व्हिक्टोरिया सरोवर : (व्हिक्टोरिया न्यांझा). आफ्रिकेतील सर्वांत मोठे व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सरोवर. नाईल नदीचा हा प्रमुख जलाशय आहे. पूर्व आफ्रिकेतील टांझानिया व युगांडा या दोन देशांत या सरोवराचा विस्तार असून केनया या देशाची पश्चिम सरहद्द या सरोवराला येऊन भिडलेली आहे. जगातील गोड्या पाण्याच्या सरोवरांपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने उत्तर अमेरिकेतील सुपीरिअर सरोवरानंतर याचा दुसरा क्रमांक लागतो. अनियमित चौकोनाकार असलेल्या या सरोवराचे क्षेत्रफळ सु. ७०,००० चौ. किमी. आहे. याची दक्षिणोत्तर कमाल लांबी ४०० किमी., पूर्व-पश्चिम कमाल रुंदी २५० किमी. असून किनाऱ्याची लांबी ३,२२० किमी.पेक्षा अधिक आहे. दोन खचदर्यां च्या दरम्यान असलेल्या एका मोठ्या पठारावरील अग्निजन्य खडकयुक्त उथळ खळग्यामध्ये व्हिक्टोरिया सरोवराची निर्मिती झालेली आहे. सरोवराच्या द्रोणी प्रदेशाचे एकूण क्षेत्रफळ २,३८,९०० चौ. किमी. आहे. सरोवराचा पृष्ठभाग सस.पासून १,१३० मी. उंचीवर असून सरोवराची कमाल खोली ८२ मी. आहे.    

ब्रिटिश समन्वेषक जॉन हॅनिंग स्पीक याने १८५८ मध्ये या सरोवराचा शोध लावला. स्पीकने इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ सरोवराला हे नाव दिले. त्यापूर्वी उकेरेवे या नावाने ते अरबांना ज्ञात होते. १८६२मध्ये स्पीक व जे.ए.ग्रँट यांनी, १८६३मध्ये सर सॅम्युएल बेकर याने, १८७५ मध्ये हेन्री स्टॅन्ली याने, तर १९०१मध्ये सर विल्यम गार्स्टीन याने सरोवराची सखोल पाहणी केली. १८९० मध्ये १० दक्षिण अक्षवृत्ताला अनुसरून सरोवराची मालकी इंग्लंड व जर्मनी यांच्यात विभागण्यात आली. १९२० नंतर मात्र सरोवराची संपूर्ण मालकी ब्रिटनकडे आली.

व्हिक्टोरिया सरोवराचा किनारा वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याच्या नैऋत्य काठाची उंची ९० मी. आहे. पश्चिम किनारा वगळता बाकी सर्व किनारे दंतुर आहे. उत्तरेकडील नेपोलियन, ईशान्येकडील काव्हीरोंडा, आग्नेय भागातील स्पीक, नैऋत्य भागातील एमीन पाशा इ. आखाते व दक्षिणेकडील स्मिथ म्वांझा साउंड यांचे किनारे खूपच दंतुर आहेत. याचा उत्तरेकडील भूप्रदेश सपाट व मोकळा आहे. २५ किमी. रुंदीच्या व ६४ किमी. लांबीच्या काव्हीरोंडा आखाताचा विस्तार पूर्वेस कीसूमूपर्यंत (केन्या) झालेला आहे. कीसूमू, कांपाला, एंटेबे, बूकाकाटा, पोर्ट बेल (युगांडा), म्वांझा व बूकोबा (टांझानिया) ही सरोवराच्या तीरावरील प्रमुख शहरे व बंदरे आहेत. सरोवरात अनेक द्वीपसमूह असून काही शैलभित्ती जलाशयाच्या पातळीखालीही आढळतात. स्पीक आखाताच्या उत्तरेस उकेरेवे हे सरोवरातील सर्वांत मोठे बेट असून त्याच्यावरील वनाच्छादीत टेकड्या पाण्याच्या २०० मीटर वर आलेल्या दिसतात. बेटावर लोकसंख्याही दाट आहे. सरोवराच्या वायव्य कोपऱ्यात सेसे द्वीप्समूहातील ६२ बेटे असून त्यांपैकी काही बेटे निसर्गरम्य आहेत.    

सरोवराला अनेक प्रवाह येऊन मिळत असले, तरी त्यांपैकी कागेरा ही सर्वांत मोठी व महत्त्वाची नदी आहे. सरोवरापासून ५० किमी. अंतरावर उगम पावणारी ही नदी पश्चिम किनाऱ्यावर १० दक्षिण अक्षवृत्ताच्या काहीशा उत्तरेस व्हिक्टोरिया सरोवराला मिळते. तेथे तिने त्रिभुज प्रदेशाची निर्मिती केलेली असून तेथे लव्हाळ्यासारख्या पपायरस अँबॅच या दलदली वनस्पती आढळतात. कागेराच्या उत्तरेस कटोंगा ही दुसरी महत्त्वाची नदी आहे. व्हिक्टोरिया नाईल ही जींजा (युगांडा) येथे सरोवरातून बाहेर पडणारी एकमेव नदी असून ती उत्तर किनाऱ्यावर बाहेर पडून ईशान्येस ॲल्बर्ट सरोवराकडे वाहत जाते. पर्जन्यवृष्टीमुळे सरोवराला मोठ्या प्रमाणावर पाणीपुरवठा होतो. सरोवरातील पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने व्हिक्टोरिया नाईल नदीवर जींजा येथे ‘ओएन फॉल्स’ हे धरण १९५४मध्ये बांधून पूर्ण करण्यात आले. या धरणापासून फार मोठ्या प्रमाणावर जलविद्युत्शक्तीही निर्माण करण्यात येते. सरोवरातून छोट्या स्वयंचलित नावांची वाहतूकसेवा उपलब्ध आहे. दोनशेहून अधिक माशांच्या जाती सरोवरात असून टिलापिया हे आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक महत्त्वाचे मासे या सरोवरात आहेत. सरोवराच्या किनारी भागात मगरी, सुसरी व पाणघोडा हे प्राणी आढळतात. 

व्हिक्टोरिया सरोवराभोवतीचा सु. ८० किमी.पर्यंतचा भूप्रदेश म्हणजे आफ्रिकेतील सर्वांत दाट लोकवस्तीचा प्रदेश आहे. त्यामधील बहुतांश लोक बांतू भाषिक आहेत. तसेच हा भाग प्रमुख कृषिविभागही आहे. या भागात प्रामुख्याने कॉफी, कापूस, ऊस, मका इ. अन्नधान्याची पिके होतात.                                                                                 

चौधरी, वसंत