बॅरेंट्स समुद्र : आर्क्टिक महासागराचे ६७° उ. ते ८०° उ. आणि १८° पू. ते ६८° पू. यांदरम्यान असणारे क्षेत्र बॅरेंट्स समुद्र म्हणून ओळखले जाते. त्याचे क्षेत्रफळ सु. १४,०५,००० चौ. किमी. असून त्याची दक्षिणोत्तर लांबी सु. १,४०८ किमी. व पूर्व-पश्चिम रुंदी सु. १,५१३ किमी. असून सरासरी खोली २२९ मी. आहे. कारा समुद्र व बॅरेंट्स समुद्रांदरम्यानची पूर्व सीमा ही नॉव्हायाझीमल्या व वायगाश या बेटांनी बनली आहे याच्या नैऋत्येस नॉर्वे, दक्षिणेस यूरोपीय रशिया, पश्चिमेस नॉर्वेची खालबार बेटे आणि उत्तरेस रशियाचा फ्रान्झ जोझेफ लँड हा भाग आहे.

 

या समुद्राची तळरचनाही याच्या लगतच्या भू-प्रदेश रचनेसारखी आढळते. नैर्ऋत्य भागात नॉर्वेजियन समुद्राच्या सरहद्दीनजीक याची कमाल खोली ६०० मी आहे. सागरतळाशी पूर्व-पश्चिम असा ४८८ ते ६१० मी. खोलीचा ‘ब्यर्नया आयलंड’ हा खंदक आहे. शिवाय दक्षिण, उत्तर व ईशान्य भागांतही लहान-लहान खंदक आहेत. या समुद्राच्या उत्तर व आग्नेय भागांत उथळ समुद्रबूड जमिनीचे प्रमाण अधिक असून, आग्नेय भागात येथील सर्वात मोठे कल्गूयिफ हे बेट आहे. या सागराचा पश्चिम किनारा खडकाळ व समुद्रकड्यांनी युक्त असून, तो फ्योर्डसमुळे दंतुर बनलेला आहे. मात्र कान्यिन द्वीपकल्पाच्या पूर्वेकडील किनारा उथळ उपसागर व खाड्या यांमुळे मंद उताराचा बनला आहे तर स्वालबार द्वीपसमूहालगतचा किनारा उंच व सरळ आहे.

 

या समुद्रात गाळ संचयनाचे प्रमाण अल्प म्हणजेच १,००० वर्षात १ ते ३ सेंमी. आहे. याचे कारण पेचोराव्यतिरिक्त मोठ्या नद्या यास मिळत नाहीत. येथील १०० मी. पर्यंतच्या खोलीवरील गाळामध्ये रेती, वाळू, दगडगोटे यांचे प्रमाण अधिक असून सामान्यतः फिकट भुऱ्या रंगाचा हा गाळ दक्षिण भागात काहीसा हिरवट. आग्नेय भागात काहीसा पिवळसर व मध्यभागी काहीसा तपकिरी रंगाचा असतो. सर्वाधिक खोलीवरील व ७६° अक्षवृत्तापलीकडील गाळाचा रंग गर्द तपकिरी असतो.

 

या सागरी प्रदेशाचे हवामान उप-आर्क्टिक प्रकारचे असून उत्तर व नैर्ऋत्य भागांत हिवाळ्यातील व उन्हाळ्यातील सरासरी तपमान अनुक्रमे–२५° से. ते–५° से. व ०° से. ते १०° से. असते. येथील हवामानावर आर्क्टिक महासागरावरील प्रत्यावर्त व अटलांटिकमधील आवर्त वाऱ्‍याचा परिणाम झालेला दिसतो. याच्या दक्षिण भागात वार्षिक सरासरी वृष्टी ५० सेंमी होते. अटलांटिकमधील उष्ण पाण्याच्या गल्फ प्रवाहाची शाखा नॉर्थ केप व ब्यर्नया बेट यांदरम्यान प्रवेश करते. ती शाखा येथे ‘नॉर्थ केप प्रवाह’ म्हणून ओळखली जाते. या प्रवाहामुळे दक्षिण किनाऱ्यावरील पाण्याचे व हवेचे तपमान वाढून परिणामतः मुरमान्स्क व टयेरीब्येर्क (रशिया), व्हारड (नॉर्वे) ही बंदरे वर्षभर बर्फमुक्त राहतात.

