हामादान : इराणच्या हामादान प्रांताची राजधानी व देशातील एक प्रमुख शहर. हे तेहरानच्या नैर्ऋत्येस सु. ३७० किमी.वर, अल्वाद पर्वताच्या पायथ्याशी कारासू नदीच्या सुपीक मैदानी प्रदेशात सस.पासून १,८७७ मी. उंचीवर वसलेले आहे. लोकसंख्या १७,५८,२६८ (२०११). पूर्वी वेगवेगळ्या काळात हे बिट दाइउक्की, हंगमातान किंवा अगबातान, एक्बॅतन या नावांनी संबोधले जात होते. हे तेहरान-बगदाद महामार्गावरील महत्त्वाचे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराचा उल्लेख बायबलच्या जुन्या करारातील एझ्रा या पुस्तकामध्ये आहे.सायरस द ग्रेट याच्या कारकीर्दीत त्याच्या राज्याची राजधानी येथेहोती (इ. स. पू. ५५०). इ. स. पू. ३३० मध्ये हे अलेक्झांडरच्या ताब्यात होते. इ. स. ६४१-४२ मध्ये अरबांनी यावर अंमल प्रस्थापित केला आणि यास अरबस्तानच्या राजधानीचा दर्जा मिळाला. बाराव्या शतकाच्या सुरुवातीस सेल्जुक तुर्कांची येथे राजधानी होती. सुमारे १२२० मध्ये मंगोलांनी हे शहर उद्ध्वस्त केले, तर १३८६ मध्ये तैमूरलंगने हेजिंकले होते. सतराव्या शतकात याची काही अंशी पुनर्बांधणी करण्यात आली. दरम्यानच्या कालावधीत येथे इराणी सत्ताधीश व ऑटोमन यांची थोड्याथोड्या काळाकरिता सत्ता होती. १९८० च्या इराण-इराक युद्धात याचे बरेच नुकसान झाले होते.

 

हामादान ही परिसरातील कृषिमालाची बाजारपेठ आहे. प्राचीन काळा-पासून हामादान सुंदर कलाकृतींसाठी प्रसिद्ध आहे. येथे गालिचे, चामड्याच्या वस्तू व रग निर्मिती इ. हस्तकला उद्योगांचा विकास झाला आहे. इराणमधील रग उत्पादनात या शहराचा दुसरा क्रमांक लागतो. उन्हाळ्यात येथील हवामान आल्हाददायक असल्याने आरोग्यधाम म्हणून यास असलेले महत्त्व तसेच येथील अवीसेनाची कबर, जामा-इ-मशीद, मदर मेरी चर्च इत्यादींमुळे यास अनेक पर्यटक भेट देतात.

पुजारी, ए. ए.