कुक, कॅप्टन जेम्स : (२७ ऑक्टोबर १७२८–१४ फेब्रुवारी १७७९). इंग्लिश समन्वेषक. यॉर्क परगण्यातील मार्टन गावी याचा जन्म झाला. वडील गरीब शेतमजूर असल्याने तेराव्या वर्षीच याला आपल्या गावाशेजारील बंदरामधील एका दुकानदाराकडे नोकरी पतकारावी लागली. अनेक खलाशांच्या सहवासात असल्यामुळे यालाही खलाशी व्हावेसे वाटले व तो कोळसा वाहतूक करणाऱ्या एका बोटकंपनीत कामाला लागला. कामानिमित्त इंग्लंडचा बहुतेक किनारा व बाल्टिक समुद्रावरील बऱ्याच भागात याने प्रवास केला. हिवाळ्यातील सुट्टीत घरी गणित, ज्योतिर्विद्या व नौकानयन यांचा अभ्यास करून त्याने थोड्याच दिवसांत

कॅप्टन कुक

नौअधिकाऱ्याची परीक्षा दिली. अमेरिकेतील वसाहतींच्या सरहद्दीवरून १७५५ साली इंग्लंड व फ्रान्समध्ये सप्तवार्षिक युद्ध सुरू झाले. इंग्लिश आरमार खात्याने खलाशांची भरती सुरू केली, तेव्हा कुक आरमारात भरती झाला. ईगल नावाच्या गलबताबरोबर तो अमेरिकेकडे गेला. लुइसबर्गच्या वेढ्यात कुकने चांगली कामगिरी बजावली. कॅनडातील सेंट लॉरेन्स नदीच्या उत्तरेस फ्रेंचांच्या वसाहती होत्या, तर दक्षिणेस इंग्रजांच्या होत्या. युद्धामध्ये या नदीला महत्त्व असल्याने तिचे सर्वेक्षण होणे जरूर होते. कुकने अमेरिकेत आल्यावर गणित, ज्योतिर्विद्या व सर्वेक्षण यांचा खूप अभ्यास केला होता. त्यामुळे त्याने हे जबाबदारीचे काम स्वीकारले. त्याच्या कामगिरीमुळे त्याला लॅब्रॅडॉर व न्यू फाउंडलंडच्या किनाऱ्याचे सर्वेक्षण करण्याची आज्ञा मिळाली. १७६७ पर्यंत हा या कामगिरीवर होता. १७६६ मधील सूर्यग्रहणाबाबतचा त्याचा अंदाजही बरोबर ठरला. त्यामुळे इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने त्याचा गौरव केला.

जून १७६९ मध्ये शुक्र अधिक्रमणाचा योग होता व त्याचे निरीक्षण पॅसिफिकमधील ताहिती बेटांवरून उत्तम रीत्या करता येण्यासारखे होते. तेव्हा शुक्र अधिक्रमणाचे निरीक्षण व पॅसिफिक महासागराचे समन्वेषण, अशा दोन्ही कामांकरिता लंडनच्या रॉयल सोसायटीला मनुष्य हवा होता. कुकच्या अमेरिकेतील कर्तृत्वामुळे सोसायटीने वरील कामाकरिता कुकचीच निवड केली. एन्डेव्हर नावाच्या गलबतावर सर्व सामग्री व निवडक लोक घेऊन कुकने १६ ऑगस्ट १७६८ रोजी इंग्लंड सोडले. दक्षिण अमेरिकेला वळसा घालून त्याने एप्रिल १७६९ मध्ये ताहिती बेट गाठले. ताहितीमधील शुक्रअधिक्रमणाचे व पॅसिफिक समन्वेषणाचे काम व्यवस्थित पार पाडून तो न्यूझीलंडकडे वळला. न्यूझीलंड म्हणजे त्या काळापर्यंत एका खंडप्राय प्रदेशाचा भाग असावा अशी समजूत होती. कुकने न्यूझीलंडला वळसा घातला व पूर्वीची समजूत चूक असून न्यूझीलंड बेट असल्याचे त्याने सिद्ध केले. तेथून तो ऑस्ट्रेलियाला आला. त्या काळापर्यंत अज्ञात असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्याचा त्याने शोध लावला व तो  भाग इंग्लंडच्या आधिपत्याखाली आणला. वाटेत न्यू गिनी बेटाचे थोडे सर्वेक्षण करून १७७१ मध्ये तो इंग्लंडला आला.

