यूरग्वाय : (ईस्टर्न रिपब्लिक ऑफ यूरग्वाय). दक्षिण अमेरिका खंडाच्या आग्नेय भागातील एक स्वतंत्र राष्ट्र. क्षेत्रफळ १,७६,२१५ चौ. किमी. लोकसंख्या २९,२१,७९८ (१९८५). क्षेत्रफळाच्या बाबतीत दक्षिण अमेरिकेत हे दुसऱ्या क्रमांकाचे लहान राष्ट्र आहे. अक्षवृत्तीय विस्तार ३०° ६’ द. ते ३५° २’ द. व रेखावृत्तीय विस्तार ५३° ५’ प. ते ५९°२९’ प. यांदरम्यान. दक्षिणोत्तर कमाल लांबी ५३१ किमी. व पूर्व – पश्चिम रुंदी ४५१ किमी. यूरग्वायच्या उत्तरेस व ईशान्येस ब्राझील, पश्चिमेस अर्जेंटिना आणि दक्षिणेस व आग्नेयीस अटलांटिक महासागर आहे. यूरग्वाय नदी व रीओ द ला प्लाता नदीमुखखाडी यांमुळे यूरग्वाय अर्जेंटिनापासून अलग झाला आहे तर क्वारेम व झग्वराओं या नद्यांमुळे तसेच मीरीं खारकच्छामुळे यूरग्वाय ब्राझीलपासून अलग झाला आहे. देशाच्या सरहद्दीची एकूण लांबी २,०६३ किमी. आहे. त्यापैकी ब्राझीलशी १,००३ किमी. व अर्जेंटिनाशी ४९५ किमी. लांबीची सरहद्द असून अटलांटिक किनारपट्टीची लांबी ५६५ किमी. आहे. यूरग्वाय या देशाचे स्थान रीओ द ला प्लाता नदीच्या (रुपेरी नदी) पूर्वेस असल्याने १८२८ पूर्वी अर्जेंटिनातील ब्बेनस एअरीझ येथील स्पॅनिश वसाहतीमधील लोक यूरग्वायला ‘बांदा ओरिएन्टल’ (ईस्ट बँक – पूर्व किनारा) या नावाने ओळखत असत. १८२८ मध्ये यूरग्वाय स्वतंत्र झाल्यावरही स्पॅनिश या त्यांच्या अधिकृत भाषेतील ‘ला रिपब्लिका ऑरिएन्टल देल यूरग्वाय’ (द ईस्टर्न रिपब्लिक ऑफ यूरग्वाय) हेच नाव कायम ठेवण्यात आले. स्थानिक रीत्या अजूनही या देशाचा ‘बांदा ऑरिएन्टल’ असाच नामोल्लेख केला जातो. इतिहासकाळापासून ब्राझील व अर्जेंटिना या दोन अधिक बलाढ्य व शक्तिशाली शेजारी राष्ट्रांच्या सावटाखाली यूरग्वाय राहिला असला, तरीही त्याने या दोन्ही देशांपेक्षा आपले एक वेगळे अस्तित्व कायम टिकवून ठेवलेले आहे. माँटेव्हिडिओ (लोकसंख्या १३,६२,०००–१९८० अंदाज) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : यूरग्वायची भूमी म्हणजे दक्षिणेकडील अर्जेंटिनाचा पँपास प्रदेश व उत्तरेकडील ब्राझीलियन डोंगराळ उच्चभूमीचा प्रदेश यांदरम्यानचा संक्रमण विभाग आहे. प्राकृतिक दृष्ट्या यूरग्वायचे (१) किनारपट्टीचा मैदानी प्रदेश, (२) उच्चभूमीचा प्रदेश व (३) कुरणांखालील प्रदेश असे मुख्य तीन विभाग पडतात. अटलांटिक व रीओ दला प्लाता किनाऱ्यावरील यूरग्वायची अरुंदशी पट्टी मैदानी स्वरूपाची असून किनापट्टीवर खारकच्छ, विस्तीर्ण पुळणी, वालुकाराशी, भरती – ओहोटीमुळे निर्माण झालेली सरोवरे इ. वैशिष्ट्ये पहावयास मिळतात. यांचा विस्तार किनाऱ्यापासून आत आठ किमी पर्यंत किंवा त्यापेक्षाही अधिक आढळतो. या किनारपट्टीवरील मैदानी प्रदेशाच्या पश्चिमेस उच्चभूमीचा प्रदेश आहे. या उच्चभूमीच्या प्रदेशाचा आकार एखाद्या मोठ्या सुऱ्याप्रमाणे असल्यामुळे यूरग्वायन लोक या उच्चभूमीच्या प्रदेशाला ‘कुचिला ग्रांदे’ (मोठा सुरा) असे म्हणतात. दक्षिणेस माँटेव्हिडिओपासून उत्तरेस ब्राझील सरहद्दीपर्यंत पसरलेला हा उच्चभूमीचा प्रदेश म्हणजे यूरग्वायमधील पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी नद्यांमधील प्रमुख जलविभाजक आहे. पूर्ववाहिनी नद्या लांबीने आखूड असून त्या अटलांटिकला मिळतात, तर पश्चिमवाहिनी नद्या यूरग्वाय नदीला जाऊन मिळतात. या उच्चभूमीच्या प्रदेशात ५०० मी. उंचीपर्यंतच्या ग्रॅनाइटी टेकड्या आहेत. मीराडोर नासिओनल (उंची ५०१ मी.) हे देशातील सर्वोच्च शिखर याच कुचिला ग्रांदे प्रदेशाच्या दक्षिण भागात आहे. देशाच्या उत्तर सरहद्दीवरही उच्चभूमीचे प्रदेश आहेत.

कुचिला ग्रांदे या मध्यवर्ती उच्चभूमी प्रदेशापासूनची पश्चिमेकडील भूमी सामान्यपणे साधारण उताराची व सपाट असून ती प्रामुख्याने कुरणांखाली आहे. दऱ्यांच्या ठिकाणीच ही सपाट भूमी खंडित झालेली दिसते. देशाचे सु. चार – पंचमांश क्षेत्र या विभागाखाली आहे. यूरग्वायमधील गवताळ प्रदेश म्हणजे अर्जेंटिनातील पँपास गवताळ प्रदेशाचाच पूर्वेकडील विस्तारित भाग आहे, तर वायव्येकडील प्रदेश म्हणजे दक्षिण ब्राझीलमधील पाराना पठाराचा दक्षिणेकडील विस्तारित भाग आहे. या वायव्येकडील प्रदेशात कटक, कमी उंचीची पठारे व त्यांमधून वाहणाऱ्या नद्यांची रुंद खोरी इ. विविध स्वरूपाचे भूविशेष पहावयास मिळतात.

