दिली जाते. या योजनेनुसार १९९० पर्यंत दरवर्षी सु. ५,००० कामे उपलब्ध होतील असा अंदाज आहे. या योजनांतर्गत १०७ कंपन्या व २३,६०१ कामगार कार्य करीत आहेत. यामध्ये कापड व कपडे निर्मिती, विद्युत्‌साहित्य निर्मिती, हिऱ्यांना पैलू पाडणे, प्लॅस्टिक, चामड्याच्या वस्तू, कृत्रिम शोभिवंत खडे, खेळणी, आगकाड्या इ. उत्पादनांचा समावेश होतो. १९८२ मध्ये १,७९,६४६ ग्रोस आगपेट्यांचे उत्पादन झाले. विणमाल हे देशातील प्रमुख असे बिगरशेती उत्पादन आहे. एकूण निर्मिती उद्योगांतील कामगारांपैकी निम्मे कामगार यात गुंतले असून निर्यात उत्पादनाच्या बाबतीत साखरेनंतर याचाच दुसरा क्रमांक लागतो.

संशोधन व विकासकार्यात एकूण १५३ शास्त्रज्ञ व १२४ तंत्रज्ञ काम करीत आहेत. राजधानी पोर्ट लूई येथे स्थानिक वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास करणारे संशोधन केंद्र आहे. फ्रेंच कृषिखात्याने चालविलेले अनुप्रयुक्त कीटकविज्ञान कार्यालय मॉरिशस बेटावर आहे. तेथेच मॉरिशस साखरउद्योग संशोधन संस्थाही आहे. मॉरिशस विद्यापीठाची कृषी व औद्योगिक कलाशास्त्रविषयक विद्यालये आहेत. 

देशात कामगारांची एकूण संख्या १,९६,१५९ होती (१९८१). त्यांपैकी २८% शेती व मासेसारी क्षेत्रात, ३३% सेवा व्यवसायात, विशेषतः शासकीय सेवेत व १९% निर्मिती उद्योगांत गुंतले होते. बेरोजगारांची एकूण संख्या ७५,१२९ होती (१९८२). किमान वेतन मर्यादा शासनाने ठरवून दिलेली आहे. किमान जीवनावश्यक भत्ता देण्याबाबतचेही नियम करण्यात आले आहेत. येथील कामगार चळवळ प्रभावी आहे. तीन व्यापारी संघटनांचे महासंघ आहेत. त्यांपैकी ‘मॉरिशस लेबर काँग्रेस संघ’ सर्वांत मोठा आहे (१९८२). कामगार संघटनांची संख्या २६९ असून त्यांचे ५९,७७० सभासद होते (१९८१).

