रायदुर्ग : आंध्र प्रदेश राज्याच्या अनंतपूर जिल्ह्यातील रायदुर्ग तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३२,७४५ (१९८१). हे अनंतपूरच्या पश्चिमेस ९० किमी. व कर्नाटकातील बेल्लारीपासून दक्षिणेस ५१ किमी.वर आहे. बेल्लारीशी हे लोहमार्गाने, तर अनंतपूरशी रस्त्याने जोडले आहे. रायदुर्ग तालुका १९५३ पूर्वी बेल्लारी जिल्ह्यात होता. बेल्लारी जिल्हा प्रथम मद्रास राज्यात होता त्यानंतर त्याचा कर्नाटक राज्यात समावेश करण्यात आला. आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती १९५३ मध्ये झाल्यावर रायदुर्ग तालुक्याचा व ठिकाणाचाही समावेश आंध्र प्रदेश राज्याच्या अनंतपूर जिल्ह्यात करण्यात आला. येथे नगरपालिकेची स्थापना १९६३ मध्ये करण्यात आली.
सुरुवातीला रायदुर्ग हा बेडर (बोया पालेमार) यांचा बालेकिल्ला होता. भूपती राय याच्या नेतृत्वाखाली ते विजयानगरच्या साम्राज्यात समाविष्ट करण्यात आले. त्यावरूनच येथील टेकडी भूपती रायनी कोंडा किंवा रायदुर्ग म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतरही अनेकदा या किल्ल्याचे हस्तांतरण झाले. १८०० मध्ये बेल्लारी जिल्हा व त्यातील रायदुर्ग किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला. येथील टेकडीचे दोन भाग असून एक भाग अधिक उंचीचा (सस.पासून ८३१ मी.) आहे. किल्ल्याची तटबंदी दोन्ही भागांभोवती आहे. हा किल्ला जंग नाईक यांनी बांधल्याचे सांगितले जाते. किल्ल्याची बरीच पडझड झालेली असून आज केवळ त्याचे भग्नावशेष पहावायस मिळतात. तेथे थोडीबहुत वस्तीही आहे. तेथे नरसिंहस्वामी, एल्लमा, हनुमान तसेच एक जैन मंदिर आहे. दरवर्षी चैत्र महिन्यात येथे एल्लमाची मोठी जत्रा भरते. नगरात रेशमी कापड विणणे, कातडी कमावणे, खादी निर्मिती हे व्यवसाय असून एक कापडगिरणीही आहे. परिसरातील भुईमूग, चिंच ह्यांचे उत्पादन महत्त्वाचे आहे.
चौधरी, वसंत