देशात चुनखडक, ग्रॅनाइट व संगमरवर एवढीच महत्त्वाची खनिजे सापडतात. देशाचा बहुतांश भाग कुरणांखाली असल्याने गवतामुळे जमिनीला सेंद्रिय द्रव्यांचा भरपूर पुरवठा होतो. त्यामुळे येथील मृदा सामान्यपणे सुपीक बनलेल्या आहेत. साधारण पर्जन्य व त्याचे समप्रमाणातील वितरण यांमुळे निक्षालनक्रिया घडून येत नाही. त्यामुळेही येथील मृदा सुपीक बनलेल्या आहेत. बहुतेक मृदा स्फटिकमय खडकांपासून बनलेल्या आहेत. पूर्व किनारपट्टीवर नापीक अशी रेताड व दलदलीची जमीन आहे.

यूरग्वायमधून फारशा मोठ्या नद्या वाहत नाहीत. ब्राझीलमध्ये उगम पावून यूरग्वायमध्ये वाहत येणारी व यूरग्वाय नदीची उपनदी नेग्रो हीच देशातून वाहणारी सर्वांत मोठी नदी आहे. या नदीच्या केवळ खालच्या टप्प्यातूनच जलवाहतूक होऊ शकते. देशाच्या पश्चिम सरहद्दीवरून यूरग्वाय नदी वाहत असून मुखापासून आत पायसांडूपर्यंत मोठ्या बोटी व साल्टोपर्यंत छोट्या बोटींनी जलवाहतूक होऊ शकते. जलवाहतुकीस योग्य असा हा नदीप्रवाह ३२० किमी. लांबीचा आहे. इतर कोणताही प्रवाह जलवाहतुकीस उपयुक्त ठरत नाही. सँता लूसीआ, फेग्वाय ग्रांदे व सेबोयाती ह्या देशातील इतर महत्त्वाच्या नद्या आहेत. देशाच्या दक्षिणेस यूरग्वाय – पाराना नद्यांच्या मुखाशी रीओ द ला प्लाता ही विस्तृत नदीमुखखाडी निर्माण झाली असून त्या नदीमुखखाडीला उपसागर म्हणूनही ओळखले जाते. देशाच्या पूर्व भागात यूरग्वाय – ब्राझील सरहद्दीवर मीरीं हे विस्तृत खारकच्छ किंवा सरोवर आहे. त्याचप्रमाणे देशाच्या मध्यवर्ती भागात नेग्रो नदीवर बांधण्यात आलेल्या धरणामुळे एम्बाल्से देल रीओ नेग्रो हा विस्तृत जलाशय निर्माण झालेला आहे.

हवामान : यूरग्वायचे हवामान सामान्यपणे समशीतोष्ण कटिबंधीय सौम्य स्वरूपाचे आहे. हिवाळ्यातील जुलै महिन्याचे सरासरी तपमान १०° से ते १३° से. असते, तर उन्हाळ्यातील जानेवारी महिन्याचे सरासरी तपमान २१° से ते २४° से. असते. हिवाळे अल्पकालीन व सौम्य असल्याने कुरणांमध्ये संपूर्ण हिवाळाभर गुरे चारणे शक्य होते. उन्हाळे सामान्यपणे उबदार असतात. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ११४ सेंमी. असून पर्जन्याचे वर्षभरातील तसेच प्रादेशिक वितरण साधारण सारख्या प्रमाणात असते. त्यामुळे ठराविक असा पावसाळा किंवा कोरडा ऋतू नसतो. अवर्षणाची स्थिती क्वचित निर्माण होते. तरीही साधारणपणे हिवाळ्यापेक्षा शरदऋतूमध्ये (एप्रिल व मे महिन्यांत) पर्जन्यमान अधिक असते. समुद्रकिनाऱ्यापासून अंतर्गत भागात पर्जन्याचे प्रमाण काहीसे कमी झालेले आढळते. उन्हाळ्यात नेहमी झंझावात निर्माण होतात. मे ते ऑक्टोबर या काळात धुके निर्माण होत असते. किनाऱ्यावर सहसा हिमतुषार पडत नाहीत.


वनस्पती व प्राणी : देशातील गवताळ कुरणे ही यूरग्वायची अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. ७५% भूमी कुरणांखाली आहे. कुरणांमधील गवत प्रेअरी प्रकारचे व साधारण ९१ सेंमी. उंचीचे असते. त्यावर गुरे व मेंढपाळीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. अरण्यांखालील प्रदेश विशेष महत्त्वाचे किंवा विस्तृत नाहीत. केवळ ३% क्षेत्र अरण्यांखाली असून दक्षिण अमेरिकेतील हे प्रमाण सर्वांत कमी आहे. पँपास गवताळ प्रदेशापेक्षा येथील गवताळ प्रदेशात वनस्पतींचे प्रमाण थोडे अधिक आहे. अरण्यमय प्रदेश प्रामुख्याने नद्यांच्या काठी व वायव्येकडील जास्त उंचीच्या प्रदेशात आढळतात. ऑम्बु, ॲल्डर, कोरफड, हिवर, बाभूळ, पाइन, ओक, सीडार, सायप्रस, वाळुंज, अल्गरॉबीन, क्वेब्रॅको, मॅग्नोलिया, तुती, सिकमोअर, यूकॅलिप्टस हे येथील महत्त्वाचे वनस्पती प्रकार आहेत. किनाऱ्यावर ताड वृक्ष खूप आहेत.

देशात प्यूमास, जॅगुआर, ऑटर, अमेरिकन शहामृग, कोल्हा, हरिण, सील, रानमांजर, कॅपिबारा (वॉटर हॉग), आर्मडिलो इ. प्राणी पॅराकीट, गिधाड, घुबड, तितर, लावा, रानटर्की, रानबदक, हमिंग पक्षी, करकोचा, बगळा इ. पक्षी तसेच खडखड्या साप आणि व्हायपर यांसारखे विषारी साप आढळतात.

