हुबळी : कर्नाटक राज्यातील एक शहर आणि याच नावाच्याजिल्ह्याचे ठिकाण. हे कर्नाटकातील धारवाडच्या आग्नेय दिशेस२० किमी. अंतरावर राष्ट्रीय महामार्ग चारवर असून उत्तर कर्नाटक विभागातील एक प्रमुख व्यापारी व औद्योगिक केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. लोकसंख्या १३,४९,५६३ (२०११). हुबळी या शब्दाचा कन्नडभाषेतील अर्थ बहरलेली वेल असा आहे. कर्नाटकातील बेंगळुरु शहरानंतर हुबळी-धारवाड हे दुसऱ्या क्रमांकाचे जुळे संकलित नगर विकसित झाले आहे. हुबळी हे जिल्ह्याचे ठिकाण, तर धारवाड त्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. हुबळी-धारवाड अशी संयुक्त महानगरपालिका शहराचे प्रशासन चालविते. भौगोलिक दृष्ट्या हुबळी हे दख्खन पठाराचा एकभाग आहे. 

 

जुने हुबळी म्हणजे रायरा हुबळी होय. त्यास एलेया पुर्वदा हल्लीकिंवा पुरर्बली असेही म्हणतात. विजयानगर साम्राज्यांतर्गत रायरा हुबळीहे लोह उद्योग केंद्र म्हणून अस्तित्वात आले. आदिलशाही राजवटीत इंग्रजांनी या ठिकाणी एक वखार उभारली. १६७३ मध्ये या वखारीवर स्वारी करून छ. शिवाजी महाराजांनी वखार लुटली. नंतर मोगलांनी या शहराचा ताबा घेतला. हे शहर सावनूरच्या नवाबाच्या आधिपत्याखाली आले. त्याने या शहरात मश्जिदपुरा नावाची वसाहत निर्माण केली. नंतर बसप्पा शेट्टार या व्यापाऱ्याने नवीन हुबळी शहर वसविले. १७५५-५६ मध्ये सावनूर नवाबाच्या ताब्यातून हुबळी हे शहर मराठ्यांनी जिंकून घेतले. दुसऱ्याच वर्षी हैदर अलीने हे शहर पुन्हा ताब्यात घेतले परंतु १७९० मध्ये हे शहर मराठ्यांनी पुन्हा ताब्यात घेतले. १५ ऑगस्ट १८५५ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली. १८८० मध्ये इंग्रजांनी या ठिकाणी रेल्वे वर्कशॉप सुरू केले. नंतर हा भाग प्रमुख उद्योगकेंद्र म्हणून अस्तित्वात आला आणि शहराच्या विकासास सुरुवात झाली. हुबळी परिसरातीलकृषी क्षेत्रात कापूस व भुईमूग ही पिके मोठ्या प्रमाणात घेतली जातात. सरकी आणि भुईमूग या पिकांआधारे तेलप्रक्रिया उद्योग येथे विकसित झाला आहे. हुबळी येथे दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय असून उत्तर कर्नाटकातील ते एक प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. शैक्षणिक दृष्ट्याहे शहर प्रगत असून येथे कर्नाटक मेडिकल कॉलेज, कर्नाटक राज्यविधी विद्यापीठ, के. एल्. ई. कॉलेज ऑफ बिझिनेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्था आहेत. चंद्रमौलेश्वर मंदिर, नृपतृंगा हिल, गंगुबाई हनगळ सांगितिक स्मृती संग्रहालय, गायत्री तपोवन इ. महत्त्वाची स्थळे येथे आहेत. 

सैंदाणे, मनोहर मोतीराम