व्यापार व अर्थकारण: पोर्ट लूई हे देशातील प्रमुख व्यापारी केंद्र व बंदर आहे. १९८३ मध्ये एकूण आयात-निर्यात व्यापार पुढीलप्रमाणे झाला (आकडे द. ल. रुपयांमध्ये) : आयात-दुग्धजन्य पदार्थ २००·४ तांदूळ २१०·१ गव्हाचे पीठ १७७·७ खनिज तेल उत्पादने ९५४·२ वनस्पती तेले १०५·६ कापड, कापडाचे सूत व धागा ५२८ सिमेंट १६३·४ लोह व पोलादी वस्तू १३६·७ विद्युत्‌निर्मिती यंत्रे १३९·४ विशिष्ट उद्योगांसाठीची उपकरणे १२३·७ सर्वसामान्य औद्योगिक यंत्रे १०२·९ रस्त्यावरुन धावणारी वाहने १२३·७ एकुण (इतर धरुन) ५,१५५·९. निर्यात-कच्ची साखर २,६२० शुद्धीकृत साखर ५८·८ मळी ६३·३ चहा ९७ इतर ७७·६ एकूण २,९१६·७. बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, प. जर्मीनी, भारत, इटली, रेयून्यों, ग्रेट ब्रिटन व अमेरिका यांच्याशी मॉरिशसचा निर्यात व्यापार चालतो तर ऑस्ट्रेलिया, बहारीन, चीन, फ्रान्स, प. जर्मनी, भारत, इटली, जपान, केन्या, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, तैवान, ग्रेट ब्रिटन, अमेरिका या प्रमुख देशांकडून वेगवेगळ्या वस्तूंची मॉरिशस आयात करतो. १९८० मध्ये एकूण निर्यातीपैकी ६८% निर्यात एकट्या ग्रेट ब्रिटनला झाली तर एकूण आयातीपैकी १३% दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताक, १२% ग्रेट ब्रिटन, ११% फ्रान्स व ११% बहारीनकडून करण्यात आली. देशात पाश्चिमात्यांच्या धर्तीवर अनेक व्यापारी व विद्वत् संघटना आहेत. मॉरिशस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, चायनीज चेंबर ऑफ कॉमर्स, इंडियन ट्रेडर्स असोसिएशन, मॉरिशस एम्प्लॉयर्स फेडरेशन, मॉरिशस को-ऑपरेटिव्ह ॲग्रिकल्चरल फेडरेशन व मॉरिशस को-ऑपरेटिव्ह युनियन ह्या त्यांपैकी प्रमुख संघटना आहेत. देशाच्या व्यापारशेषात अलीकडे सुधारणा झालेली दिसते. १९८१ मध्ये असलेली २,०५२ द. ल. रुपये ही व्यापारतूट १९८२ मध्ये १,१५० द. ल. रुपये व १९८३ मध्ये ९३३ द. ल. रुपये इतकी कमी झाली.

‘बँक ऑफ मॉरिशस’ ही देशातील मध्यवर्ती बँक असून तिची एकूण संपत्ती २,१९३·८ द.ल.रु. होती (१९८१). डेव्हलपमेंट बँक ऑफ मॉरिशस (स्था. १९६४) ही कृषी व औद्योगिक विकासासाठी कर्जपुरवठा करते. यांशिवाय देशात १२ व्यापारी बँका होत्या (१९८१), तसेच १३ स्थानिक विमा कंपन्या व ८ परदेशी विमा कंपन्या होत्या (१९८२).

रुपया हे मॉरिशसचे चलन असून १०० सेंटचा १ मॉरिशियन रुपया होतो. १, २, ५, १०, २५ व ५० सेंटची आणि १ रुपयाची नाणी तर ५, १०, २५ व ५० रुपयांच्या नोटा चलनात आहेत. १ स्टर्लिंग पौंड = १८·०८४ मॉरिशियन रुपये, १ अमेरिकी डॉलर = १५·६०३ रुपये किंवा १,००० मॉरिशियन रुपये = ५५·३० स्टर्लिंग पौंड = ६४·०९ डॉलर असा विनिमय दर होता (१९८४). देशात मेट्रिक परिणाम प्रचलित आहे.

देशाचा एकूण महसूल २,८४६ द. ल. रुपयांचा व एकूण व्यय ३,७१६ द.ल. रुपयांचा होता (१९८२–८३ अंदाज). १९८४–८५ चे अंदाजपत्रक ४,२३० द.ल. रुपये खर्चाचे, ३,५७५ द.ल. रुपये महसुलाचे व ६५५ द.ल. रुपये तुटीचे आहे. १९८१–८२ मधील एकूण भांडवली खर्च १,२७५ द.ल. रुपये व एकूण भांडवली महसूल ८५३·९ द.ल. रुपये असून त्यापैकी ९ टक्क्यांपेक्षा अधिक देशाबाहेरून मिळालेला आहे. जून १९८१ मध्ये केंद्रशासनावर असलेल्या ४,३२९·५ द.ल. रुपये कर्जापैकी १,५५८·३ द.ल. रुपये अंतर्गत व २,७७१·२ रुपये बाह्य कर्ज होते. १९७९ पासून मॉरिशसला आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून आर्थिक मदत मिळू लागली आहे. १९७२ पासून ‘यूरोपीय आर्थिक संघटना’ (ईईसी) चा मॉरिशस सदस्य झाला आहे. प्रशासन, शिक्षण, आरोग्य, घरे, सामाजिक सेवा व सुरक्षितता, सार्वजनिक कामे, कृषी व जंगल विकास, वाहतूक आणि दळणवळण, वेगवेगळ्या आर्थिक सेवा ह्या शासनाच्या महत्त्वाच्या खर्चाच्या बाबी आहेत.