चौधरी, वसंत

इतिहास व राजकीय स्थिती : आधुनिक यूरग्वायचा इतिहास सामान्यपणे सोळाव्या शतकापासून म्हणजे स्पॅनिश वसाहतकारांच्या तेथील प्रवेशानंतर सुरू होतो. या भागातील मूळचे स्थानिक लोक हे विविध इंडियन जमातींचे होते. तथापि स्थानिक लोक आणि विशेषतः स्पॅनिश आणि इटालियन वसाहतकार यांच्या वर्णसंकरातून विद्यमान यूरग्वायन समाज निर्माण झाला आहे. १५१६ मध्ये व्हान डीआथ द सोलिस हा पहिला स्पॅनिश संशोधक यूरग्वायमध्ये आला. स्पेन आणि पोर्तुगाल यांच्या साम्राज्यविस्तारात हा देश दीर्घकाल युद्धभूमी ठरला. यूरग्वाय नदीच्या पूर्वकाठावरील प्रदेश अशी त्या वेळी या देशाची व्याप्ती होती. कोलोन्या हे पहिले शहर पोर्तुगीजांनी १६८० मध्ये वसविले. स्पॅनिशांनी १७२६ च्या सुमारास माँटेव्हिडिओ येथे आपला जम बसविला. स्पेन आणि पोर्तुगाल ह्यांच्या येथील संषर्घाचा शेवट १७७७ साली झाला. त्या वर्षी कोलोन्या हे शहर स्पॅनिशांच्या ताब्यात आले. तेव्हापासून रीओ द ला प्लाता येथील स्पॅनिश व्हाइसरॉयच्या अखत्यारीतील प्रदेश म्हणून यूरग्वाय ओळखला जाऊ लागला. यूरग्वायन स्वातंत्र्याची चळवळ १८११ साली सुरू झाली. तिचे नेतृत्व होसे आर्तीगास याने केले. त्याच वेळी अर्जेंटिनातील लोकांनीही स्वातंत्र्याचा लढा सुरू केला होता. याचा फायदा घेऊन ब्राझीलियन लोकांनी यूरग्वायमध्ये प्रवेश केला. १८२१ साली ब्राझीलचा एक प्रांत म्हणून हा देश ब्राझीलच्या सत्तेखाली आला. ब्राझीलियन वर्चस्वाविरुद्ध १८२५ मध्ये यूरग्वायन देशभक्तांच्या एका गटाने लढा सुरू केला. ‘तेहतीस अमर देशभक्त’ अशा संज्ञेने तो गट ओळखला जातो. लाव्हायेहा हा या स्वातंत्र्यसैनिकांचा नेता होता. या भागात ब्रिटिशांचा व्यापार मोठा होता आणि त्यामुळे त्यांचा राजकीय प्रभावही होता. ब्रिटिश सरकारच्या दबावामुळेच अर्जेंटिना आणि ब्राझील यांनी १८२८ मध्ये स्वंतत्र यूरग्वाय प्रजासत्ताकाला मान्यता दिली. या दोहोंतील एक अडसर राज्य म्हणून त्याचे महत्त्व होते. याच सुमारास यूरग्वायमधील दोन प्रबळ अशा राजकीय पक्षांचा उदय झाला. उदारमतवादी पक्षाचे नेतृत्व जनरल रिव्हेरा याच्याकडे होते, तर परंपरावादी पक्षाचे नेते जनरल ओरीबे हे होते. ते अनुक्रमे कोलोरॅडो (लाल) व ब्लँको (पांढरा) या नावांनी ओळखले जातात. या दोन पक्षांच्या सत्तासंघर्षातून यूरग्वायमध्ये १८३९– ५१ या काळात यादवी युद्ध झाले. यादवी युद्धकाळातील शेवटची ९ वर्षे तर माँटेव्हिडिओला ब्लँको पक्षाच्या सैनिकांनी आणि अर्जेंटिनी लष्कराने वेढा घातलेला होता. १८६३ साली कोलोरॅडो पक्षीयांनी ब्लँको पक्षाच्या शासनाविरुद्ध उठाव केला आणि ब्राझीलच्या लष्करी मदतीने १८६५ साली देशाची सत्ता त्यांच्याकडे आली. मध्यंतरी पॅराग्वायचा हुकूमशहा लोपेथ याने ब्लँको पक्षाला साहाय्य करण्यासाठी म्हणून यूरग्वायवर चाल केली. या प्रसंगी मात्र ब्राझील, अर्जेंटिना आणि यूरग्वाय हे तिन्ही देश एकत्र येऊन त्यांच्या संयुक्त आघाडीने पॅराग्वायचे आक्रमण मोडून काढले. यूरग्वायमध्ये कोलोरॅडो पक्ष १९६० – ६१ पर्यंत (सु. ९६ वर्षे) सत्तेवर होता. या काळातील बहुतेक सर्व सत्ताधाऱ्यांनी बळाचा वापर करूनच सत्ता काबीज केली आणि अनेकदा ब्लँको पक्षियांचे सशस्त्र उठाव मोडून काढले. यूरग्वायच्या राजकीय इतिहासात उत्तरोत्तर कोलोरॅडो व ब्लँको या दोन प्रमुख राजकीय पक्षांची ध्येयधोरणे निश्चित होत गेली असे दिसते. माँटेव्हिडिओ व त्याच्या परिसरातील नागरी लोकांचे प्रतिनिधित्व कोलोरॅडो पक्ष करीत असे, तर मोठे जमीनदार आणि ग्रामीण समाज यांची बाजू ब्लँको पक्ष घेत असे. होसे बात्ये हा कोलोरॅडो पक्षातर्फे १९०३ साली अध्यक्ष म्हणून निवडण्यात आला. यादवी युद्ध माजविण्याचा ब्लँको पक्षाचा शेवटचा प्रयत्न १९०४ साली बात्येने मोडून काढला. बात्येने १९०७ साली अध्यक्षपद सोडले आणि यूरोपातील अनेक देशांत प्रवास करून तेथील आर्थिक आणि शासकीय व्यवस्थांचा अभ्यास केला. १९११ मध्ये तो पुन्हा अध्यक्ष झाला. यूरोपीय देशांच्या धर्तीवर त्याने यूरग्वायच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा घडवून आणल्या. विमाव्यवसाय, काही प्रमाणातील बँक व्यवहार आणि बंदरे व गोद्या या गोष्टी सरकारच्या अखत्यारीत घेतल्या. सिमेंट आणि तेलशुद्धीकरणाच्या उद्योगांत शासकीय निकम किंवा महामंडळे स्थापन केली. समाजकल्याणाच्या दृष्टीनेही सामाजिक सुरक्षेची विस्तृत अशी योजना कार्यवाहीत आणली व तीद्वारा आरोग्यविमा, सेवानिवृत्तिवेतन इ. सुविधांची तरतूद केली. कामगारकल्याणविषयक अनेक अधिनियमही त्याने केले. बात्येला मंडलीय (कॉलेजिएट) राष्ट्राध्यक्षीय पद्धत स्थापन करावयाची होती. या पद्धतीनुसार बहुमतवाल्या पक्षाचे ६ सदस्य व अल्पमत असलेल्या पक्षाचे ३ सदस्य असे ९ सदस्यांचे कार्यकारी मंडळ देशाचा कारभार करी. प्रत्यक्षात अशी सुधारणा करणे त्याला जमले नाही. राष्ट्राध्यक्ष म्हणून १९१५ साली तो निवृत्त झाला १९१८ सालच्या संविधान समितीत त्याने नऊ सदस्यांच्या कौन्सिल ऑफ स्टेटची व्यवस्था मान्य करून घेतली. राष्ट्राध्यक्षांच्या बरोबरच या समितीकडे शासनाचा कार्यकारी घटक म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. आधुनिक यूरग्वायचा शिल्पकार म्हणून बात्येला मोठेच महत्त्व आहे. तो १९२९ मध्ये निधन पावला.

