वॉटरफर्ड : आयर्लंड प्रजासत्ताकातील वॉटरफर्ड परगण्याचे मुख्य ठिकाण व प्रसिद्ध सागरी बंदर. लोकसंख्या ३८,४७३ (१९८१). डेब्लिनच्या नैर्ऋत्येस सु. १३६ किमी.वर शुर नदीमुखाजवळ हे ऐतिहासिक व औद्योगिक शहर वसले आहे. प्रारंभी हे शहर ‘कुआन-ना-ग्रॉइथ’-सूर्याचे आश्रयस्थान -या नावाने ओळखले जात होते.

मेनापिल याने हे शहर इ. स. १५५ मध्ये स्थापन केले व त्यास त्यावेळी ‘मेनापिआ’ असे संबोधण्यात येत होते अशी आख्यायिका आहे. या शहरावर हद्दपारीत असलेल्या मॅग्नी डेसेडा याने २७० मध्ये ताबा मिळविला. ८५३ मध्ये डॅनिशांनी शहरावर स्वारी करून ते हस्तगत केले व त्याचे ‘ वादर फ्योर्ड ’ &gt वॉटरफर्ड असे नाव बदलले. ११७० मध्ये पेंब्रोकचा दुसरा अर्ल रिचर्ड स्ट्राँगबो ह्याने वॉटरफर्ड ताब्यात घेतले आणि पुढच्याच वर्षी दुसरा हेन्री तेथे आला. १२०५ मध्ये वॉटरफर्ड शहराला जॉन राजाकडून सनद मिळाली, तथापि इंग्लंडच्या राजाचे धार्मिक वर्चस्व मानण्यास वॉटरफर्डवासियांनी नकार दिल्याने १६१८ मध्ये ही सनद काढून घेण्यात आली. वॉटरफर्ड हे अनेक शतके आयर्लंडमधील इंग्रजांच्या प्रभावाखालील एक प्रमुख केंद्र म्हणून राहिल्याचे आढळते. पहिला जेम्स गादीवर आल्यानंतर वॉटरफर्डने शासनाच्या आणि रोमन कॅथलिक धर्मपंथाचा निषेध करणाऱ्या धर्मसुधारणावादी पंथाच्या विरोधात पुढाकार घेतला. १६०३ मध्ये वॉटरफर्ड शहराने सरकार व अँग्लिकन चर्च यांना विरोध केला, तथापि आयर्लंडच्या लॉर्ड डेप्युटी बॅरन माउंटजॉय याच्या सैन्यापुढे शहरवासियांना शरणागती पतकरावी लागली. १६४९ मध्ये ऑलिव्हर क्रॉमवेलला व त्याच्या लष्कराला शहरवासियांनी यशस्वीपणे प्रखर विरोध केला, तथापि क्रॉमवेलचा जावई हेन्री आयर्टन याच्या सैन्यापुढे शहरवासियांनी शरणागती स्वीकारली (१६५०). जुलै १६९० मध्ये झालेल्या वॉइनच्या लढाईत तिसऱ्या विल्यम राजाच्या सैन्याने कॅथलिक दुसऱ्या जेम्सचा पराभव करून त्याला फ्रान्सला पळवून लावले व वॉटरफर्डवर आपला अंमल बसविला. १८०१ मध्ये वॉटरफर्ड हे स्वतंत्र शहर म्हणून नावारूपाला आले.

वॉटरफर्ड हे काचेच्या विविध कलाकृती, वस्तू यांसाठी अठराव्या शतकापासून प्रसिद्ध आहे. १७२९ पासून शहरात विविध प्रकारचे नक्षीकाम असलेल्या झिलईदार काचवस्तू तयार होऊ लागल्या. येथील प्रारंभीच्या काचकृती जाड काचेच्या, खोलवर कोरीव काम केलेल्या व भूमितीय आकृत्यांनी रेखलेल्या व अप्रतिम झिलई असलेल्या अशा बनवल्या जात. या काचवस्तूंमधील काचेचा धुरकट निळसर-करडा रंग हा एक त्रुटीचा वा वैगुण्याचा भाग समजला जाई १८३० नंतर स्वच्छ (शुभ्र) स्फटिक रंगाच्या काचवस्तू बनविण्यात येऊ लागल्या, अर्थातच धुरकट-करड्या रंगाच्या काचकृती ह्या आधुनिक संग्राहकाच्या दृष्टीने अतिमौल्यवान समजल्या जातात. वैशिष्ट्यपूर्ण अशा वॉटरफर्ड काचेपासून बनविण्यात आलेल्या वस्तूंमध्ये रोकोको झुंबर, भित्तिदीप, मेणबत्त्या ठेवण्याच्या वर्तुळाकार नळ्या, पेले, पुष्पपात्रे इत्यादींचा समावेश होतो.

वॉटरफर्ड काचनिर्मितीच्या दोन शैली आहेत. वॉटरफर्ड काचवस्तूंचे कारखानदार १७७० पासून रोकोको शैलीत विविध काचवस्तू तयार करीत होते. इंग्लंडमध्ये याच सुमारास पातळ थर असलेल्या ॲडम शैलीच्या काचवस्तू बनविल्या जात होत्या. ॲडम शैलीचा हळूहळू स्वीकार करण्यात आला. १८५१ पासून वॉटरफर्ड काचकारखानदारांनी, काचेवर आकारण्यात येणाऱ्या भारी ब्रिटिश अबकारी करांमुळे, काचवस्तुनिर्मिती बव्हंशी बंद केली. वॉटरफर्डमध्ये १९५१ पासून ‘आयरिश ग्लास बॉटल कंपनी’ ने अभिजात नमुने व पारंपरिक नक्षीदार छटा यांचे पुनरुज्जीवन करण्याच्या उद्देशाने, काचवस्तूंच्या निर्मितीस पुन्हा सुरुवात केली.

शहरात व असमंतात अन्नधान्य प्रक्रिया, दारू गाळणे, कागद, काचवस्तू तयार करणे, धातू ओतकाम इत्यादींचे कारखाने असून कापड, इलेक्ट्रॉनिकीय उपकरणे यांचेही येथे उत्पादन होते. मीठागरे, पीठ गिरण्या, ताग गिरण्या, मासेमारी, अन्न डबाबंदीकरण, दुग्धपदार्थ प्रक्रिया हेही उद्योग येथे चालतात. गुरांचे व डुकरांचे मांस, दुग्धपदार्थ, फळे वगैरेंची येथून मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. तंबाखू, शेतीउत्पादने, खते, पादत्राणे, पशुआहार इत्यादींचीही येथे निर्मिती होते.

रिचर्ड स्ट्राँगबो व लीन्स्टर राजाची मुलगी ईव्हा यांच्या विवाहप्रसंगाची साक्ष असलेला रेजनल्ड मनोरा (१००३) प्रॉटेस्टंट कॅथीड्रल (१७७३ मध्ये बांधकामास प्रारंभ) शहरात असून प्राची शहराच्या तटबंदीचे अवशिष्ट भाग, ब्लॅक फायर मठ (१२२६) व फ्रॅन्सिस्कन मठ (१२४०) यांचे अवशेष आढळतात.

हे शहर १३७४ ते १८८५ पर्यंत दोन सभासदांना संसदेत पाठवीत होते. त्यानंतर ते एका सभासदालाच पाठवू लागले. १८९८ मध्ये या शहराला नगरपालिकीय शहराचा दर्जा मिळाला.

देशपांडे, सु. चिं.