परकीय गुंतवणुकीच्या प्रोत्साहनार्थ मॉरिशस शासनाकडून खास अशा विविध सोयी व सवलती दिल्या जातात. निगम करात १० वर्षांपर्यंत सवलत, भांडवली वस्तू व कच्चा माल यांवरील आयात करात सूट, नफा मायदेशी पाठविण्यास परवानगी, पाच वर्षांपर्यंत लाभांशावरील करात सूट इ. प्रकारच्या ह्या सवलती होत. फ्रेंच, दक्षिण आफ्रिकन, पश्चिम जर्मन व भारतीय हे प्रामुख्याने मॉरिशसमध्ये गुंतवणूक करतात. कृषी व औद्योगिक उत्पादन वाढ, औद्योगिक विकास, निर्यातीत वाढ, पर्यायी शक्तिसाधनांचा विकास ही शासनाच्या १९८२–८६ मधील विकास योजनेची मुख्य उद्दिष्टे आहेत. 

वेगवेगळ्या प्रकारचे कर, व्याज, नफा, लाभांश, वेगवेगळ्या वस्तू व सेवांच्या पुरवठ्यापासून मिळणारे उत्पन्न या शासनाच्या उत्पन्नाच्या प्रमुख बाबी आहेत. देशात उद्‌गामी पद्धतीने १५ ते ७० टक्क्यांपर्यंत वैयक्तिक उत्पन्न कर आकारला जातो. विशेष विकास कर सवलत दिलेल्या कंपन्या वगळता इतर कंपन्यांच्या करपात्र उत्पन्नावर ५० ते ६० टक्क्यांपर्यंत कर आकारला जातो. १९८३ पासून विक्रीकर ५% आकारण्यात आला आहे.याशिवाय जुगार, आर्थिक व्यवहार, उत्पादन आणि उपभोग, वाहतूक व आंतरराष्ट्रीय प्रवास यांवरही कर आकारला जातो. १९८१–८२ मध्ये देशात आयात, निर्यात व जकात करांपासून एकूण १,५९०·२ द. ल. रुपये उत्पन्न मिळाले. साखरेवरील निर्यातकर हा शासनाच्या उत्पन्नाचा मार्ग असून १९८२·८३ मध्ये साखरेवरील निर्यात करापासून ४१० द. ल. रुपये उत्पन्न शासनाला मिळाले.