ग्राब्रिएल टेर्‌रा याने १९३३ साली राष्ट्रीय पोलिसांच्या मदतीने सत्ता बळकावली. टेर्‌रा हा हुकूमशहा होता. १९३४ साली त्याने कौन्सिल ऑफ स्टेट बरखास्त केले आणि राष्ट्राध्यक्षाची निरंकुश सत्ता प्रस्थापित केली. टेर्‌रा १९३८ पर्यंत राष्ट्राध्यक्ष होता. दुसऱ्या महायुद्धकाळात अर्जेंटिनातील राजकीय अस्थिरतेमुळे या देशाला बरेच नुकसान पोहोचले. अर्जेंटिनाचा हुकूमशहा पेरॉन याच्या दडपशाहीला कंटाळून बरेच अर्जेंटिनी नेते यूरग्वायमध्ये आश्रयाला आले होते. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याबद्दल पेरॉनचे सतत दडपण देशावर येत राहिले. एवढेच नव्हे, तर अर्जेंटिनाने आर्थिक बहिष्कारही या देशावर लादला. विशेषत: गहू, इतर अन्नपदार्थ व वस्तू यांच्या निर्यात व्यापारावर बंदी घालण्यात आली. अन्नधान्याच्या तुटवडा भरून काढण्यासाठी यूरग्वायमधील अनेक चराऊ कुरणे खूप खर्च सोसून गव्हाच्या उत्पादनासाठी तयार करण्यात आली.


देशात १९५२ साली नवे संविधान जाहीर करण्यात आले आणि बात्येच्या कल्पनेप्रमाणे मंडलीय राष्ट्राध्यक्षीय पद्धत सुरू करण्यात आली. तथापि १९६७ साली ही पद्धत पुन्हा बरखास्त करण्यात आली. तिच्याऐवजी राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष अशी पदे निर्माण करण्यात आली. कारण ९ सदस्यांची ही मंडलीय कार्यकारी यंत्रणा देशाच्या आर्थिक व सामाजिक समस्या सोडविण्यात अपयशी ठरली. देशातील आर्थिक समस्या हळूहळू वाढत होत्या. उत्पादक उद्योगधंद्यांत मंदीमुळे व वाढत्या उत्पादनखर्चामुळे आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला होता. मांस व लोकर हे देशाचे प्रमुख निर्यात पदार्थ. त्यांमागील पशुपालनाचे जे क्षेत्र होते, त्यात नवीन तांत्रिक सुविधांचा अवलंब करण्यात आला नाही. गवतांचे नवीन प्रकार, नवीन खते व जंतुनाशके आणि नव्या तांत्रिक सुविधा यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. मांसनिर्मितीच्या उद्योगात आंतरराष्ट्रीय स्पर्धा मोठी होती व तीत हा देश वरील कारणांमुळे मागे पडला. मेंढ्यांचे आणि त्यांपासूनच्या लोकरीचे उत्पन्न हेदेखील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टिकाव धरू शकले नाही. सामाजिक सुरक्षा व कल्याणाच्या योजनाही कालानुसार योग्य प्रकारे बदलण्यात आल्या नाहीत. त्यामुळे आर्थिक समस्या अधिकच वाढल्या. आणखी एक बाब म्हणजे कामगारांना एकाच ठिकाणी त्यांच्या अपेक्षेइतके व गरजेइतके काम मिळत नसे. एकच कामगार दोन – तीन ठिकाणी काम करून पोट भरत असे. त्यामुळे अपुरे काम आणि कामगाराची अकार्यक्षमता वाढून अथव्यवस्थेवर याचा विपरीत परिणाम झाला.

