गल्फ प्रवाह : उत्तर अटलांटिक महासागरातील जगप्रसिद्ध उबदार सागरी प्रवाह. १४९२ मध्ये कोलंबसच्या व १५१३ मध्ये पॉन्से द लेऑन या स्पॅनिश नाविकाच्या लक्षात तो आला होता. तो मेक्सिकोच्या आखातातून येतो, या समजुतीमुळे बेंजामिन फ्रँक्लिनने त्याला गल्फ स्ट्रीम हे नाव दिले. परंतु फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीपासून न्यू फाउंडलंडच्या आग्‍नेयीकडील ग्रँड बँक्सपर्यंत त्याची खास वैशिष्ट्ये दिसून येत असल्यामुळे, एवढ्या भागातच त्याचे हे नाव योग्य आहे. फ्लॉरिडा सामुद्रधुनीपासून नॉर्वेजियन समुद्रापर्यंतच्या प्रवाहास हे नाव अजूनही दिले जाते.

दक्षिण अमेरिकेच्या सेंट रॉक भूशिराजवळ दक्षिण विषुववृत्तीय प्रवाहाच्या दोन शाखा होतात. त्यांपैकी उत्तरेकडील शाखा दक्षिण व मध्य अमेरिकेच्या किनाऱ्याकिनाऱ्याने कॅरिबियन समुद्रात आल्यावर तिला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची वेस्ट इंडीजच्या दक्षिणेकडील शाखा मिळते. मग तो प्रवाह मेक्सिकोच्या आखातात जाऊन तेथून फ्लॉरिडाच्या सामुद्रधुनीतून बाहेर पडतो. त्याला उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाची अँटिलीस प्रवाह ही शाखा मिळते व मग खरा गल्फ प्रवाह सुरू होतो. येथे त्याचे तपमान २० से. ते २४ से. रुंदी सु.१०० किमी. खोली. सु. ८०० मी. वेग ताशी ६·५ किमी. क्षारता उच्च व रंग गर्द निळा असून तो दर सेकंदास २·६ कोटी घ. मी. पाणी वाहून नेतो. पृथ्वीच्या परिवलनामुळे मिळणाऱ्या कोरिऑलिस प्रेरणेमुळे तो उजवीकडे वळू लागतो. अमेरिकेच्या आग्‍नेय किनाऱ्याला समांतर मार्गाने हॅटरस भूशिरापर्यंत गेल्यावर तो अधिक रुंद व संथ होतो, त्यात लहान लहान भोवरे दिसतात, खोली ४ ते ५ हजार मी. होते व तो सेंकदाला ८·२ कोटी घ.मी. पाणी वाहून नेतो. ग्रँड बँक्सकडे गेल्यावर त्याला लॅब्रॅडॉर हा थंड प्रवाह मिळतो. त्याचे काही फाटे गल्फ प्रवाह व किनारा यांच्या दरम्यान शिरतात आणि गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे किनार्‍यापासून दूर गेल्यामुळे तळाचे थंड पाणी वर येते. यामुळे किनारा व गल्फ प्रवाह यांच्यामध्ये थंड पाण्याची एक भिंतच उभी राहते. गल्फ प्रवाहाच्या उजवीकडे न दक्षिणेस सारगॅसो समुद्राचे पाणीही उच्च क्षारतेचे व उबदार असते. गल्फ प्रवाहात व उत्तर अटलांटिक प्रवाहचक्राच्या मध्यभागीच्या सारगॅसो समुद्रात सारगॅसो या विशिष्ट सागरी वनस्पतीची चकंदळे तरंगत असतात. गल्फ प्रवाहाच्या उजव्या बाजूच्या पाण्याची पातळी डावीकडील पातळीपेक्षा सु. ८० सेंमी. उंच असते. ग्रँड बँक्सजवळ उष्ण प्रवाहावरील आर्द्र हवा, थंड प्रवाहावरील थंड हवेत मिसळून बाष्पांचे सांद्रीभवन होते व दाट धुके पडते. ते तेथील मासेमारी नौकांस धोक्याचे असते. सु. ४० उ. अक्षांश व ५०प. रेखांश येथे गल्फ प्रवाह कोरिऑलिस प्रेरणेमुळे ईशान्येकडे जाऊन पश्चिमी वाऱ्यांमुळे वाहणाऱ्या उत्तर अटलांटिक प्रवाहात मिसळून जातो. पुढे हा प्रवाह यूरोपच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत गेल्यावर त्याच्या दोन शाखा होतात. दक्षिणेकडील शाखा आयबेरियन द्विपकल्प, वायव्य आफ्रिका यांच्याजवळून थंड कानेरी प्रवाह म्हणून उत्तर विषुववृत्तीय प्रवाहाला मिळते. उत्तरेकडील शाखा ब्रिटिश बेटे व नॉर्वे यांच्या किनाऱ्यांजवळून जाऊन पुढे आर्क्टिक महासागरात नाहीशी होते. तिचे तपमान अझोर्सच्या उत्तरेस १५·५ से. होते. या प्रवाहामुळे कॅनडाचे हॅलिफॅक्स, रशियाचे मुरमान्स्क व ब्रिटिश बेटे आणि नॉर्वे यांची बंदरे हिवाळ्यात न गोठता खुली राहतात. गल्फ प्रवाहामुळे पश्चिम व वायव्य युरोपचे हवामान अधिक उबदार होते, असे समजले जाते. तथापि हा परिणाम प्रवाहापेक्षा त्याने वेढलेल्या उबदार जलसंचयाचा आहे असे आता दिसून आले आहे किंबहूना प्रवाह जेव्हा अधिक पाणी वाहून नेत असतो, तेव्हा यूरोपात तपमान थोडे कमीच होते असे आढळले आहे. अमेरिकेहून यूरोपकडे जाणाऱ्या नौकांस गल्फ प्रवाहाचा फायदा मिळून वेळ व जळण यांची बचत होते. परंतु उलट बाजूने येणाऱ्या नौका मात्र हा प्रवाह टाळतात. गल्फ प्रवाह, त्याच्या समुद्रपृष्ठावरील व खोल पाण्यातील लहानमोठ्या शाखा, खालून वाहणारा प्रतिप्रवाह, सागरतळावरील निक्षेपांवर होणारा परिणाम इत्यादींचे संशोधन आधुनिक पद्धतींनी चालूच आहे.

कुमठेकर, ज. ब.