 

या सागरात अटलांटिकमधून येणाऱ्या पाण्याचे तपमान ४° ते १२° से. व क्षारता दर हजारी ३५ पर्यंत असते, परंतु ते येथील पाण्यात मिसळल्यानंतर त्याचे तपमान व क्षारता कमी होते. आर्क्टिक महासागराच्या पाण्याबरोबर येथे बर्फही येत असते. हिवाळ्यात या सागरात हिमनग तरंगताना दिसतात. मात्र याच्या दक्षिण भागात पाणी गोठत नाही. तसेच उत्तरेकडील थंड प्रवाह व हवा आणि दक्षिणेकडील उबदार प्रवाह व हवा नॉव्हायाझीमल्याच्या पश्चिमेस एकमेकांस मिळतात. त्यामुळे तेथे धुके निर्माण होते.

 

अटलांटिकवरून येणाऱ्या आवर्तांमुळे वादळे निर्माण होतात. दक्षिण भगातील वादळी लाटांची कमाल उंची नॉर्थ केपजवळ ४ मी. असून गॉर्लो सामुद्रधुनीत व मुरमान्स्क किनाऱ्याजवळ त्यांची उंची ७ मी. पर्यंत असते. लाटांच्या उंचीचे प्रमाण हे नॉव्हायाझीमल्या व स्वालबार बेटांजवळ कमी आहे.

 

समुद्रतळावरील गाळात गार्नेट, इल्मेनाइट, मॅग्नेटाइट, पायरोक्सीन इ. जड खनिजे सापडत असून त्यांचे प्रणाम १ ते २ टक्के , तर किनारी भागात व उथळ सागरी भागात ते ५ टक्क्यांपर्यंत असते. तसेच क्वॉर्ट्झ, फेल्सपार इ. हलकी खनिजेही येथे मिळतात.

 

अटलांटिकमधील उष्ण प्रवाहाच्या शाखेमुळे येथे मत्स्योत्पादनास पोषक परिस्थिती निर्माण झाली असून, हेडॉक, कॉड, हेरिंग, मांजरमासा सॉलमन, प्लेस इ. विविध जातीचे मासे येथे विपुल प्रमाणात आढळतात. मासेमारीच्या दृष्टीने या समुद्राचे महत्त्व वाढत आहे. उत्तर समुद्रात मत्स्योत्पादन कमी होऊ लागल्यानंतर रशियन, नॉर्वेजियन व ब्रिटिश मच्छीमार आता आपले मोर्चे बॅरेंट्स समुद्राकडे वळवू लागले आहेत. हिवाळ्यात अत्यंत हालअपेष्टा सोसूनही हे लोक येथे मासेमारी करतात. दक्षिण भागातील उथळ समुद्रबूड जमिनीवर अनेक वनस्पती आढळतात. तसेच तांबडे, हिरवे व तपकिरी असे विविधरंगी शैवल येथे आढळते. याच्या किनारी भागात विविध प्रकारचे समुद्रपक्षी दिसून येतात.

 

नवव्या शतकात व्हायकिंग व बाराव्या शतकात रशियन लोकांनी या समुद्रात प्रथम प्रवास केला. सोळाव्या शतकात इंग्रज व डच लोकांनी ईशान्य मार्गाच्या (नॉर्थ ईस्ट पॅसेज) शोधार्थ येथे प्रवेश केला होता. याच मार्गाच्या शोधार्थ डच प्रवासी ⇨ व्हिलेम बॅरेटस् याने १५९४ ते ९७ अशा तीन सफरी केल्या. त्याचेच नाव या समुद्रास दिलेले आहे. जर्मन शास्त्रज्ञांनी १८४८ च्या सफरीनंतर अटलांटिक महासागराचे पाणी बॅरेटस् समुद्रात येते, असा शोध लावला. ए.एफ. मिडेन्डॉर्फ या रशियन समन्वेषकाने नॉर्थ केप उष्ण प्रवाहाचा शोध लावल्यानंतर या अंदाजाचा खरेपणा प्रत्ययास आला. १८९८ पासून रशियनांनी या सागराच्या काठी कायमचे संशोधन केंद्र उभारले असून त्यासाठी एन्. एम्. क्निपॉव्हिच याने मोलाचे कार्य केले आहे. शास्त्रीय दृष्ट्या संशोधन करण्यात ⇨ फ्रित्यॉफ नान्सेन हा नॉर्वेजियन प्रवासी प्रमुख असून याशिवाय ब्राइटफूस, डेर्जूगन हे रशियन वुल्फ व शुल्टझ हे जर्मन प्रवासी प्रमुख आहेत. या सागरी प्रदेशात १९२२ ते १९४० यांदरम्यान रशियनांनी ‘पर्सी’ जहाजातून ८४ सफरी करून सागरी विज्ञानविषयक माहिती मिळवून ती प्रसिद्ध केली.

 

 

पहा : आर्क्टिक प्रदेश आर्क्टिक महासागर.

 

गाडे, ना. स.