सिंधुनदी : संस्कृत – सिंधु (नदी), ग्रीक — सिंथोस, लॅटिन– सिंदुस.हिमालयात उगम पावणारी एक मोठी नदी. लांबी सु. ३,००० किमी. पूर्वीहिचा उल्लेख ‘किंग रिव्हर’ असा केला जाई. तिबेटच्या नैर्ऋत्य भागातअसलेल्या कैलास पर्वताच्या उत्तर भागात सिंधू नदी उगम पावते. हेउगमस्थान मानसरोवराच्या उत्तरेला सु. १०० किमी. व सस.पासूनसु. ५,५०० मी. उंचीवर आहे. उगमानंतर ती हिमालयाच्या उतारावरुनवायव्य दिशेला वाहत जाते. उगमापासून गार नदी मिळेपर्यंतचा तिचासु. २५७ किमी. लांबीचा प्रवाह सिंग-क-बाब किंवा सिंग-गे-चू यातिबेटी नावाने ओळखला जातो. पुढे ती भारताच्या जम्मू व काश्मीर राज्याच्याआग्नेय दिशेकडून राज्यातप्रवेश करुन राज्याच्यासाधारणमध्यातून वायव्येस वाहत जाते. येथील तिचे खोरे रुक्ष व निर्जन आहे.काश्मीरमध्ये उत्तरेकडील लडाख पर्वतश्रेणी व दक्षिणेकडील झास्कर पर्वतश्रेणी यांदरम्यानच्या खोल घळईतून वायव्येस वाहताना लेहजवळतिला झास्कर पर्वतश्रेणी पार करुन आलेली झास्कर ही उपनदी मिळते.पुढे स्कार्डूजवळ श्योक ही उपनदी येऊन मिळते. बाल्टिस्तानमध्येखैटाशो गावाजवळ झास्कर पर्वतश्रेणी पार करुन सिंधू अतिशय खोलघळईतून वाहत रहाते. येथील घळई ही जगातील सर्वांत खोल घळ्यांपैकी एक आहे. काराकोरम पर्वतश्रेणीच्या पायथ्याजवळ तिला गिलगिट नदीमिळाल्यानंतर एक मोठे वळण घेऊन सिंधू नैऋर्त्यवाहिनी बनते. पुढेनंगा पर्वताच्या पश्चिमेस हिमाद्री श्रेणीतील खोल अशा घळईतून ती वाहूलागते. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते सिंधू नदीचे पात्र जुने असून हिमालयउंचावला जात असताना नदीचे खणनकार्य प्रभावी राहिल्याने सिंधू नदीने आपले पात्र कायम ठेवले आहे. सिंधू नदीमुळे हिंदुकुश ही हिमालयाचीशाखा हिमालयापासून अलग झाली आहे.

