ट्युनिस : उत्तर आफ्रिकेतील ट्युनिशिया देशाची राजधानी. लोकसंख्या ६,८५,००० (१९६६). प्राचीन कार्थेजपासून सु.१५ किमी., भूमध्य समुद्राकाठी मोक्याच्या जागी, काहीशा उंच संयोगभूमीवर वसलेले हे शहर सु. १० किमी.वरील हल्क-अल् वाडी (ला गूलेट) या त्याच्या बंदराशी ७ मी. खोल खाडीने जोडलेले आहे. येथील हवामान भूमध्यसामुद्री असून वार्षिक सरासरी तपमान व पर्जन्य अनुक्रमे १७·७° से. व ३७·५ सेंमी. आहे.

हे पूर्वी कार्थेजबरोबर अनेकदा उद्ध्वस्त झाले. इ. स. पू. ८०० पासून फिनिशियन, रोमन, अरब, तुर्की, स्पॅनिश वगैरेंच्या आधिपत्याखाली होते. १८८१ ते १९५६ पर्यंत ते फ्रेंच संरक्षणाखाली राहिले. १९५६ मध्ये ट्युनिशिया स्वतंत्र झाल्यावर ते त्या देशाची राजधानी झाले

ट्युनिस : एक दृश्य.

जुने ट्युनिस कसबा किल्ल्यापासून टेकडीच्या उतारावर वसले असून मदीना हा त्याचा मुख्य भाग आहे. आधुनिक ट्युनिस टेकडी व ट्युनिस सरोवर यांमधील सखल भागावर वसले आहे. येथे प्रशस्त रस्ते, हवेशीर घरे, उंच इमारती व आधुनिक सुखसोयी आहेत. जुन्या भागात अरुंद बोळ, एकमजली बिनखिडक्यांची चौकोनी घरे, ‘सुक’ नावाचे छपरबंद बाजार, अझ झैतूनासारख्या प्राचीन मशिदी, जुने मुस्लिम विद्यापीठ इ. आहेत. रोमन वास्तुशैलीची स्नानगृहे प्रसिद्ध आहेत. लोकवस्ती फ्रेंच, इटालियन आणि मुस्लिम अशी संमिश्र आहे.

ट्युनिसभोवती ऑलिव्ह व इतर भूमध्यसामुद्री फळे व धान्ये पिकतात. गावात पीठगिरण्या, साबण, ऑलिव्ह तेल, फळे डबाबंद करणे, टिकविणे, व सुकविणे, मद्ये, कापड, गालिचे, सिमेंट, बांधकाम साहित्य, धातुशुद्धी, सुपरफॉस्फेटसारखे रासायनिक पदार्थ, खाणीसाठी स्फोटके, यंत्रे, अत्तरे, पादत्राणे, विणलेले कपडे, रेल्वे कर्मशाळा, वीजउद्योग, औष्णिक वीजकेंद्रे इ. कारखाने व उद्योग आहेत. ट्युनिसहून फॉस्फेट, लोहधातुके, फळे, खजूर, ऑलिव्ह तेल, कागदासाठी एस्पार्टो गवत, स्पंज, स्थानिक गालिचे, मातीची भांडी इ. निर्यात होतात. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून, हे देशातील व शेजारी देशांतील शहरांशी लोहमार्गांनी व सडकांनी जोडलेले आहे. दवाखाने, रुग्णालये, सांस्कृतिक केंद्रे, शाळा, ट्युनिस विद्यापीठ (१९१६), नगरपालिका इ. सोयी आहेत. येथील पर्यटन व्यवसाय वाढत आहे.

लिमये, दि. ह. कुमठेकर, ज. ब.