मिनेसोटा नदीतीरावरील सेंट पॉल शहराचे दृश्य

सेंट पॉल : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी मिनेसोटा राज्याची राजधानी व रॅम्से कौंटीचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या २,८८,४४८ (२०११). मिनेसोटा राज्याच्या आग्नेय भागात मिसिसिपी व मिनेसोटा नद्यांच्या संगमाजवळ हे शहर वसलेले आहे. यूरोपीयांच्या आगमनापूर्वी येथे स्यू या अमेरिकन इंडियनांची वसती होती. धर्मप्रसारक फादर ल्वी हेनेपिन १६८० मध्ये येथे आला होता. लेफ्टनंट झेब्युलन एम. पिक याने अमेरिकन इंडियनांकडून १८०५ मध्ये येथील काही भाग घेतला होता. १८१९ मध्ये कर्नल हेन्री लेव्हनवर्थ याचा येथे सैनिकी तळ होता. कर्नल जोसिआ स्नेलिंग याने या ठिकाणी किल्ला बांधला व त्यास सेंट अँथनी हे नाव दिले. याचेच पुढे फोर्ट स्नेलिंग असे नामांतर करण्यात आले. फ्रेंच कॅनडियन व्यापारी पिएर पिग्ज आय पॅरंट याने येथे १८३८ मध्ये वसाहत केली. १८४१ पर्यंत ही वसाहत पिग्ज आय म्हणून ओळखली जात होती. फादर लूशन गॅल्टियर याने येथे १८४१ मध्ये सेंट पॉल चर्च बांधले, त्यावरून या शहरास सेंट पॉल असे नाव देण्यात आले. १८४९ मध्ये सेंट पॉल मिनेसोटा राज्यक्षेत्राची व १८५८ मध्ये राज्याची राजधानी झाली. याच्या पश्चिमेस असलेले मिनीॲपोलिस शहर आणि सेंट पॉल मिळून एक जुळा महानगरीय प्रदेश निर्माण झाला आहे.

सेंट पॉल हे दळणवळण, व्यापार व उद्योगधंदे यांचे केंद्र असून येथे मोटारी, विद्युत् साहित्य, संगणक, इलेक्ट्रॉनिक साहित्य, यंत्रसामग्री, फर्निचर, दारूगोळा, वैद्यकीय उपकरणे, कागद, कापड, बिर, खाद्यपदार्थांच्या शीतपेट्या, रसायने, लोह-पोलाद वस्तू , मद्य इत्यादींची निर्मिती होते. येथे खनिज तेल शुद्धीकरण आणि छपाई उद्योग चालतात. हे शहर पशुधन व कृषिपदार्थ वितरणाचे केंद्र आहे. येथे उच्च शिक्षणाच्या अनेक संस्था असून त्यांपैकी सेंट टॉमस महाविद्यालय, सेंट कॅथरिन महाविद्यालय, हॅमलिन विद्यापीठ, मॅकॅलेस्टर महाविद्यालय, बेथल महाविद्यालय, काँकॉर्डिया विद्यापीठ, विल्यम मिचेल विधी महाविद्यालय, सेंट पॉल बायबल महाविद्यालय इ. प्रमुख आहेत. येथे अनेक बाग-बगीचे असून त्यांपैकी इंडियन मौंड्स पार्क, कोमो पार्क प्रसिद्घ आहेत. येथील नगरभवन, न्यायालयाची वास्तू, सेंट पॉल कॅथीड्रल, स्टेट कॅपिटॉल, स्टेट हिस्टॉरिकल बिल्डिंग, फोर्ट स्नेलिंग, स्टेट पार्कस्, द गिब्ज कृषी संग्रहालय, मिनेसोटा अमेरिकन कला संग्रहालय इत्यादी प्रमुख आकर्षणे आहेत. येथील सेंटपॉल हिवाळी उत्सव लोकप्रिय आहे.

लिमये, दि. ह.