सार्वत्रिक राजकीय असंतोषाची वरील आर्थिक पेचप्रसंगात अधिकच भर पडली. १९५९ ते १९६७ च्या दरम्यान दोन वेळा ब्लँको पक्ष सत्तेवर आला आणि त्या काळात अर्थव्यवस्था सुधारण्याचे प्रयत्न करण्यात आले. सामाजिक असंतोषही वाढत होता. १९६० नंतरच्या दशकात देशात अनेक संप घडून आले. १९६८ साली तर ९ महिने नागरिकांचे घटनात्मक हक्कही शासनाने काढून घेतले होते. या परिस्थितीचा फायदा कम्युनिस्ट विचारसरणीच्या ‘नॅशनल लिबरेशन चळवळी’ला मिळाला. कम्युनिस्ट विचारप्रणालीचा हा पक्ष ‘तूपामारोस’ म्हणून ओळखला जातो. उच्च व मध्यम वर्गांतील तरुण या पक्षात होते आणि क्यूबाचा नेता फिडेल कास्ट्रो याच्या यशस्वी गनिमी युद्धतंत्राचा आदर्श त्यांच्यापुढे होता. बँकांवरील दरोडे, व्यक्तींचे अपहरण, लहानमोठी गावे काही काळ ताब्यात घेणे, कारागृहातून पळून जाणे अशा प्रकारच्या लढ्याचे तंत्र तूपामारोस पक्षियांनी सुरू केले. परंतु पुढे त्यांनी पोलीस आणि सैनिक यांची हत्या करण्याचे सत्र सुरू केले व देशातील लोकमत त्यांच्याविरुद्ध झाले. १९७१ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोलोरॅडो पक्षाचा यूआन बॉर्डबेरी निवडून आला, पण त्याला फार मोठे मताधिक्य लाभले नाही, तसेच समाजवादी, कम्युनिस्ट आणि ख्रिश्चन डेमोक्रॅटिक या पक्षांच्या संयुक्त आघाडीला मोठ्या प्रमाणात मते मिळाली. बॉर्डबेरीने तूपामारोस गनिमांचा बंदोबस्त करण्यासाठी लष्कराची मदत घेऊन साधारणपणे वर्षभरातच ही संघटना निष्प्रभ करून टाकली. १९०४ च्या यादवी युद्धानंतर प्रथमच देशाच्या राजकारणात सैनिकी दलाने महत्त्वाचे कार्य पार पाडले. त्यामुळे सैनिकी नेत्यांची राजकीय आकांक्षा वाढली आणि १९७३ साली उठाव करून त्यांनी सत्ता बळकावली. विधिमंडळ बरखास्त करण्यात आले. १९७६ मध्ये बॉर्डबेरीला दूर करून त्याच्या जागी अपारेशिओ मेंडेझ या कळसूत्री राष्ट्राध्यक्षाची नेमणूक करण्यात आली. देशातील ही लष्करी राजवट अत्यंत क्रूर व कठोर ठरली. देशातील राजकीय कैद्यांचे प्रमाणही फार मोठे होते. मोठमोठ्या विरोधी पक्षनेत्यांच्या सरकारी हस्तकांकरवी परदेशांत, विशेषत: अर्जेंटिनात, हत्या करण्यात आल्या. नागरी स्वातंत्र्य काढून घेण्यात आले, कामगारांचे हक्क कमी करण्यात आले. शैक्षणिक संस्था व विद्यापीठे यांमधून तथाकथित शुद्धीकरण करण्यात आले. देशातील अनेक विचारवंत परदेशांत पळून गेले. लष्करी शासनाने मुक्त अर्थव्यवस्थेचा व व्यापाराचा पुरस्कार केला. पशुपालनाच्या उद्योगावर याचा काहीसा चांगला परिणाम कमी उत्पादनखर्चामुळे घडून आला. लष्करी राजवटीत माँटेव्हिडिओ व त्याच्या नागरी औद्योगिक परिसरात इमारत बांधकामास विशेष चालना देण्यात आली. पण त्यामुळे भांडवल गुंतवणुकीची अधिक महत्त्वाची क्षेत्रे उपेक्षित राहिली. १९८० साली सैनिकी शासनाने संविधानात्मक शासनाचे आश्वासन दिले, तथापि नवीन संविधानात लष्कराला रोधाधिकार वापरण्याची तरतूद होती. लष्करी शासकांची ही सगळीच योजना अत्यंत हुकूमशाही स्वरूपाची असल्याने १९८० साली तीसंबंधी लोकमत घेण्यात आले आणि लोकांनी ती फेटाळून लावली. १९८१ मध्ये जनरल अल्वारेथ हा राष्ट्राध्यक्ष झाला. १९८४ मध्ये देशात राष्ट्राध्यक्षीय निवडणुका घेण्यात आल्या. यात कोलोरॅडो पक्षाचा ज्यूलिओ सॅग्विनेता हा नेता राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला. ब्लँको आणि ब्रॉड फ्रंट पक्ष (समाजवादी, कम्युनिस्ट इ. पक्षांची संयुक्त आघाडी) यांनी निवडलेले त्यांचे पहिले उमेदवार सैनिकी शासनाने रोधाधिकार वापरून अमान्य केले होते. १२ फेब्रुवारी १९८५ रोजी जनरल अल्वारेथ याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला १ मार्च १९८५ पासून देशात लोकशाही शासन चालू आहे. देशाच्या मंत्रिमंडळात संरक्षण, परराष्ट्रीय व्यवहार, अर्थ इत्यादी खाती असून त्यांवर स्वंतत्र मंत्री नेमलेले आहेत. देशात १९ प्रांत असून प्रत्येक प्रांतात १९७३ पूर्वी एकसदनी विधिमंडळ होते. १९७३ नंतरच्या काळात केंद्रीय शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत प्रांतिक कारभार चालत असे. सैनिकी शासनाने ४ सैनिकी विभाग स्थापन केले होते. १९७७ पासून न्याय खाते एका स्वतंत्र मंत्र्याकडे सोपविण्यात आले. कार्यकारी मंडळ आणि न्यायालय यांच्यातील परस्परसंबंध त्याचप्रमाणे इतर न्यायविषयक कामे या मंत्र्याच्या अखत्यारीत येतात. पाच सदस्यांचे कोर्ट ऑफ जस्टिस असून कार्यकारी मंडळाच्या सूचनेनुसार राष्ट्रीय समितीकडून (कौन्सिल ऑफ द नेशन) त्यांची पाच वर्षांसाठी नेमणूक करण्यात येते. संविधानात्मक व आंतरराष्ट्रीय अशा बाबी या न्यायालयाच्या अखत्यारीत येतात. चार अपील न्यायालये असून त्यांवर प्रत्येकी तीन न्यायाधीश नेमलेले असतात. या न्यायालयांकडील अपीले कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये न्यायनिर्णयार्थ सादर केली जातात. माँटेव्हिडिओमध्ये आठ दिवाणी न्यायालये व तीन फौजदारी न्यायालये आणि सुधार न्यायालये आहेत. देशात १९ प्रांत असून त्या प्रत्येकात एक प्रांतिक न्यायालय असते. एकूण २२४ न्यायिक विभाग असून तेथे जस्टिस ऑफ द पीस या नावाने ओळखले जाणारे न्यायालय असते. १९०७ साली मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्यात येऊन त्याऐवजी ३० ते ४० वर्षे कारावासाची शिक्षा देण्यात येऊ लागली.

