पारादीप : पाराद्वीप. ओरिसा राज्यात बंगालच्या उपसागर किनार्याीवर वसलेले एक मोठे खाजण बंदर. लोकसंख्या ६,७०५ (१९७१). हे कटक जिल्ह्यात कटकच्या पूर्वेस सु. ९६ किमी. व कलकत्त्याच्या नैऋत्येस सु. ३९० किमी. वर आहे. कोळसा, लोहधातुक, क्रोम, मँगॅनीज, ग्रॅफाइट इ. खनिजे, तसेच वन व कृषी उत्पादने यांनी समृद्ध परंतु औद्योगिक दृष्ट्या अविकसित असा त्याचा पृष्ठप्रदेश असून, त्यात द. बिहार, मध्य पू. प्रदेश व ओरिसा यांचा समावेश होतो. या प्रदेशाचा विकास घडवून आणण्याच्या, विशेषतः ओरिसा राज्याचे औद्योगिक मागासलेपण मोठ्या प्रमाणात दूर करण्याच्या उद्देशाने, प्रथम १९५८ मध्ये पारादीप हे कनिष्ठ बंदर म्हणून जाहीर करण्यात आले व १९६६ मध्ये त्याला बृहत् बंदराचा दर्जा मिळाला.

पारादीप बंदराचे दृश्य

भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील इतर बंदरांच्या तुलनेने येथील डुबाव सर्वात खोल (१२.७५ मी. ) आहे. येथील खाडीची लांबी २.२ किमी. असून तीत साचलेला गाळ गाळबोटींच्या साहाय्याने वारंवार काढला जातो. बंदरात तीन मोठे धक्के, याऱ्या(, यांत्रिक फावडी, पे-लोडर, डंपर, निरनिराळे उत्थापक इ. अद्ययावत यांत्रिक सुविधा आहेत. त्याशिवाय दोन ओढबोटी, दोन नौबंध नौका (मूरिंग लाँच), मार्गदर्शी नौका, सर्वेक्षण नौका, चोषक गाळबोट, नांगर वर ओढणारे तराफे इ. साधनसामग्रीही आहे. येथे तीन पारवहन छपऱ्या, दोन वखारी व खनिजादी माल ठेवण्यासाठी पुरेशी मोकळी जागा आहे. बंदरात एक यांत्रिक लोहधातुक धक्का, एक नौबंध बोया धक्का, तीन लहान धक्के व एक सर्वसाधारण मालवाहू धक्का असून त्यांत वाढ केली जाणार आहे. लोहधातुक व नौबंध बोया धक्का यांवरून अनुक्रमे ६०,००० व १४,००० भारवस्तू टनभार क्षमतेपर्यंतच्या जहाजांत माल चढविता येतो.

येथे रासायनिक खत प्रकल्प उभारण्याची योजना असून त्यासाठी दोन स्वतंत्र धक्के व एक तेल गोदी बांधली जाणार आहे. मच्छीमार बंदर म्हणून याचा विकास करण्याची व ४०० किमी. पर्यंतच्या क्षेत्रातील हवामान व चक्रवातांच्या पूर्वानुमानासाठी येथे रडार बसविण्याची योजना आहे. महानदीपासून काढलेल्या तलदंडा कालव्याचे गोडे पाणी शहराला व बंदरातील जहाजांना पुरविले जाते. येथून लोहधातुक, कोळसा, क्रोम, कच्चे लोखंड, पोलाद, साखर, मासे यांची निर्यात केली जाते. १९७७ मध्ये येथे ९,९५,८४० टन मालाची चढउतार झाली. पारादीप कटकशी लोहमार्गाने व इतर भागांशी सडकांनी जोडले आहे. पारादीप बंदर वाहतुकीसाठी वर्षभर खुले असून ते विकास पावत आहे. रूमानियाच्या सहकार्याने पारादीप येथे एक नवीन पोलाद कारखाना उभारण्याची केंद्र सरकारची योजना आहे.                   

चौधरी, वसंत