यार्मथ : ग्रेट यार्मथ. ग्रेट ब्रिटनच्या नॉरफॉक परगण्यातील बंदर आणि सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ व आरोग्यस्थान. लोकसंख्या ४८,२७३ (१९८२ अंदाज). हे लंडनच्या ईशान्येस १९५ किमी., तर नॉर्विचच्या पूर्वेस २८ किमी. अंतरावर ब्रेडन वॉटर या विस्तीर्ण जलाशयाच्या मुखापाशी वाळूतटावर वसले आहे. हा जलाशय येर, ब्युर व वेव्हनी या नद्यांच्या संयुक्त प्रवाहाने बनला असून, या नद्यांचे प्रवाह पुढे उत्तर समुद्राला जाऊन मिळतात.

सांप्रत वाळूचा दांडा असलेल्या ठिकाणी पूर्वी समुद्र होता आणि केस्टर-ऑन-सी (यार्मथच्या उत्तरेकडील ४·८ किमी.वरील गाव) व बर्ग कॅसल (यार्मथच्या नैर्ऋत्येकडील ४·८ किमी.वरील गाव) या गावांमधील किल्ले वाळूच्या दांड्याच्या किनारी भागात होते. सॅक्सनांच्या काळात (चौथ्या-पाचव्या शतकांदरम्यान) यार्मथ वाळूतट अस्तित्वात होता व त्या ठिकाणी वस्तीही होती. १२०८ मध्ये जॉन राजाने यार्मथला सनद दिली तेराव्या शतकांती शहराभोवती भिंत उभारण्यात आली. जुने शहर लहान व अरुंद रस्त्यांच्या सभोवतालच्या प्रदेशात वाढत गेले. वाळूचा तट दक्षिणेच्या बाजूस वाढत केला व १५६७ मध्ये एका डच अभियंत्याने सांप्रतच्या बंदराचे प्रवेशद्वार तयार केले.

यार्मथ हे उत्तर समुद्रातील वायू व खनिज तेल अन्वेषणकार्यामधील एक अत्यंत महत्त्वाचे तळकेंद्र समजले जाते. हेरिंग मासेमारीचे ते जगातील सर्वांत मोठे बंदर मानण्यात येत असून ‘यार्मथ ब्लोटर’ या खारवलेल्या हेरिंग माशांसाठी त्याची जगभर ख्याती आहे. यार्मथ हे संरक्षित बंदर असून, समुद्रात खोलवर नांगर टाकून जहाजे थांबविण्याची सुविधा आहे. यार्मथमध्ये जहाजबांधणी, बॉयलर निर्मिती यांचे कारखाने, रेशीम कापडाच्या, विणमालाच्या व पिठाच्या गिरण्या आहेत. कापड व वस्त्रे, प्रक्रियित अन्नपदार्थ, इलेक्ट्रॉनीय वस्तू व उपकरणे ही येथील प्रमुख उत्पादने होत.

शहरातील सेंट निकोलस चर्च हे ग्रेट ब्रिटनच्या सर्व परगण्यांमधील सर्वांत मोठे चर्च समजण्यात येत असून त्याची स्थापना बाराव्या शतकारंभी लोझिंगा बिशपने केली असल्याचे मानतात. ‘प्रायरी हॉल’ हा अकराव्या शतकातील मठाचा भोजनकक्ष, चौदाव्या शतकातील ग्रे फ्रायर मठाचे अवशिष्ट भाग, सांप्रत संग्रहालय व ग्रंथालय यांसाठी वापरात असलेले आणि ग्रेट ब्रिटनमधील सर्वांत जुन्या नगरपालिकीय वास्तूंपैकी एक असे जकातघर, दुसऱ्या महायुद्धात शहराच्या जुन्या भागावर प्रचंड बाँबवृष्टी होऊनही त्या भागातील अवशिष्ट अशा सु. ७३·७ सेंमी. ते १·८ मी. रुंदीच्या सु. १४५ गल्ल्या इ. प्रेक्षणीय गोष्टी आहेत. सुटीचे विश्रामस्थान म्हणून यार्मथ हे अत्यंत लोकप्रिय ठरले असून येथील पुळणींकडे तसेच ब्रॉड्स या सरोवरे व खारकच्छ-प्रदेशाकडे (यार्मथ व लोबेस्टॉक्ट यांमधील प्रदेश) नौकाविहारार्थ अनेक पर्यटक आकृष्ट होतात.

गद्रे, वि. रा.