जम्मू व काश्मीर राज्यातूनपुढे सिंधू पाकिस्तानात प्रवेश करते.पाकिस्तानच्या उत्तर भागातील पर्वतीय प्रदेशातून काहीशी दक्षिणेसवाहत जाते. हिमालयाच्या दऱ्याखोऱ्यांतून सु. १,६६५ किमी.चाप्रवास करुन अटकजवळ पर्वतीय प्रदेशातून बाहेर पडून ती पंजाबच्यापठारी प्रदेशात येते. तिचा उगमाजवळचा भूप्रदेश सस.पासून ५,५०० मी.उंचीचा असून अटकजवळच्या भूभागाची उंची ३०५ ते ४५७ मी. आहे.अटकजवळच तिला काबूल व स्वात नद्या येऊन मिळतात. त्यामुळे तिचे पात्र बरेच रुंद म्हणजे सु. २४४ मी. रुंदीचे बनते. येथे तिच्यातीलपाण्याची पातळीही बरीच वाढत असून प्रवाहही खूप वेगवान असतो.अटक ते कालाबागपर्यंतचा प्रवाह उच्चभूमी व खडकाळ प्रदेशातूनवाहत असल्यामुळे द्रुतगती आहे. या मार्गावरील चुनखडीच्या टेकाडांमुळेतिचा प्रवाह निळसर दिसतो, म्हणून तिला नील-आब हे नाव मिळालेआहे. पुढे सॉल्ट रेंज डोंगररांग पार करुन पाकिस्तानातील अर्धओसाडपंजाब मैदानात ती प्रवेश करते. डेरा इस्माइलखानजवळ तीदक्षिणवाहिनीहोते. मिठाणकोटजवळ तिला पंचनद म्हणजे भारतातून वाहत जाणाऱ्याझेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज यांचा संयुक्त प्रवाह मिळतो.त्यामुळे तिचे पात्र सु. २·५ किमी.पर्यंत रुंद बनले असून प्रवाह मंदगतीने वाहू लागतो. मिठाणकोटपासून पुढचा प्रवाह खोल, रुंद व संथ आहे.त्याला मिहरान म्हणतात. मिठाणकोटनंतर सिंधू पुन्हा नैर्ऋत्येस वळूनसिंध प्रांतात शिरते आणि कराचीच्या आग्नेयीस अनेक फाट्यांनी अरबीसमुद्राला मिळते. त्यामुळे मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण झाला आहे. यात्रिभुज प्रदेशाची सुरुवात थत्ता (तत्ता) पासून होते. हा त्रिभुज प्रदेश विस्तृत असून त्यातील बराचसा भाग दलदलयुक्त आहे.

एकेकाळी सिंधू नदी कच्छच्या रणातील दलदली प्रदेशाला जाऊनमिळत होती. तेव्हा ती सांप्रत पात्रापासून पूर्वेस सु. ११० किमी.वरुन,तसेच तिला समांतर वहात होती. कच्छचे रण हळुहळू भरुन आलेआणि नदी पश्चिमेकडे सरकली. सक्कर धरणापासूनचा सिंधूच्या पूर्वेकडून वाहणारा पूर्व नारनावाचा एक फाटा पुढे कच्छच्या रणाकडे वाहतजातो, तर सिंधू नदीच्या मूळ पात्राच्या पश्चिमेस सु. १६ ते ३२ किमी.वरुन पश्चिम नार हा फाटा वाहतो.

श्योक, झास्कर, शिगर, गिलगिट, अस्तोर ह्या उपनद्या तसेच इतरअनेक प्रवाह मुख्य हिमालय श्रेणी, काराकोरम पर्वतश्रेणी, नंगा गिरिपिंडव कोहिस्तान उच्चभूमीवरील हिम व हिमाचे वितळलेले पाणी सिंधूनदीकडे वाहून आणतात. उत्तर पाकिस्तानातील काबूल, स्वात व कुर्रमया सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. टोची, गुमल, झोब, विहोआ,संगर व रावनी या कमी लांबीच्या नद्या सुलेमान श्रेणीतून पूर्वेस वहातजाऊन सिंधूला मिळतात. भारतातून वहात येणाऱ्या झेलम, चिनाब,रावी, बिआस व सतलज या सिंधूच्या सर्वांत मोठ्या उपनद्या आहेत.या पाच नद्यांचा संयुक्त प्रवाह मिळाल्यानंतरचे सिंधूचे पात्र रुंद व उथळबनले असून ती मंदगतीने वाहते. त्यामुळे तिच्या प्रवाहमार्गात मोठ्याप्रमाणावर गाळाचे संचयन होते. पुरापासून संरक्षण करण्यासाठी तिच्याकाठावर बांध घातले आहेत परंतु कधीकधी उत्प्रवाहाच्या वेळीपात्राबाहेर पाणी पसरुन मोठे नुकसान होते.