देशाच्या भूसेनेत एक ते दोन वर्षांच्या कालावधीसाठी स्वयंसेवकांची भरती करण्यात येते. घोडदळ, पायदळ, तोफखाना व सैनिकी अभियांत्रिकी यांच्या अनुक्रमे तीन, पाच, एक, एक अशा ब्रिगेड भूसेनेत असून हवाई संरक्षण आणि छत्रीधारी सैनिक यांची प्रत्येकी एक बटालियन आहे. भूसेनेत विविध प्रकारचे हलके रणगाडे आहेत. भूसेनेचे एकूण बळ २२,३०० असून राखीव सेनेची संख्या १,२०,००० आहे. देशाच्या नौसेनेत किनारा संरक्षक नौका, वाहतूक व प्रशिक्षणाच्या नौका इत्यादींचा अंतर्भाव होतो. नौसेनेचे एकूण बळ ५,५०० असून अमेरिकन यंत्रसामग्रीने सुसज्ज केलेली ३० विमाने व चार हेलिकॉप्टर यांचा उपयोग नौसेनेच्या हवाई सेवेसाठी करण्यात येतो. देशाच्या वायुसेनेलाही सर्व प्रकारचे अमेरिकन साहाय्य लाभले आहे. वायुसेनेचे बळ ३,५००  असून तीत ११० विमाने आहेत. वायुसेनेत विविध प्रकारची लढाऊ व इतर विमाने आढळतात. हवाई प्रतिकार, हवाई हल्ला, टेहेळणी, वाहतूक, संशोधन इ. कार्यांसाठी वेगवेगळ्या स्क्वॉड्रन वायुसेनेत आहेत.


आर्थिक स्थिती : देशात पशुपालनाला सर्वांत अधिक महत्त्व आहे. १६५·९ लक्ष हे. शेतजमिनीपैकी ९०% जमीन ही पशुपालनार्थ आणि उर्वरित १०% जमीन कृषीउत्पादनासाठी वापरली जाते. मोठ्या जमीनदारीचे प्रमाण कमी आहे. लहानमोठ्या कुटुंबांच्या ताब्यातील शेतजमिनी मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतमजुरांना किमान वेतन अधिनियम लागू असणारा लॅटिन अमेरिकेतील हा एकमेव देश आहे. देशाच्या एकूण निर्यातीपैकी ३४·९% निर्यात ही पशू आणि पशुउत्पादने यांची होती (१९८३). या वर्षाची इतर आकडेवारी अशी : १ कोटी गुरेढोरे २ कोटी १२ लक्ष मेंढ्या ५,३०,००० घोडे ४,५०,००० डुकरे १२,००० बकऱ्या ८० लक्ष कोंबड्या, १९८१ – ८२ साली लोकर उत्पादन ८१,३०० टन होते. पायसांडू, रीओ नेग्रो, कोलोन्या, सॅन होसे, सोर्यानो व फ्लॉरिडा या प्रांतांत देशातील प्रमुख कृषिउत्पादने घेतली जातात. प्रत्येक शेताचे सरासरी क्षेत्र १०२ हे. असते. १९८३ ची कृषिउत्पादनाची आकडेवारी (टनांत) पुढीलप्रमाणे : गहू – ३,६३,१०० गळिताची धान्ये – ४,७०० जवस – २६,६०० सातू – ४५,००० मका – १,०३,७०० तांदूळ – ३,२३,०००.

तांदूळ उत्पादनात हा देश स्वयंपूर्ण असून थोडाफार तांदूळ निर्यातही करण्यात येतो. देशात ३ साखर कारखाने असून ऊस आणि विशेषत: बीट यांपासून सु. ९२,००० टन साखरेचे उत्पादन करण्यात येते. मद्याचे उत्पादनही माँटेव्हिडिओ आणि इतर काही शहरांतून करण्यात येते. देशात सु. ६० लक्ष फळझाडे असून सप्ताळू, संत्री, नासपती ही प्रमुख फळे होत. देशातील वनोउत्पादात १९८० साली १७·२९ लक्ष घ. मी. लाकूड प्राप्त झाले. मत्स्यव्यवसायही महत्त्वाचा असून १९८३ चे मत्स्योत्पादन १,४२,३०० टन होते. मत्स्यनिर्यातीचे त्या वर्षीचे मूल्य ४·३० कोटी अमेरिकन डॉलर होते.

देशातील लहानमोठ्या नोंदणीकृत उद्योगधंद्यांची संख्या ७७,००० असून त्यांत ४·०५ लक्ष कर्मचारी होते (१९७८). मांस डबाबंदीकरण, तेलशुद्धीकरण, सिमेंट, अन्नोत्पादने, शीतपेये, कातडी व वस्त्रनिर्मिती, रसायने, अभियांत्रिकीय आणि वाहतूक साधने इ. उद्योगधंदे प्रमुख आहेत. देशात सु. १०० कापडगिरण्या असून त्यांपैकी मोठ्या गिरण्या फक्त सहाच आहेत. परकीय भांडवल गुंतवणुकीस शासनातर्फे प्रोत्साहन देण्यात येते. सार्वजनिक सुविधांच्या नव्या उपक्रमांत देशातील विमानतळ, माँटेव्हिडिओ बंदर, राष्ट्रीय महामार्ग, वीज व ऊर्जा उत्पादन आणि दूरसदेशवहन इत्यादींच्या आधुनिकीकरणावर भर देण्यात येत आहे.

देशातील कामगार संघटनांची एकूण सदस्य संख्या १·५ लक्ष आहे. देशातील बेकारीचे प्रमाण सु. १५·५% टक्के होते (१९८३). अमेरिका, नायजेरिया, व्हेनेझुएला, मध्यपूर्वेतील देश, अर्जेंटिना, पूर्व जर्मनी, ग्रेट ब्रिटन या देशांकडून विविध पदार्थांची आयात केली जाते. ब्राझील, अर्जेंटिना, पश्चिम जर्मनी, रशिया, ईजिप्त या देशांशी निर्यात व्यापार चालतो. आयात पदार्थांत रसायने, वाहतूक साधने, इंधन, यंत्रसामग्री इत्यादींचा आणि निर्यातीत मांसोत्पादने, कातडी उत्पादने, लोकर व भाजीपाला यांचा अंतर्भाव होतो. पर्यटन हाही देशातील प्रगतिपर व्यवसाय असून १९८१ साली पर्यटकांची संख्या सु. ४,८०,९०० होती.

न्यू पेसो हे देशाचे चलन आहे. देशाचा अर्थसंकल्प सामान्यपणे ५ वर्षांच्या मुदतीचा असतो. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अर्थसंकल्प सादर करण्यात येतो. संसदेने तो अर्थातच मंजूर करावा लागतो. ५०, १००, ५०० व १,००० न्यू पेसोच्या नोटा प्रचलित आहेत. १९८५ चा विनिमय दर १ अमे. डॉ. = ९०·०५ पेसो असा होता.‘बँक ऑफ द रिपब्लिक’ ही देशातील मुख्य बँक (स्थापना १८९६). तिचे अध्यक्ष आणि संचालक शासनाकडून नियुक्त करण्यात येतात.‘बँको सेंट्रल’ची स्थापना १९६७ साली करण्यात आली. विमाव्यवसाय शासनाधीन असून तो राष्ट्रीय विमा बँकेतर्फे चालविण्यात येतो. देशात एकूण देशी – परदेशी मिळून २५ बँका आहेत. देशात मेट्रिक पद्धतीचा अवलंब १८६२ पासून करण्यात आला.