वाहतूक व संदेशवहन: मॉरिशसमध्ये एकूण १,७७० किमी. लांबीचे रस्ते असून त्यांपैकी ९०% रस्त्यांचे डांबरीकरण झालेले आहे. १९८३ मध्ये जागतिक बँकेने रस्ते विकासासाठी १५·२ द. ल. अमेरिकी डॉलर इतके कर्ज दिले आहे. देशात एकूण ५०,२४६ खाजगी वाहने (मोटारगाड्या, मोटारसायकली, स्कूटर इ.), २०,४०६ व्यापारी वाहने (मोटारगाड्या, बसगाड्या इ.) व २,५६८ सरकारी वाहने होती (१९८३). पोर्ट लूई ह्या खोल सागरी बंदराचे आधुनिकीकरण १९८० पर्यंत पूर्ण करण्यात आले असून त्याच वर्षी येथून २०,२५,००० टन माल हाताळण्यात आला. रोड्रीगेस बेटावरील मॅथुरिन या खोल सागरी बंदराची निर्मिती करण्यात आली असून (१९८०) माएबूर येथेही बंदराचा विकास करण्याची सरकारची योजना आहे. यूरोप मॉरिशस यांदरम्यानची प्रवासी व मालवाहतूक सेवा ब्रिटिश, फ्रेंच व स्कँडिनेव्हिअन कंपन्यांकडून नियमित पुरविली जाते. डच कंपनी आशिया, दक्षिण आफ्रिका व दक्षिण अमेरिकेच्या बंदरांशी प्रवासी व मालवाहतूक सेवा पुरविते. भारताशी मालवाहतूक सेवा चालू आहे. स्थानिक कंपनी मॉरिशस ते रोड्रीगेस, मादागास्कर, आफ्रिकी देश व ऑस्ट्रेलिया यांदरम्यानची वाहतूक सेवा पुरविते. ट्रौ फॅनफॅरॉन या मासेमारी बंदराच्या विकासाचे काम १९८३ पासून सुरू झाले आहे. हवाई सेवा पुरविण्याचे काम आठ कंपन्यांद्वारे केले जाते. त्यांपैकी एअर मॉरिशस या हवाई वाहतूक कंपनीत ४२% भाग शासनाचा आहे. ही कंपनी मॉरिशस बेटावरील मुख्य विमानतळ प्लाईसान्स ते रोड्रीगेस यांदरम्यान आठवड्यातून सहा वेळा हवाई वाहतूक सेवा देते. प्लाईसान्स विमानतळाचे आधुनिकीकरणाचे काम १९८४ पासून सुरू झाले असून ते तीन टप्प्यांत पूर्ण व्हावयाचे आहे. मॉरिशस बेटावर सर्वत्र टपाल, तार आणि दूरध्वनी सेवा पुरविण्यात आल्या आहेत. शासननियंत्रित ‘मॉरिशस ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन’ कडून रेडिओ आणि दूरचित्रवाणी कार्यालय प्रसारित केले जातात. देशात ३८,५६१ दूरध्वनी संच (१९८१), ७,१९,११२ रेडिओ संच व ९१,०१९ दूरचित्रवाणी संच वापरात होते (१९८४).

लोक व समाजजीवन : देशाच्या ९,८३,६८५ या एकूण लोकसंख्येपैकी ९,४९,६८६ मॉरिशस बेटावर, ३३,६४९ रोड्रीगेस बेटावर व बाकीच्या सर्व बेटांवर मिळून ३५० लोकसंख्या आहे. लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ४८२ आहे. मॉरिशस बेटावरील जन्मप्रमाण दर हजारी २२·४, मृत्युप्रमाण ६·८ असून तेथील लोकसंख्यावाढीचा वेग १५·६ आहे. रोड्रीगेस बेटावर जन्मप्रमाण दर हजारी ३८·१ व मृत्युप्रमाण दर हजारी ६·३ असून तेथील लोकसंख्यावाढीचा वेग ३१·८ होता (१९८२ अंदाज). मॉरिशस बेटाच्या किनारी जिल्ह्यांत, विशेषतः उत्तर व पूर्व भागांत, ग्रामीण लोकसंख्या अधिक आहे. याच भागात प्रथम वसाहती झाल्या होत्या. बेटाच्या वातविमुख म्हणजेच पश्चिम भागात पोर्ट लूई, तर वातसन्मुख म्हणजेच पूर्व भागात माएबूर ही सुरुवातीच्या काळात स्थापन झालेली नगरे आहेत. १८६६६८ या काळातील हिवतापाच्या साथीमुळे बऱ्याचशा नगरवासियांनी अंतर्गत भागात स्थलांतर केले होते.

