हिमलोट : पर्वतावरील उतार किंवा कडा यांवरून जलद गतीने खाली येणाऱ्या बर्फ किंवा हिमराशीला हिमलोट म्हणतात. पुष्कळदा हिमलोटात खडक, माती, झाडे-झुडपे इत्यादींची डबरही मोठ्या प्रमाणात वेगाने खाली येते आणि त्यामुळे तिच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक बाबीला ती झपाट्याने खाली घेऊन येते व भरडून काढते. बहुधा हवामानाच्या परिस्थितीमुळे उतारावरील हिम अस्थिर होते. जेव्हा द्रव्याची अशी राशी उताराच्या पृष्ठभागाकडून होणाऱ्या घर्षणाच्या विरोधावर मात करते तेव्हा हिमलोटास सुरुवात होते. पुष्कळदा या राशीचा पाया वसंत ऋतूतील पावसाने सैलसर झाल्याने अथवा पर्वताच्या वातविमुख बाजूवरील उबदार, शुष्क वाऱ्याने (फोएनने) पाया जलदपणे वितळून गेल्याने अशी सुरुवात होते. तोफेचा भडिमार, ढगांचा गडगडाट, भूकंप किंवा स्फोट यांसारख्या मोठ्या गोंगाटातून निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे सदर राशीला घसरण्यासाठी गती मिळू शकते.

 

खडकांच्या अशा मोठ्या लोटांमुळे वा स्खलनांमुळे (शिलापातांमुळे) नदी बंधाऱ्याप्रमाणे अडविली गेली आहे व गावे गाडली गेली आहेत ( उदा., माळीण गावाप्रमाणे) . अशा शिलापातात सामान्यपणे आधार-शिलेचे काही सेंमी. व्यासाचे तुकडे, तसेच पुष्कळ प्रमाणात माती वधूळ असते. शिलापात संपीडित (दाब पडलेल्या) हवेच्या उशीवर स्वार झालेले असतात, असे मानतात. त्यामुळे असे शिलापात दूर अंतरापर्यंतपुढे जाऊ शकतात. घनीभवन (घट्ट) न झालेल्या जमिनीमधील द्रव्यांत जेव्हा ती आर्द्रतेमुळे दुर्बल (सैल) होतात, तेव्हा बहुधा डबरीचा लोट वा पात घडतो.

 

काही हिमलोट तीव्र हिमवादळांत घडतात व हिमवृष्टी होत असता-नाही त्यांची घसरण होते परंतु पुष्कळ वेळा विशिष्ट जागी हिमसंचय झाल्यानंतर हिमलोट घडून येतात. हिमलोटाचे एक कारण पुढीलप्रमाणे आहे : वर्षभरात साचलेल्या हिमाखाली सावकाशपणे नीहार (होअर) चा थर जमणे हे कारण होय. नीहार हे बर्फाचे षट्कोणी कपासारखे स्फटिक असून जमिनीच्या पातळीपाशी त्यांची निर्मिती सुरू होते. मूळ हिमकणांच्या बाष्पीभवनातून व त्याचबरोबर जमिनीलगतच्या अधिक मोठ्या, अधिक दाट बर्फाच्या स्फटिकांच्या वाफेच्या साचण्यातून सैलसर हिमसमुच्चयात नीहार स्फटिक विकसित (तयार) होतात. अशा प्रकारे हिमावरणामध्ये जमिनीलगत दुर्बल क्षेत्रविभाग तयार होतो. जेव्हा हिमाचे वरचे थर पर्वतावरून खाली घसरायला सुरुवात होते, तेव्हा या क्षेत्रविभागातील कण वंगणाचे काम करतात.

 

ओला हिमलोट कदाचित सर्वांत धोकादायक असतो कारण याचे वजन खूप जास्त असते आणि हालचाल थांबली की, लगेच घनरूप होण्याची त्याची प्रवृत्ती असते. शुष्क हिमलोटही धोकादायक असतो कारण तो चूर्णरूप हिमाचा असून त्यातील हवेच्या मोठ्या प्रमाणामुळे तो द्रायूप्रमाणे( द्रवांप्रमाणे व वायूप्रमाणे) कार्य करतो (वागतो) . अशा प्रकारचा हिमलोट अरुंद दरीच्या विरुद्ध बाजूपर्यंत वरच्या दिशेत वाहत जातो. ओला हिमलोट शुष्क हिमलोटापेक्षा कमी गतीने खाली येतो. शुष्क हिमलोटाची गती ताशी १६० किमी.पर्यंत असू शकते. लादी हिमलोटात हिमाचा घनरूप भाग तुटून लादीच्या रूपात सुटा होतो व लादी घसरताना तिचे तुकडे होतात. हिमलोटांत हिमाबरोबर खडकाची डबर मोठ्या प्रमाणात वाहून नेली जाऊ शकते.

 

गिर्यारोहक, बर्फावर घसरण्याचा खेळ खेळणारे, प्रवासी आणि पर्वतीय भागात राहणारे लोक हिमलोटांपासून होऊ शकणाऱ्या धोक्यांकडे मोठ्याप्रमाणात लक्ष देतात. स्वित्झर्लंडमधील स्नो अँड ॲव्हलांच रिसर्च इन्स्टिट्यूट येथे पुष्कळ मूलभूत संशोधन केले जाते व संरक्षणात्मक प्रयुक्त्यांचे परीक्षण केले जाते व चाचण्या घेतल्या जातात. स्वित्झर्लंडच्या बहुतेक भागांत हिमलोट प्रतिबंधक बांधकामे केली आहेत. असे असले, तरी तीव्र व जोरदार हिमवृष्टीनंतरच्या काळांत विनाशक हिमलोटाच्या घटना घडत असतातच. काही अधिक जुन्या स्विस गावांमध्ये उघड्या क्षेत्रातील इमारती हिमोढांनी झपाट्याने आक्रमिल्या जाऊ शकतील. त्यामुळे वाहत्या हिमाला पर्यायी वाटेने वळविण्यासाठी त्या जहाजाच्या नाळेप्रमाणे (पुढील भागाप्रमाणे) बांधल्या आहेत. हिमलोटांपासून संरक्षणाचा एक मार्ग म्हणजे हिम मोठ्या प्रमाणावर साचण्याआधी हिमलोटाच्या पट्ट्यातील वरच्या भागात स्फोटकांद्वारे स्फोट घडवून आणतात. त्यांमुळे मोठा हिमलोट होण्याआधी हिम मुद्दाम खाली घसरवून त्याचा थर कमी केला जातो. तसेच उतारावर झाडे लावून वा अडसर बांधूनही हिमलोटांचे नियंत्रण करतात.

 

गोडसे, एम्. व्ही.