बडोदे : (वडोदरा). गुजरात राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आणि पूर्वीच्या वैभवशाली बडोदे संस्थानची राजधानी. २२०१८ उत्तर अक्षांश व ७३०१५ पूर्व रेखांश या दरम्यानच्या या शहराची लोकसंख्या ६,८०,००० (१९८१ अंदाज) होती. बगीच्यांचे शहर म्हणून गौरविलेले बडोदे अहमदाबादच्या आग्नेयीस सु. १०० किमी. विश्वामित्र नदीकाठी समुद्रसपाटीपासून ३५.५ मी. उंचीवर वसले आहे. प्राचीन काळी अंकुटिक किंवा अंकोटक (आकोटा) नावाची वसाहत या नदीच्या पश्चिम काठावर होती. वटपद्रक किंवा वडपत्रक, वीरक्षेत्र किंवा वीरावती, चंदनवती किंवा चंदनवटी यांसरखेही त्याचे नामोल्लेख आढळतात. इंग्रज प्रवाशांनी व व्यापाऱ्यांनी याचा ‘ब्रोदेरा’ असा उल्लेख केलेला असून त्यावरून ‘बडोदे’ हे नाव पडले असावे. विद्यमान शहराचे अधिकृत नाव ‘वडोदरा’ असे असून संस्कृतमधील ‘वटोदर’ या शब्दाचा हा अपभ्रंश असावा.

१. कलाभवन : महराजा सयाजीराव विद्यापीठाची तंत्रविद्या. ४. सुप्रसिद्ध वस्तुसंग्रहालय आणि चित्रवीथी २. पेनिसिलीन विभाग : ॲलेंविक केमिकल वर्क्स. ५. गुजरात राज्य खत कारखान्याचे बाह्य दृश्य ३. लक्ष्मीविलास राजाप्रसाद ६. कीर्तिमंदिर

येथील हवामान विषय मान्सून प्रकारचे आहे. उन्हाळ्यात कमाल     तापमान ४४से. व हिवाळ्यात किमान तापमान ६से. आढळते. पर्जन्यमान सरासरी ८४ सेंमी. असून बहुतेक वृष्टी जून ते सप्टेंबर या काळात होते. पावसाळ्यात विश्वामित्र नदीस येणाऱ्या  पुरांमुळे इतिहासकाळात गावठाण अनेक वेळा हलवावे लागले. बडोदे हे शहर भारतातील प्राचीन गावांपैकी एक असून मध्य अश्मयुगापासून येथे मानवी वस्ती असावी असा अंदाज आहे. इसवी सनाच्या सुरूवातीला भृगुकच्छ (भडोच) बंदर व उज्जैन यांना जोडणाऱ्या राजमार्गावरील महत्त्वाचे व्यापारी शहर म्हणून याची प्रसिध्दी होती. रोमन व्यापाऱ्यांशी येथूनच व्यापार चाले. इ.स.१०० ते ३९० या काळात क्षत्रपांच्या आधिपत्याखाली या शहराची बरीच वाढ झाली. पाचव्या शतकात येथे गुप्त वंशाचे राज्य होते. राष्ट्रकूटांनी यावरच बराच काळ सत्ता गाजविली. या काळात जैन धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. मात्र मुस्लीम आक्रमणानंतर जैन प्रभाव कमी झाला. दहाव्या शतकानंतर सोळंकी व वाघेल घराण्यांच्या काळात या शहराचा खूप विकास झाला. बाराव्या शतकांनंतर बडोदे प्रथम दिल्ली सलतनतीच्या व चौदाव्या शतकात गुजरात सलतनतीच्या आधिपत्याखाली होते. खलिल खानने शहराचे स्थलांतर पूर्वेस करून किल्ला बांधला व शहरास दौलताबाद नाव दिले. १५७३ ते १७२४ या काळात बडोदे मोगलांच्या ताब्यात होते. १५७३ मध्ये सम्राट अकबराने हे सुभ्याचे ठाणे केले. त्यानंतरच्या मराठी अंमलात सु. दोनशे वर्षे ते गायकवाड घराण्याच्या अखत्यारित होते. स्वतंत्र भारतात ते १९४९ साली विलीन करण्यात आले. या काळातच एक कलानगरी व विद्यानगरी म्हणून बडोद्याचा लौकिक झाला.  


उद्योग, व्यापार, शिक्षण आणि संस्कृती यांचा सुरेख संगम बडोदे शहरात दिसून येतो. कापड, खत, रसायने, चिनी मातीची भांडी , तंबाखू व रबर उत्पादने, लाकडी सामान, साबण, खनिज तेल रसायने, यंत्रे काच, मद्य व दुग्धव्यवसाय हे उद्योगधंदे येथे चालतात. गुजरात रिफायनरी, इंडियन पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लि. गुजरात स्टेट फर्डिलायझर्स कंपनी, अणुशक्ति-विभागाचा जड पाणी प्रकल्प यांसारख्या उत्पादनसंस्था तसेच तेल व नैसर्गिक वायू आयोगाचे कार्यालय येथे आहे. येथील दुग्धशाळा अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज असून दूधप्रक्रियेसाठी प्रसिध्द आहे. आसमंतातील सुपीक जमिनीतून घेतल्या जाणाऱ्या कापूस, तंबाखू व इतर धान्यप्रकारांचे हे प्रमुख व्यापारी केंद्र आहे. जवळच कोयाली येथे असलेल्या खनिज तेलशुध्दीकरण कारखान्यामुळे शहराचे औद्योगिकी महत्त्व अधिकच वाढले आहे. रस्ते, लोहमार्ग व हवाई मार्गानी देशातील महत्त्वाच्या स्थळांशी बडोदे जोडलेले असून ते पश्चिम रेल्वेच्या मुंबई-दिल्ली लोहमार्गावर आहे. 

शहरात आढळणारे भव्य राजवाडे, प्रवेशद्वारे, रूंद रस्ते, वस्तु संग्रहालये, मंदिरे व सुंदर उद्याने बडोद्याच्या वैभवाची साक्ष देतात. जडजवाहिरांचा संग्रह असलेली नजरबाग, इंडो-सार्सेनिक पध्दतीचा लक्ष्मीविलास तसेच प्रतापविलास व मकरपुरा हे राजवाडे, ६१ हेक्टर क्षेत्राचे सार्वजनिक उद्यान आणि त्यातील प्राणिसंग्रहालय, विश्वमित्री नदीवरील झुलता पुल, सूरसागर तलाव, कृत्रिम तारामंडळ, विविध प्रकारचे दगड वापरून बांधलेले कीर्तिमंदिर, दक्षिणमूर्ती मंदिर, न्यायमंदिर, चिमणाबाई टॉवर, सयाजीराव टॉवर, नगरभवन, खुले रंगमंदिर इ. वास्तू विशेष प्रेक्षणीय आहेत. 

अनेक मनोरे व सभोवती विस्तीर्ण व सुंदर बाग असलेल्या लक्ष्मी विलास राजवाड्याच्या परिसरात महाराजा फत्तेसिंह वस्तुसंग्रहालय असून त्यात विशेषतः रविवर्म्याची चित्रे आहेत. हा राजवाडा ⇨सायजीराव गायकवाडांनी (कार. १८८१-१९३९) बांधला. प्रतापविलास राजवाड्यात रेल्वे स्टाफ कॉलेज आहे. न्यायमंदिर ही उंच मनोरे असलेली भव्य इमारत असून पूर्वी येथे संस्थानचे उच्च न्यायालय होते. आता तेथे जिल्हा न्यायालय व सयाजी रूग्णालय आहे. शहराच्या केंद्रस्थानी  असलेल्या सूरसागर सरोवरांचे सुंदर दृश्य न्यायमंदिरातून दिसते. सरोवरात नौकाविहाराची सोय आहे. कीर्तिमंदिरातील भित्तीचित्रे प्रसिध्द भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांनी रेखाटलेली आहेत. १८९४ ते १९०६ या काळात महर्षी अरविंद यांचे वास्तव्य असलेल्या अरविंद निवासात ग्रंथालय व वाचनालय आहे. आशियातील पहिले व जगातील दहाव्या क्रमांकाचे कृत्रिम तारामंडळ बडोद्यात असून यातून कोणत्याही ठिकाणचे व कोणत्याही वेळेचे आकाश दिसू शकते.  

बहुतेक महत्त्वाच्या इमारतींभोवती व राजवाड्यांभोवती बागा आहेत. सयाजी बाग, जूबिली बाग, लाल बाग, सूर्यनारायण बाग, शास्त्री बाग, सरदार बाग, सार्वजनिक उद्यान, अरविंद उद्यान, बाल उद्यान, इ. सुंदरसुंदर बागा बडोद्यात आहेत .त्यांपैकी सयाजी बाग वस्तुसंग्रहालय, चित्रवीथी, वास्तुकला, रंगीबेरंगी, कारंजे, पोहण्याचा तलाव, फुलराणी (छोटी आगगाडी), आरोग्यविषयक संग्रहालय यांसाठी प्रसिध्द आहे. तसेच सर्व यंत्रणा जमिनीच्या अंतर्गत भागात असलेले ६.०९६ मी. व्यासाचे पुष्प घड्याळ या बागेतच आहे. अकबराने बांधलेली इंडो-इराणी शैलीतील कत्बुद्दीन कबर सुंदर असून बडोद्यातील उल्लेखनीय अशी ही एकमेव मोगलकालीन वास्तू आहे.  