सिंधू नदीचे पाणलोट क्षेत्र ११,६५,५०० चौ. किमी. असून त्यांपैकीभारतातील क्षेत्र २७·५६ टक्के आहे. भारतातील सिंधूच्या एकूणपाणलोट क्षेत्रापैकी ६० टक्के जम्मू व काश्मीर राज्यात, १६ टक्के हिमाचलप्रदेशात, १६ टक्के पंजाबात, ५ टक्के राजस्थानमध्ये तर ३ टक्के हरयाणातआहे. तिचे वार्षिक प्रवाहमान नाईल नदीच्या प्रवाहमानापेक्षा जवळजवळदुप्पट आहे. कारण सिंधूला काराकोरम, हिंदुकुश, मुख्य हिमालयपर्वतश्रेणी यांवरील हिमक्षेत्र व हिमनद्यांपासून तसेच हिमालयीन उप-नद्यांपासून पाणीपुरवठा होतो. पावसाळ्यात पावसामुळे व उन्हाळ्यातहिमालय पर्वतक्षेत्रांवरील बर्फ वितळून पाणीपुरवठा होत असल्यामुळेसिंधू बारमाही वाहणारी नदी आहे. तरीही ऋतुमानानुसार तिच्या पाण्याच्यापातळीत चढउतार आढळतात. हिवाळ्यात किमान प्रवाहमान असते. वसंतऋतु व उन्हाळ्यात हिमनग वितळल्यामुळे प्रवाहमान वाढते, तर जुलै तेसप्टेंबर या पावसाळ्यातील कालावधीत नदीला पूर येतात. काही वेळा हेपूर विनाशकारी ठरतात. इ. स. १८४१ मध्ये अटक येथे आलेल्यापुराच्या वेळी पाण्याची पातळी चार तासांत २५ मीटरने वाढून हजारोचौ. किमी. क्षेत्र पूरगस्त झाले होते. मैदानी प्रदेशातील उष्ण व कोरड्याहवामानामुळे पृष्ठीय जलाचा पुरवठा कमी होतो. तसेच तेथील बाष्पीभवनाचा जास्त वेग व जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण अधिक असल्यानेपाण्याची पातळी कमी असते.


जगातील जलसिंचनासाठी सर्वाधिक उपयोग केल्या जाणाऱ्यानद्यांपैकी ही एक नदी आहे. पाकिस्तानात हिचा उपयोग प्रामुख्यानेजलसिंचन व जलविद्युत्‌शक्ती निर्मितीसाठी केला जातो. प्राचीन काळापासूनसिंधूचा जलसिंचनासाठी वापर केला जात आहे. ब्रिटिश शासनानेसन १८५० नंतर कार्यान्वित केलेली कालवा जलसिंचन पद्घती हीजगातील सर्वांत मोठ्या आधुनिक कालवा सिंचन प्रकल्पांपैकी एकमानली जाते. सक्कर व कोत्री ही प्रमुख धरणे आहेत. सक्कर येथील लॉइडधरण १९३२ मध्ये बांधून पूर्ण झाले असून ते विशेष महत्त्वाचे आहे. टार्बेला धरण हे जलसाठयाच्या दृष्टीने जगातील सर्वांत मोठ्या धरणांपैकीएक आहे. कालाबाग येथे सिंधू चुनखडीयुक्त घळईतून वाहते. येथीलभक्कम तळभागामुळे येथे थळ हा जलसिंचन प्रकल्प उभारण्यात आलाआहे. पाकिस्तानातील ओसाड व निमओसाड प्रदेशाला पाणीपुरवठा करणारा सिंधू हाच प्रमुख स्रोत असून, त्यामुळेच येथील कृषी विकासघडून आला आहे. ईजिप्तमध्ये जसे नाईलला महत्त्व तसे पाकिस्तानातसिंधूला महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंधू खोरे हे प्रमुख कृषी क्षेत्र असून गहू,मका, तांदूळ, बारीक तृणधान्य, कापूस, खजूर व फळे ही या खोऱ्यातीलप्रमुख पिके आहेत.