दळणवळण : देशातील एकूण महामार्गांची लांबी ९,८९९ किमी. असून त्यांपैकी ५,००० किमी. रस्ते पक्क्या बांधणीचे आहेत. २,२०,००० मोटारगाड्या आणि ९२,१५० ट्रक व बसगाड्या होत्या (१९७८). एकूण लोहमार्ग २,९८७ किमी. लांबीचे असून त्यांची उभारणी ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीतून करण्यात आली. १९४८ साली ब्रिटिशांकडून सर्व लोहमार्ग विकत घेण्यात आले. १९५२ सालापासून देशातील रेल्वे प्रशासन एकाच खात्याच्या अखत्यारीत देण्यात आले. लोहमार्गांत विविध प्रकारच्या सुधारणा सतत केल्या जात आहेत.

माँटेव्हिडिओपासून २२·५ किमी. अंतरावर कारास्को हा देशातील महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. शासनातर्फेच देशांतर्गत तसेच ब्राझील, पॅराग्वाय, अर्जेंटिना आणि स्पेन या देशांपर्यंत विमानसेवा उपलब्ध करण्यात आली आहे. नद्यांचाही जलवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात येतो. सामान्यपणे १,२७० किमी. लांबीचे जलमार्ग उपलब्ध आहेत. सागरी जलवाहतुकीचे माँटेव्हिडिओ हेच केंद्र आहे.

देशातील दूरध्वनी व्यवस्था शासनाच्या ताब्यात असून अंतर्भागात मात्र ती काही छोट्या कंपन्यांमार्फत चालविण्यात येते. देशात २ लक्ष ९४ हजार ३५० दूरध्वनिसंच होते तसेच टपाल कचेऱ्यांची संख्या १,२७७ होती (१९८२). एकूण १०२ नभोवाणी केंद्रे तसेच १० लक्ष बिनतारी संदेश योजना संच व ४·४ लक्ष दूरचित्रवाणी संच आहेत. देशात एकूण १५ दूरचित्रवाणी प्रक्षेपण केंद्रे आहेत. चित्रपटगृहांची संख्या १९८० साली ८५ होती.


लोक व समाजजीवन : विद्यमान यूरग्वायन समाज हा मोठ्या प्रमाणावर मिश्रवंशीय आहे. येथील मूळचे स्थानिक इंडियन समूह आणि यूरोपीय वसाहतकार, विशेषत: स्पॅनिश व इटालियन, यांच्यात सोळाव्या शतकापासूनच वर्णसंकर होत गेला. यूरग्वायन समाजात मूळ जर्मन, ब्रिटिश आणि इतर यूरोपीय अशा लोकांची संख्या फार कमी आहे. १८०० च्या आसपास यूरग्वायन समाज हा प्रामुख्याने वर्णसंकरात्मकच होता. या मिश्रवंशीय लोकांना ‘मेस्टिझो’ असे नाव आहे. वाढती चराऊ कुरणे उपलब्ध झाल्याने देशाच्या अंतर्भागात पशुपालनाच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर यूरोपीय लोक पसरले. माँटेव्हिडिओ शहराच्या परिसरात मांसप्रक्रिया व लोकर यांचे मोठे उद्योगधंदे त्यांनी सुरू केले. एकूण लोकसंख्येपैकी १०% लोक मेस्टिझो आणि २ टक्क्यांहून कमी मूळ आफ्रिकी आहेत. स्पॅनिश हीच येथील लोकांची भाषा आहे तथापि तिच्यावर इटालियन भाषेचा ठसा दिसतो. बहुसंख्य लोक हे माँटेव्हिडिओ, पायसांडू, साल्टो, मेर्सेडेस यांसारख्या मोठ्या शहरांतूनच राहतात. देशातील जननमान कमी आहे. ‘मध्यमवर्गीयांचा देश’ असे यूरग्वायचे वर्णन करता येईल. हे लोक लहानमोठे व्यापारधंदे आणि शासकीय सेवांमध्ये काम करतात. मांस – डबाबंदीकरणाच्या उद्योगात मोठ्या प्रमाणावर कामगार आढळतात. तसेच वाहतुकीच्या व्यवसायातही कामगारवर्ग दिसून येतो. तथापि ग्रामीण भागात शेतकरी वर्ग व पशुपालक यांची संख्या मोठी आहे. १९६० पूर्वी सर्वसामान्य यूरग्वायन नागरिकाचे राहणीमान उच्च प्रतीचे होते. येथील लोकांचे आरोग्यही सर्वसामान्यपणे चांगल्या प्रकारचे आहे. देशात धार्मिक स्वातंत्र्य आहे. बहुसंख्य यूरग्वायन लोक हे रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. माँटेव्हिडिओ येथे रोमन कॅथलिक आर्चबिशपचे पीठ असून देशात एकूण १० बिशप – पीठे आढळतात. १९५७ साली प्रॉटेस्टंट पंथीयांची संख्या सु. १०,५०० होती. प्राथमिक शिक्षण सक्तीचे असून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत आहे. देशात १,०५० प्राथमिक शाळा असून त्यांत ३,६४,९१० विद्यार्थी व १०,३०० शिक्षक होते(१९७९). २४९ माध्यमिक शाळांतून १, ९६, ४६२ विद्यार्थी शिकत होते (१९७९). प्रौढांसाठी सायंकाळचे शिक्षणवर्ग आहेत. निरक्षरता फक्त वयस्कर लोकांतच आढळून येते. माँटेव्हिडिओ येथे विद्यापीठ (स्था. १८४९) आहे. या विद्यापीठात १० विद्याविभाग असून तेथील शिक्षणही देशातील व परदेशांतील विद्यार्थ्यांना मोफत आहे. ४३ विद्यालयांतून उच्च माध्यमिक शिक्षणाची सोय आहे. मानव्यविद्या आणि धंदेशिक्षण देणारे एक महाविद्यालयही शहरात आहे. रोमन कॅथलिक पंथाच्या धार्मिक पाठशाळाही देशात सर्वत्र असून त्यांत आधुनिक शालेय शिक्षणाची सोय केलेली आहे. अंध, मूकबधिर यांच्यासाठीही एकेक शाळा असून गृहविज्ञानाचे शिक्षण देणारी संस्थाही देशात आहे. माँटेव्हिडिओ येथे श्रमिक विद्यापीठ असून त्यात औद्योगिक आणि कृषिविषयक तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. शिक्षक – प्रशिक्षण संस्थांची संख्या सु. ४० आहे.

