भंडारा शहर : महाराष्ट्रातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५६,०२९ (१९८१). हे नागपूर-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर, नागपूरच्या पूर्वेस ६४ किमी. वैनगंगा नदिच्या तीरावर वसले आहे. नागपूर-हावडा लोहमार्गावरील भंडारा रोड हे याचे स्थानक शहरापासून ११ किमी. अंतरावर आहे. शहराच्या उत्तरेस १.५ किमी. अंतरावरच वैनगंगेला सुर ही उपनदी येउन मिळते.

शहराचे नाव ‘भाणारा’ या शब्दावरुन आले असून येथील स्थानिक लोक अजूनही याचा तसा नामनिर्देश करतात. भाणारा असा उल्लेख इ. स. ११०० मधील एका शिलालेखात मिळतो. भंडारा हे पितळी भांड्यांसाठी पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. त्यावरुनच ‘भाण’ हा शब्द भांड्यांच्या अर्थाने उपयोगात आला असावा, त्यामुळे याचे भाणारा असे नाव पडून त्याच्या अपभ्रंशाने भंडारा हे नाव शहराला पडले असावे. बाराव्या शतकात रतनपुर येथील हैहयवंशीय राजाचा मांडलिक राजा येथे राहत असे, तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांनी भंडाऱ्याला भेट दिली होती. महानुभावाच्या स्थान-पोथीत या गावाचा भंडारा असा उल्लेख सापडतो. १८२० पासून हे जिल्ह्याचे मुख्य ठाणे झाले, तत्पूर्वी जिल्ह्याचा कारभार लांजी येथून चाले. ब्रिटिशांच्या कारकीर्दीत भंडारा हेच राज्यकारभाराचे केंद्र राहिल्याने त्याचा विकास घडून आला. १८६७ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली.

पितळी भांडी व बिड्या तयार करणारे अनेक लहानमोठे कारखाने शहरात आहेत. यांशिवाय कापूस वटण व दाबणी गिरण्या, भात-सडोच्या व पिठाच्या गिरण्या, तेलघाण्या व लाकूड कापण्याच्या गिरण्या आहेत. सुती कापडाच्या किनारीवरील विणकाम तसेच भरतकाम बरेच लोक करतात. येथे एका औद्दोगिक वसाहतीची स्थापना नव्यानेच करण्यात आलेली आहे. कृषिउत्पादनाच्या घाऊक व्यापाराचे हे मुख्य ठिकाण असून येथे गुरांचा बाजारही भरतो.

शहरात ९९ खाटांची सोय असलेला सरकारी दवाखाना असून स्वतंत्र क्षयरोग विभागही आहे. जिल्ह्यात, विशेषतः साकोली व गोंदिया तालुक्यांत, कुष्ठरोग्यांचे प्रमाण जास्त असल्याने त्याला पायबंद घालण्याच्या द्दष्टिने येथे एक स्वतंत्र विभागही उघडला आहे. प्रसूतिगृह, आयुर्वेदीय दवाखाना, गुरांचा दवाखाना इ. वैद्यकीय सेवाही उपलब्ध आहेत. वैनगंगा नदीपात्रात तीन ‘गालन विहिरी’ खोदल्या असून त्यांद्वारे शहरास पाणीपुरवठा केला जातो. शहरात नागपूर विद्यापीठाशी संलग्न असलेली तीन महाविद्यालये आहेत.

शहराच्या मध्यभागी असलेली अंबाई व निबाई (अंबा व लिंब वृक्षदेवता) ही हेमाडपंती मंदिरे, जुना किल्ला (सध्याचे कारागृह), खांब तलाव व त्यातील स्तंभ, तलावाकाठची मंदिरे, मठ, सुंदर बगीचा व कांरजे इ. उल्लेखनीय आहेत.

चौधरी,वसंत