हिंदुस्थानच्या फाळणीमुळे सिंधू खोऱ्यातील सर्वाधिक पाण्याचा लाभपाकिस्तानला झाला. सिंधूचे मुख्य खोरे पाकिस्तानात गेले, तर तिच्याप्रमुख उपनद्यांचे शीर्षप्रवाह भारतात राहिले. सिंधू व तिच्या उपनद्यांच्या पाणीवाटपावरुन भारत-पाकिस्तान दरम्यान अनेकदा वाद निर्माण झाले. त्यादृष्टीने १९६० मध्ये भारत-पाकिस्तान दरम्यान सिंधू पाणी वाटपासंदर्भातीलकरार करण्यात आला आहे.

सिंधू नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. खाद्योपयोगी मत्स्यप्रकारांस पल्ला असे म्हणतात. थत्ता, कोट्री व सक्कर हीपाकिस्तानातील प्रमुख मासेमारी केंद्रे आहेत. पूर्वी सिंधू नदीतून मोठ्याप्रमाणावर जलवाहतूक केली जाई परंतु सिंधू खोऱ्यातून लोहमार्गटाकण्यात आल्यापासून (१८७८) आणि जलसिंचन प्रकल्पांचा विस्तारकरण्यात आल्यापासून व्यापारी जलमार्ग म्हणून सिंधूचे महत्त्व कमीझाले. सांप्रत केवळ खालच्या टप्प्यात लहानलहान बोटींचा वाहतुकीसाठी  वापर केला जातो.

सिंधू नदीचे खोरे हे पाकिस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचीघनता असणारे खोरे आहे. सिंधू नदीच्या तीरावरील व तीराजवळीलपाकिस्तानमधील प्रमुख नगरे पुढीलप्रमाणे आहेत : कराची, कोत्री,ठठ्ठा, केंटा, हैदराबाद, सेहवान, सक्कर, रोहरी, मिठानकोट, डेरा गाझीखान,डेरा इस्माइलखान, मिआनवाली, कालाबाग, खुशालगढ व अटक.जम्मू व काश्मीर राज्यातीलसिंधूच्या खोऱ्यात गिलगिट, स्कार्डू, लेह हीप्रमुख नगरे आहेत.

सिंधू नदीच्या खोऱ्यात मोहें-जो-दडो, हडप्पा, चन्हुदारो इ. ठिकाणीकेलेल्या उत्खननात एका अत्यंत प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले.ही प्राचीन संस्कृती म्हणजेच सिंधू संस्कृती होय. या संस्कृतीचा उगम वविकास याच नदीखोऱ्यात झाला. या संस्कृतीचे मुख्य केंद्र सिंधू वहाक्रा नद्यांच्या पूरमैदानात होते. या संस्कृतीचा विस्तार सांप्रतपाकिस्तान, उत्तर भारत व अफगाणिस्तानात होता. काही संशोधकांच्यामते सिंधूसंस्कृतीचा प्रसार कालांतराने दक्षिण भारतात झाला. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या वेगवेगळ्या कारणांपैकी हाक्रा नदीचा वाढतगेलेला कोरडेपणा व सिंधू नदीने वारंवार बदललेले प्रवाहमार्ग हे एककारण सांगितले जाते. महाकाव्ये, पुराणे इ. प्राचीन गंथातही या नदीचामहिमा वर्णिलेला आहे. वैदिक साहित्यात सिंधू नदीचा निर्देश अनेकदाझालेला आहे. ऋग्वेदाच्या काही ऋचांत सिंधू हा शब्द काही ठिकाणीसागर या अर्थी, तर काही ठिकाणी नदी या अर्थाने वापरला आहे. सिंधूया शब्दावरुनच हिंदू हे नाव उद्‌भवले आहे. बेहिस्तून येथील पहिल्याडरायसच्या प्रस्तरलेखात सिंधू नदीला हिंदू हेच नाव दिलेले आढळते.संस्कृत वाङ्‌मयात तिचा उल्लेख हिंदू असा केलेला आहे. आर्य लोकसिंधूला पवित्र मानत.

चौधरी, वसंत