गालॅपागस बेटावरील प्रचंड कासव

गालॅपागस बेटे : दक्षिण अमेरिकेच्या एक्वादोर देशाची पॅसिफिक महासागरातील बेटे. क्षेत्रफळ ७,८४४ चौ. किमी. लोकसंख्या ३,६०० (१९७० अंदाज). ही बेटे एक्वादोरच्या सु. ८००–१,१०० किमी. पश्चिमेस व पनामा कालव्याच्या १,६०० किमी. नैर्ऋत्येस असून पॅसिफिकच्या ६१,५७,००० चौ. किमी. क्षेत्रात पसरली आहेत. या द्वीपसमूहात पंधरा मोठी व अनेक लहान बेटे असली, तरी इझाबेला अथवा आल्बेमार्ले या १२०  किमी. लांबीच्या बेटानेच ५,६०९ चौ. किमी. प्रदेश व्यापला असून १,७०७ मी. उंचीचे सर्वोच्च शिखर याच बेटावर आहे. इझाबेलाशिवाय सान क्रीस्तोबाल अथवा चॅतम (५०६ चौ. किमी.) व सांताक्रूझ अथवा इंदेफॅटिगेबल (१,००८) ही मनुष्यवस्ती असलेली आणि सँटिआगोअथवा सान साल्व्हादोर (५२६), फेर्नांदीना अथवा नारबरो (६३६), हेनोव्हेसा अथवा टॉवर (१३), बाल्त्रा (२१), एस्पान्योला अथवा हूड (४७) ही इतर मोठी बेटे होत. सान क्रीस्तोबालवरील त्याच नावाचे शहर गालॅपागसचे शासकीय केंद्र आहे. बेटे ज्वालामुखीनिर्मित असून अद्यापही येथे ज्वालामुखी उद्रेक होतात. विषुववृत्तावर असूनही हंबोल्ट हा थंड महासागरी प्रवाह जवळून जात असल्याने येथील हवामान सौम्य असते. वार्षिक पर्जन्य ७–१० सेंमी. व सरासरी तपमान २१–२९ से.असून थंडीमध्ये येथे दाट धुके पडते व वादळे होतात. विविध प्रकारचे निवडुंग, काटेरी झुडपे, लहान पानझडी वृक्ष, सूर्यफूल व पेरू हे येथील वनस्पतिप्रकार असून काही विलक्षण प्राण्यांमुळे ही बेटे जगप्रसिद्ध झाली आहेत. पनामाचा पाद्री बार्लींगा याने १५३५ साली या बेटांचा शोध लावला, तेव्हा ही निर्मनुष्य होती. त्यावेळी लास एन्‌कांटाडास नावाने ही प्रसिद्ध होती परंतु येथील माणसाला वाहून नेणारी कासवे पाहून यांस स्पॅनिशांनी गालॅपागस नाव दिले. १८३२ मध्ये ही एक्वादोरकडे आली. १८३५ साली या बेटांवरील प्राण्यांचा अभ्यास करून डार्विनने जगाचे इकडे लक्ष वेधले. ४०० वर्षे वयाची व २०० किग्रॅ. हून अधिक वजनाची कासवे, एक मीटरहून जास्त लांबीच्या घोरपडी व सरडे, चार डोळ्यांचा मासा, वेगळ्या प्रकारचा पेंग्विन, उडता न येणारा प्रचंड करढोक व ॲल्बट्रॉस, तेरा प्रकारचे फिंच पक्षी, मासे इ. प्राणी आजही येथील अभयारण्यामध्ये पहावयास मिळतात. साहजिकच गालॅपागस शास्त्रज्ञांचे मोठे आकर्षण आहे.

शाह, र. रू.