१७७२ मध्ये दक्षिण ध्रुवप्रदेशाच्या भागाची माहिती गोळा करण्यास सोसायटीने कुकला विनंती केली. त्यानुसार रेझोल्युशन व ॲडव्हेंचर या दोन गलबतांवर निवडक माणसे व साधनसामग्री घेऊन कुकने तिकडे प्रयाण केले. दक्षिण अमेरिकेच्या केप हॉर्न टोकापासून ते न्यूझीलंडपर्यंत त्याने दोन प्रदक्षिणा मारल्या. ध्रुवप्रदेशात शिरकाव करण्याचा त्याने खूप वेळा प्रयत्न केला परंतु तो ७१ १०′ इतक्या अक्षांशावरच पोहोचू शकला. तेथून पुढे बर्फाच्या रांगा, खराब वादळी हवा यांमुळे त्याला परत न्यूझीलंडला यावे लागले. तेथून इंग्लंडला परतताना त्याने ताहिती व न्यू हेब्रिडीझ बेटांना भेट दिली व नंतर वाटेतील न्यू जॉर्जिया, न्यू कॅलेडोनिआ, सॉलोमन व लोयल या बेटांचा शोध लावला. १७७५ मध्ये तो इंग्लंडला परतला. खलाशांमध्ये  ‘स्कर्वी’ रोगाने येणाऱ्या तापाचे कारण व त्यावर प्रतिबंधक असे एक औषध त्याने शोधून काढले. याबद्दल कुकला रॉयल सोसायटीने खास सुवर्णपदक बहाल केले. त्याच्या या तीन वर्षांच्या समन्वेषणात फक्त एक मनुष्य दगावला.

अटलांटिक व पॅसिफिक यांना उत्तरेकडून जोडणारा मार्ग शोधण्यासाठी प्रयत्न करण्याचे कुकने ठरविले. १७७६ साली रेझोल्यूशन व डिस्कव्हरी या दोन गलबतांवर काही निवडक लोक घेऊन कुकने इंग्लंड सोडले. आतापर्यंत अशा प्रवासावर गेलेल्या लोकांनी अटलांटिकमधून उत्तरेकडे जाण्याचा प्रयत्न केला होता. कुकने तसे न जाता थेट दक्षिण अमेरिकेचे टोक गाठले. तेथून त्याने न्यूझीलंड, पॅसिफिकमधील बेटे व हवाई बेटसमूहांपैकी सँडविच या ठिकाणी भेटी दिल्या. ४५ उ. अक्षांशापासून उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वेक्षण करीत तो थेट ७०४४′ उ. अक्षांशापर्यंत गेला. अत्यंत वाईट हवामानामुळे व बर्फामुळे त्याला पुढे जाणे अशक्य झाले,  म्हणून तेथून तो परत फिरला. जानेवारी १७७९ मध्ये तो सँडविच बेटावर आला. तेथे त्याला पूर्वी फारच चांगली वागणूक मिळाली होती. परंतु यावेळेस तेथील लोकांनी अगदी विरुद्ध वागणूक दाखविण्यास सुरुवात केली. आपली चोरलेली बोट परत मिळविण्याकरिता कुक प्रयत्न करीत असता, १४ फेब्रुवारी रोजी स्थानिक लोकांपैकी एकाने त्याचा खून केला. त्याने केलेल्या पॅसिफिक व अटलांटिकमधील समन्वेषणामुळे तो एक फार महत्त्वाचा समन्वेषक गणला जातोच, परंतु केवळ शास्त्रीय ज्ञानासाठी सफरी  करणारा म्हणून त्याला आगळे श्रेष्ठत्व प्राप्त झाले आहे.

संदर्भ: Warner, Oliver, Captain Cook and The South Pacific, London, 1963.

शाह, र. रू.