जौनपूर : उत्तर प्रदेश राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या

४,६९,९२२ (१९७१). हे वाराणसीच्या वायव्येस लोहमार्गाने सु. ५५ किमी., गोमतीच्या तीरावर वसले असून लोहमार्गाचे आणि सडकांचे प्रस्थानक आहे. प्राचीन शहर गोमतीच्या पुराने समूळ नष्ट झाले होते. फिरोजशाह तुघलकाने १३५९ मध्ये ते पुन्हा वसविले. शर्की अमदानीत ही त्यांची राजधानी होती. १५५९ मध्ये हे अकबराने व १७७५ मध्ये इंग्रजांनी घेतले.

येथे ऐतिहासिक वास्तूंपैकी किल्ला, मशिदी, तुर्की पद्धतीची स्‍नानगृहे व अकबरकालीन गोमतीवरील फूल इ. प्रेक्षणीय आहेत. सध्या हे सुगंधी मालासाठी, विशेषतः गुलाबी अत्तरासाठी आणि कागदलगदा कलाकामासाठी प्रसिद्ध आहे. ते फळफळावळ व भाजीपाला यांचेही प्रमुख विक्री केंद्र आहे.       

कापडी, सुलभा