देशातील सर्व नागरिक आरोग्य विमायोजनेचा लाभ घेऊ शकतात. आरोग्य सेवेचे स्वरूप दुसऱ्या महायुद्धपूर्व काळात चांगल्या प्रकारचे होते. तथापि त्यानंतरच्या काळात ते आर्थिक पेचप्रसंगामुळे पुरेसे समाधानकारक राहिले नाही. डॉक्टरांची संख्या सु. ५,६०० असून रुग्णालयातील खाटांची संख्या सु. २३,००० होती (१९८१).

माँटेव्हिडिओ येथून देशातील प्रमुख राष्ट्रीय वृत्तपत्रे प्रसिद्ध होतात. त्यांचा एकूण खप सु. २ लाख आहे. प्रांतिक वृत्तपत्रे सामान्यतः साप्ताहिक स्वरूपाची आहेत. देशातील ग्रंथालयांची संख्याही मोठी आहे. माँटेव्हिडिओ येथील राष्ट्रीय ग्रंथालय व राष्ट्रीय अभिलेखागार सबंध लॅटिन अमेरिकेत संग्रह व व्यवस्था या दृष्टींनी सर्वोत्तम मानले जातात. ग्रंथप्रकाशन व्यवसायही उल्लेखनीय आहे.

यूरग्वायन साहित्य हे स्पॅनिश भाषेत आहे. होसे रॉदो हा प्रसिद्ध यूरग्वायन निबंधकार. एरिएल (१९००) हा त्याचा छोटा निबंधसंग्रह म्हणजे जडवादी अमेरिकेच्या आक्रमणाविरुद्ध लॅटिन अमेरिकेने नोंदविलेला निषेधच आहे, असे मानले जाते. कार्लोस रेलेस हा कादंबरीकार आणि होसे झोरिला दे सान मार्तीन हा कवी प्रसिद्ध आहे. इब्‌सेनशी तुलना केला जाणारा नाटककार फ्लोरेंथ्यो सांचेथ हा यूरग्वायमध्ये जन्मला तथापि तो अर्जेंटिनातच दीर्घकाळ राहिला होता. सामाजिक विज्ञानाच्या क्षेत्रातही यूरग्वायन विचारवंतांनी बरेच काम केले आहे. उदा., कामगार चळवळीबद्दल लिहिणारा कार्लोस रामा इत्यादी. चित्र – शिल्पादी ललित कलांना उत्तेजन देण्याचे काम राष्ट्रीय ललित कला संस्था करीत असते. ऐतिहासिक चित्रकलेच्या क्षेत्रात पेद्रो फिगारी हा यूरग्वायन चित्रकार उल्लेखनीय असून तो वरील संस्थेचा पदवीधर आहे. झोरिला मार्तीन या कवीचा मुलगा होसे लुईस हा उत्तम शिल्पकार असून त्याचे गाउचो (गुराखी) चे शिल्प माँटेव्हिडिओच्या एका चौकात आहे. माँटेव्हिडिओ येथील राष्ट्रीय वाद्यवृंद प्रसिद्ध असून त्यात १०० वादक असतात. टँगो नृत्यसंगीत येथे लोकप्रिय आहे. सॉकर हा येथील लोकप्रिय खेळ. जागतिक फुटबॉल स्पर्धेत यूरग्वायचा फुटबॉल संघ महत्त्वाचा मानला जातो. १९३० साली फुटबॉलचा विश्वचषक यूरग्वायने जिंकला होता.

महत्त्वाची स्थळे : यूरग्वायमध्ये ऐतिहासिक – सांस्कृतिक दृष्टींनी माँटेव्हिडिओ या राजधानीला अत्यंत महत्त्व आहे. येथील उद्याने आणि उपवने, त्याचप्रमाणे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या संस्था आणि वास्तू यांमुळे पर्यटकांचे ते मोठेच आकर्षण ठरते. ‘गुलाबांची नगरी’ म्हणूनही ते ओळखले जाते. माँटेव्हिडिओच्या पूर्वेस सु. १४५ किमी. अंतरावरील पूंता देल एस्टे हे तेथील पुळण, निसर्गसौंदर्य आणि हॉटेले यांसाठी प्रसिद्ध आहे. यूरग्वाय नदीवरील साल्टो ही प्रांतिक राजधानी मद्य, फळांचे रस, जहाजबांधणी इ. उद्योगधंद्यांसाठी प्रसिद्ध आहे तसेच कातडी व कातडी वस्तू निर्यातीचे हे महत्त्वाचे केंद्र आहे. उत्तरेकडील कृषिक्षेत्रातील रीव्हेरा हे महत्त्वाचे शहर पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे. मेलो हे देशातील उत्पादनांचे मोठे वितरण केंद्र आहे. मेर्सेडेस हे नेग्रो नदीवरील बंदर व्यापारासाठी तसेच पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.

जाधव, रा. ग.

संदर्भ : 1. Finch, M. H. J. A Political Economy of Uruguay since 1870, New York, 1982.

    2. Fitzgibbon, R. H. Uruguay : Portrait of a Democracy, New Brunswick, 1954.

    3. Gilio, M. E. The Tupamaro Guerrillas : Structure and Strategy of the Urban Guerilla Movement, New York, 1972.

   4. Hanson, S. G. Utopia in Uruguay : Chapters in the Economic History of Uruguay, Oxford, 1938.

   5. Kaufman, Edy, Uruguay in Transition : From Civilian to Military Rule, New Brunswick,1979.

  6. Pendle, George, Uruguay: South America’s First Welfare State, London, 1952.

  7. Porzecanski, A. C. Uruguay’s Tupamaros, London, 1973.

  8. Wills, Jean Historical Dictionary of Uruguay, Metuchen (N. J.), 1974.


यूरग्वायसंसदभवन, माँटेव्हिडिओ राजधानी माँटेव्हिडिओतील 'स्वातंत्र्य चौक'माँटेव्हिडिओ बंदराचे दृश्यगुरेपालन : देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधार.