तूला : प. रशियाच्या तूला विभागाचे कारभार केंद्र. लोकसंख्या ४,९४,००० (१९७५). हे ओक नदीच्या ऊपा या उपनदीवर, मॉस्कोच्या दक्षिणेस १७६ किमी. वर आहे. हे सोळाव्या शतकापासून तार्तरांविरुद्धचे मॉस्कोचे दक्षिणेकडील प्रमुख संरक्षक केंद्र होते. १५३० मध्ये येथे एक दगडी किल्ला बांधण्यात आला. १७१२ मध्ये पहिल्या पीटर द ग्रेटने येथे शस्त्रास्त्रांचा कारखाना काढला. हल्लीही तो रशियातील एक महत्त्वाचा शस्त्रास्त्र कारखाना आहे. तूला औद्योगिक परिसरात अभियांत्रिकी वस्तू, कृत्रिम रबर, लोखंडी सामान, कुलुपे, कृषियंत्रे, चामड्याच्या वस्तू, साखर व रासायनिक वस्तू तयार होतात. ‘सॅमोव्हार’ या खास रशियन शेगड्या हे येथील पारंपरिक उत्पादन आहे. जवळच मिळणाऱ्या लिग्नाइट कोळशाचा उपयोग रासायनिक पदार्थांच्या कारखान्यात होतो. कोळसा संशोधन, खनिकर्म संशोधन व यांत्रिक संशोधन, यांत्रिक महाविद्यालय, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय इ. अनेक संस्था तसेच १७२४ मधील शस्त्र संग्रहालय येथे आहे. मॉस्को–तूला हा रशियातील एक महत्त्वाचा औद्योगिक विभाग आहे. तूलापासून १४ किमी. नैर्ऋत्येस प्रसिद्ध रशियन लेखक टॉलस्टॉय याचे निवासस्थान आहे. तूला दळणवळणाचे केंद्र असून ट्रान्स–सायबीरियन रेल्वेशी जोडलेले आहे.

लिमये, दि. ह. भागवत, अ. वि.