मॉरिशसची लोकसंख्या संमिश्र स्वरूपाची आहे. इंडो मॉरिशियन हा येथील प्रमुख वांशिक गट असून त्यांचे एकूण लोकसंख्येतील प्रमाण सु. ६८% आहे. हा वांशिक गट म्हणजे भारतीय स्थलांतरित व त्यांचे वंशज होत. उरलेल्या लोकसंख्येत २७% लोक क्रीओल, ३% चिनी व २% फ्रेंच होते (१९८२). १९७२ च्या जनगणनेनुसार मॉरिशस बेटावरील एकूण लोकसंख्येपैकी ५१% हिंदू धर्मीय, ३१·३% ख्रिश्चन व १६·६% मुस्लिम लोक होते. तर रोड्रीगेस बेटावरील ९७% लोक ख्रिश्चन धर्मीय (रोमन कॅथलिक पंथीय) आहेत. महाशिवरात्र, गणेश चतुर्थी, दिवाळी हे हिंदू सण येथे साजरे केले जातात. मॉरिशसमधील फारच थोडे लोक परदेशांत, विशेषतः ऑस्ट्रेलिया, कॅनडा व यूरोपकडे, जातात. १९८३ मध्ये काही मॉरिशियन कामगार करारावर बहारीन, सिसिली, सौदी अरेबिया व आयव्हरी कोस्ट या भागांत होते.

कौटुंबिक भत्ता कार्यक्रमांतर्गत शासनाने ३१,५३२ कुटुंबांना एकूण २०·७ द. ल. रुपये रक्कम वाटली व ६७,३४५ लोकांना निवृत्तिवेतनापोटी एकूण ९१·०३ द. ल. रुपये रक्कम दिली. लोकसंख्यावाढ रोखण्याच्या दृष्टीने शासन कुटुंबनियोजन कार्यक्रमाचा पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे १९५० मध्ये असलेला ३·५% हा लोकसंख्यावाढीचा वार्षिक दर १९८१ मध्ये १·३ टक्क्यांपर्यंत खाली आला. देशात एकूण ३४ समाजकल्याण केंद्रे असून ती मुख्यतः ग्रामीण भागात आहेत.

मॉरिशसमध्ये एकूण ८ सर्वसाधारण रुग्णालये, ५ विशेष रुग्णालये, ११ खाजगी रुग्णालये, ५१ शासकीय दवाखाने, २४ साखर कारखान्यांवरील दवाखाने, ६८ प्रसूती, बालआरोग्य व कुटुंबनियोजन केंद्रे तसेच ३४० शासकीय सेवेतील डॉक्टर, २२२ खाजगी व्यवसाय करणारे डॉक्टर, ६९ दंतवैद्यक, ७३ औषधनिर्माते, १,४५८ परिचारिका व ५६९ प्रसाविका होत्या (१९८१). सरासरी अंदाजे आयुर्मान स्त्रियांच्या बाबतीत ६९ वर्षे व पुरुषांच्या बाबतीत ६५ वर्षे असून बालमृत्युप्रमाण दर हजारी ३३ होते (१९८०).  


इंग्रजी ही देशातील अधिकृत भाषा आहे. क्रीओल ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. रोड्रीगेस बेटावरील बहुतेक सर्व लोक क्रीओल हीच भाषा बोलतात. त्याशिवाय हिंदी व इतर भारतीय भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाणही बरेच आहे. १९७२ च्या जनगणनेनुसार मॉरिशस बेटावर ३८·८% हिंदी, ३२·९% क्रीओल, ८·७% उर्दू, ६·९% तमिळ व ४·४% फ्रेंच आहे असे विविध भाषा बोलणारे लोक होते. यांशिवाय गुजराती, मराठी, तेलुगू, बिहारमधील भोजपुरी या भारतीय भाषाही प्रचलित आहेत. चिनी लोक चिनी भाषा व विशेषतः कँटनीझ भाषा बोलतात. देशातून ९ दैनिक वृत्तपत्रे व साप्ताहिके प्रसिद्ध होतात. त्यांपैकी एल् एक्सप्रेस, ले मॉरिसिअनअँडव्हान्स ही प्रमुख दैनिके पोर्ट लूई येथून फ्रेंच (क्रीओल) व इंग्रजीतून प्रसिद्ध होत असून त्यांचा खप अनुक्रमे २२,००० १८,५०० व ८,००० आहे (१९८१). मॉरिशस इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लायब्ररी, मॉरिशस आर्काइव्ह्‌ज, युनिव्हर्सिटी ऑफ मॉरिशस व पोर्ट लूई सिटी ही देशातील प्रमुख ग्रंथालये आहेत. मॉरिशस इन्स्टिट्यूट व मॉरिशस आर्काइव्ह्‌ज ह्या दोन सांस्कृतिक संस्था आहेत. मॉरिशस इन्स्टिट्यूटतर्फे पोर्ट लूई येथील निसर्गेतिहास संग्रहालय चालविले जाते. माएबूर येथे एक ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय आहे.

