व्रज : ब्रज. उत्तर प्रदेश राज्याच्या मथुरा जिल्ह्यातील हिंदूंचे प्रसिद्ध धार्मिक क्षेत्र. जुने गोकुळ म्हणजे व्रज असे म्हटले जाते. परंतु व्यापक अर्थाने मथुरा-वृंदावन आणि त्यांच्या परिसरातील सर्व गावे मिळून होणाऱ्या प्रदेशाला व्रज, व्रजभूमी, व्रजमंडल अशी नावे आहेत. जिथे गायी मुक्तपणे वावरतात, (व्रजन्ति गावो यस्मिन्निति व्रज:) तो प्रदेश असे ‘ब्रज’चे स्पष्टीकरण देतात. गाई-गुरांचे कुरण व गोप-गोपींचे वास्तव्य असलेला, तसेच किशोर कृष्णाच्या बाललीला ज्या प्रदेशात घडल्या, तो संपूर्ण प्रदेश ‘व्रज’ म्हणून ओळखला जातो.

प्राचीन काळी हा प्रदेश ‘शूरसेन’ जनपदात समाविष्ट होता. पौराणिक काळात त्याला ‘व्रजमंडळ’ म्हणत. मत्स्यपुराण, भागवतपुराण, वायुपुराण इ. ग्रंथांत याच्या विस्तारविषयी २० योजने, ४० योजने असे उल्लेख आले आहेत. पूर्व – उत्तर दिशांना बर्हिषद, दक्षिणेस यदुपूर व पश्चिमेस शोणपूर अशा याच्या चतु:सीमा गर्गसंहितेत वर्णिल्या आहेत. भौगोलिक वर्णनांतही याचे मैदानी प्रदेश, डोंगराळ प्रदेश व गाळप्रदेश असे तीन भाग केलेले दिसून येतात. मथुरा व वृंदावन यांच्या परिसरातील सर्व धार्मिक स्थळांचा या प्रदेशात समावेश असून गोवर्धन, नंदगावची टेकडी, बरसान्याची टेकडी, कागवनाची टेकडी व चरण टेकडी हे पाच पुण्यपर्वत व्रजमंडलात समाविष्ट आहेत. हे श्रीकृष्णाचे क्रीडास्थळ असल्याने सूरदासादी भक्त-कवींनी आपल्या ⇨ ब्रज भाषेतील रचनांमध्ये याचे माहात्म्य वर्णिले आहे. व्रजमंडल हे वैष्णव सांप्रदायिकांचे प्रमुख धार्मिक क्षेत्र असून याची यात्रा पुण्यप्रद मानली जाते.

पहा : गोकुळ मथुरा वृंदावन.

चौंडे, मा. ल.