खंडगिरी : एक दृश्य.

खंडगिरी : ओरिसा राज्यातील पुरातात्त्विक महत्त्व असलेली टेकडी. ही पुरी जिल्ह्यात कटकपासून २४ किमी. दक्षिण- नैर्ऋत्येस आणि भुवनेश्वरपासून ८ किमी. वायव्येस आहे. खंडगिरीला लागूनच उत्तरेस उदयगिरी आहे. या दोन्ही टेकड्यांवर इ. स. पू. दुसऱ्या शतकातील कलिंगराज खारवेलकालीन सुविख्यात व महत्त्वपूर्ण जैन गुंफासमूह आहे. समोरासमोरच्या या दोन टेकड्यांच्या नावांवरूनच हे गुंफासमूह ‘उदयगिरी- खंडगिरी’ या संयुक्त नावाने ओळखले जातात. वर्धमान महावीराच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या दोन्ही टेकड्या जैनांचे ‘अतिशयक्षेत्र’ म्हणून विख्यात आहेत. प्राचीन साहित्यातही याचा अनेकदा उल्लेख आढळतो. येथील प्रमुख गुंफा: (१) तात्वा गुंफा १ आणि २ (२) अनंतगर्भ (३) खंडगिरी (४) त्रिशूळ (५) ललाटकेंद्र (६) तेंतुली (७) धानगर (८) नवमुनी (९) बारभुजी (१०) इंद्रकेसरी या होत. यांशिवाय येथे आकाशगंगा, गुप्तगंगा, शाम आणि राधा आदी पाच जलकुंडे, तसेच टेकडीच्या शिखरावर एक जैनमंदिर व भग्नावस्थेतील काही जैन स्तूप आणि गुंफा आहेत. उदयगिरी ३४ मी. व खंडगिरी ४० मी. उंच असून टेकड्यावरून अलौकिक सृष्टिशोभा दिसते.

शाह, र. रू.