देशात महाविद्यालयीन पातळीपर्यंत शिक्षण मोफत आहे. मात्र ते सक्तीचे नाही. साक्षरतेचे प्रमाण पुरुषांमध्ये ९०% व स्त्रियांमध्ये ७९% होते (१९८०). साक्षरतेचे १९८३ मधील सरासरी प्रमाण ९०% होते. शाळेत जाऊ शकणाऱ्या वयोगटातील ९५% मुले शाळेत दाखल होतात. देशातील एकूण १,३६९ पूर्व-प्राथमिक शाळांत ३४,५९५ विद्यार्थी २६८ प्राथमिक शाळांत १,३३,२५५ विद्यार्थी १२७ माध्यमिक शाळांत ७५,९६३ विद्यार्थी ५ व्यावसायिक व तांत्रिक शाळांत १८२ विद्यार्थी २ औद्योगिक व्यापार प्रशिक्षण केंद्रांत २६२ विद्यार्थी होते. एका तंत्रनिकेतन संस्थेत २०६ विद्यार्थी व मॉरिशस विद्यापीठात ४०४ विद्यार्थी शिक्षण घेत होते (१९८३). देशात खाजगी माध्यमिक शाळांचे प्रमाण बरेच होते, परंतु १९७७ मध्ये शासनाने अप्रत्यक्षपणे त्या आपल्या ताब्यात घेतल्या. येथील माध्यमिक शिक्षण उच्च दर्जाचे आहे. मॉरिशस विद्यापीठ, मॉरिशस शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय व महात्मा गांधी संस्था या उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत.

महत्त्वाची स्थळे: राजधानी पोर्ट लूई हे देशातील सर्वांत मोठे शहर तसेच प्रमुख व्यापारी व प्रशासकीय केंद्र आहे. त्याखालोखाल बो बार्सी/रोस हिल (लोक. ८७,११७), कुरपीप (५७,१९१), कात्र बॉर्न (५६,२९१) व व्हाकोआस/फीनिक्स (५५,४९४) ही मॉरिशस बेटावरील प्रमुख शहरे तसेच व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे आहेत. परकीय चलन मिळवून देणारा पर्यटन हा देशातील तिसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा व्यवसाय आहे. किनाऱ्यावरील सुंदर पुळणी, निसर्गसुंदर पर्वतीय प्रदेश, आल्हाददायक हवा आणि अनेक संस्कृतींचे आढळणारे मिश्रण ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. देशात १९८३ मध्ये १,२३,८२० पर्यटक येऊन गेले व त्यांच्यापासून देशाला ५०१ द.ल. रुपयांचे उत्पन्न मिळाले. तसेच या व्यवसायामुळे दहा हजारांवर लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यूरोपमधील बऱ्याच देशांतील लोकांना मॉरिशसमध्ये येण्यास परवाना काढावा लागत नाही. फ्रान्स, मादागास्कर, रेयून्यों व दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त असते. 

चौधरी, वसंत

मॉरिशस