बडोद्यातील महाराजा सयाजीराव विद्यापीठ (१९४९) हे प्रख्यात असून त्यातील ओरिएंटल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च हे संस्कृतच्या प्राचीन हस्तलिखितांच्या संग्रहासाठी (विशेषतः रामायणाच्या हस्तलिखितासाठी) प्रसिध्द आहे. येथील वस्तुसंग्रहालय व चित्रवीथीही उल्लेखनीय आहे. चित्रवीथीमध्ये भारतीय कलावस्तूंचे नमुने तसेच यूरोपीय कलाकृतीचा संग्रह आढळतो. बडोदे वस्तुसंग्रहालयात भारतीय संस्कृती, कला, निसर्गेतिहास, लोकविद्या, मानवजातिविज्ञान, व मानवजातिवर्णनविषयक संग्रहाचे स्वतंत्र विभाग आहेत. बडोदे येथे असलेल्या राज्य सरकारच्या ‘सेंट्रल लायब्ररी’त दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आढळतो. १९६६ मध्ये महानगरपालिकेची स्थापना करण्यात आली. शहर परिसराचा विकास करण्यासाठी बडोदे नागरी विकास प्राधिकरणही स्थापण्यात आले आहे. 

शहराची रचना योजनाबध्द केलेली आढळते. शहराच्या मध्यातून रेल्वेमार्ग जात असल्याने बडोद्याची बहुतेक वाढ ही पश्चिमेकडे होत आहे. या भागात अनेक कारखाने व गृहबांधणी संस्थांची निर्मिती होत आहे. हे शहर प. रेल्वेच्या रूंदमापी लोहमार्गावरील प्रस्थानक असून रस्त्यांचेही केंद्र आहे. मुंबई−अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.८ येथूनच जातो. याशिवाय येथे नागरी विमानतळ व आकाशवाणी केंद्र इ. दळणवळणाची साधनेही उपलब्ध आहेत. अजवा तलावातून व महानदीतून शहरास पाणीपुरवठा केला जातो. शहराच्या काही भागांत नळांद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा केला जातो. २२ किमी. वरील अजवा सरोवर १३ किमी. वरील निमेटा वॉटर फिल्टरेशन प्लँट अँड पिकनिक हाऊस, ५१ किमी. वरील पावागड, ४ ०किमी. वरील चंपानेर, ३२ किमी. वरील डभई (पुरातत्त्व अवशेषांचे ठिकाण), ३० किमी. वरील कयावरोहन (कार्व्हान) पर्यटनकेंद्र आणि लक्ष्मी फिल्म लॅबोरेटरी अँड स्टुटिओ इ. प्रसिध्द आहेत. क्रिडाक्षेत्रातही बडोदे शहर खूप नावाजलेले आहेत. खोखो, कबड्डी, कुस्ती इ. क्रिडाप्रकार विशेष लोकप्रिय आहेत. क्रिकेटमध्ये बडोद्याचा संघ नेहमी चांगली कामगिरी बजावतो. येथील पोलो क्लब, गुजरात क्रीडा मंडळ, मध्यस्थ क्रीडा केंद्र, सयाजी क्लब यांसारख्या अनेकक्रीडा संस्था प्रसिध्द आहेत. नारायण गुरूची तालीम व माणिकरावाचा आखाडा या राजाश्रयाखालील संस्था भारतभर प्रसिध्द होत्या. क्रीडाक्षेत्राप्रमाणेच इतर क्षेत्रांतही बडोदे शहर पूर्वीपासूनच प्रसिध्द आहे. विख्यात संगीततज्ञ उस्ताद फैयाझखाँ हे बडोद्याच्या महाराजांच्या पदरी गायक होते. फैयाजखाँ, पै. तसद्युक हुसेन, श्रीमती मीराबाई बाडकर इत्यादींनी आग्रा घराण्याची गायकी विकसित केली. येथील संगीत महाविद्यालय प्रसिध्द आहे. दरवर्षी येथे होणाऱ्या ‘उस्ताद फैयाझखाँ जंयती उत्सवा’ त भारतातील मोठमोठे गायक-वादक हजेरी लावतात. 

डोद्याच्या परिसरात १९५० पासून अनेक उत्खनने करण्यात आली. त्यांतून इ.स.पू. सु. १००० वर्षापूर्वीचे पुरातत्त्वीय अवशेष सापडले आहेत. त्यांवरून नवाश्मयुगापासून येथे मानववस्ती असल्याचे दिसून येते. या भागात सातवाहन,गुप्त,वल्लभी,चालुक्य, राष्ट्रकूट, सोळंकी इत्यादींच्या सत्ता असल्याचे पुरावे उपल्ब्ध झाले आहेत. यांमुळे बडोद्याचे प्राचीनत्व सिद्ध होण्यास मदत होते. 

पहाः गायकवाड घराणे बडोदे संस्थान.

संदर्भ :1. Maharaja of Baroda, The Palaces of India, London, 1980.

         2. Subbarao, Bendapudi, Baroda through the Ages, Baroda, 1953.

खातु, कृ. का., चौधरी वसंत