काफिरीस्तान : अफगाणिस्तानमधील पूर्वेच्या डोंगराळ, जंगलयुक्त व पाकिस्तानला लागून असलेल्या नुरिस्तान या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव. हा हिंदुकुशच्या दक्षिण उतारावर असून अफगाणिस्तानचे ८० टक्के जंगल-उत्पादन येथून निघते. काबूलला डावीकडून मिळणार्‍या अनेक नद्या या भागातून येतात. १८९०मध्ये या भागावर अफगाण-सत्ता  आली आणि तेथील मूळच्या लोकांना इस्लामची दीक्षा देण्यात आली. हे लोक पाळत असलेल्या आचारधर्माचे हिंदू धर्माशी साम्य असल्याने त्यांना काफिर व ते राहत असलेल्या देशास काफिरीस्तान असे नाव मिळाले. हे लोक पांडुवर्णी असून काही तज्ञांच्या मते हे ग्रीस वा इराणमधून आलेले, तर काहींच्या मते हे इस्लाम आक्रमणामुळे काबूल भागातून अरण्यात आलेले हिंदू होत.

शाह, र. रू.