महाडजवळची शिवथर घळ, कुलाबा जिल्हा.घळ : पावसाच्या पाण्याच्या क्षरणकार्यामुळे जमिनीवर, विशेषतः डोंगरउतारावर, तयार झालेला खोल, अरुंद, लांब व बहुधा वाकडातिकडा भूभाग. पाण्याबरोबर आलेल्या दगडगोट्यांच्या घर्षणामुळे घळ अधिकच खोल व रुंद होत जाते. पावसाळ्यानंतर घळ कोरडी पडते. ती शेवटी नदीनाल्यास मिळते किंवा सपाटीवर संपते. घळीच्या बाजूंवर कधीकधी गवत किंवा झुडुपे उगवलेली दिसतात. वेड्यावाकड्या, कोरड्या घळीत आणि तिच्या कपारीत वन्य श्वापदांना किंवा एकांतप्रिय माणसांना आसरा मिळतो. गाळजमिनीत प्रवाहांमुळे खोल घळी तयार होऊन शेवटी उत्खातभूमी बनते. सपाट जमिनीवरही वनस्पतीचे आच्छादन नसेल, तर पावसाच्या पाण्याने मातीचे कण वाहून जाऊन तिच्यावर लहानलहान नाळी पडतात. शेजारशेजारच्या नाळी एकत्र होऊन घळ बनते. तिच्याकडे दुर्लक्ष झाले तर ती खोल व रुंद होत जाऊन शेतजमिनीची नासाडी होते. घळी बुजवून, त्यांच्या तोंडाशी भक्कम ताली घालून किंवा माती धरून ठेवणारी झुडुपे लावून ही नासाडी थांबविता येते. मरुप्रदेशात एकाएकी येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळे मोठमोठ्या घळी झालेल्या दिसून येतात. मृदेचा प्रकार, तिचे थर, जमिनीचा उतार, पर्जन्यमान व त्याचे स्वरूप आणि जलविभाजकाचा आकार व आकृती यांवर घळीचा आकार व आकृती अवलंबून असतात.

कुमठेकर, ज. ब.

Close Menu
Skip to content