शहादा : महाराष्ट्र राज्याच्या नंदुरबार जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्यालय. लोकसंख्या ३१,८८६ (१९९१). ते धुळ्याच्या वायव्येला ८५ कि.मी. वर दोंडाईचा – खेतिया राज्यमार्गावर गोमाई नदीकाठी वसले आहे. बऱ्हाणपूर – अंकलेश्वर हा महामार्ग येथून जातो. शहादाचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि यादवकाळात (९७५–१३१८) याच्या परिसरात अनेक मंदिरे बांधण्यात आली. त्यानंतर फारुकी सुलतानाच्या अमलाखाली हा प्रदेश आला आणि पुढे मोगल-मराठ्यांनी त्यावर वर्चस्व मिळविले. पेशवाईच्या अस्तानंतर तो १८१८ मध्ये ब्रिटिशांच्या अखत्यारीत आला. स्वातंत्र्योत्तर काळात १९६० मध्ये तो महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला. तालुक्यता आदिवासींची, विशेषतः पावरा, भिल्ल जमातींची वस्ती विखुरलेली आहे. शहरात गुजर-पाटील समाज मोठ्या प्रमाणात आहे. येथे अहिराणी, भिलोरी, पावरी व गुजरी बोलीभाषा प्रचारात आहेत. तापीच्या सुपीक खोऱ्यात शहादा वसले असल्याने येथे ऊस, कापूस, गहू ही प्रमुख पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. ज्वारी, तूर, मिरची, हरभरा, ही त्या परिसरातील अन्य पिके. ‘गव्हाचे कोठार’ म्हणून शहादा तालुका प्रसिद्ध आहे. अन्नधान्याची घाऊक बाजारपेठ येथे आहे. ऊसाच्या उत्पादनामुळे या भागात एक साखर कारखाना (पुरुषोत्तमनगर) असून दुसऱ्या. कारखान्याचीही योजना केलेली आहे. डाळीच्या गिरण्या तसेच गोड्या तेलाचे घाणेही येथे आहेत. परिसरातील शेतकऱ्यांच्या दुग्धव्यवसाय हा जोडधंदा किफायतशीर ठरला आहे. शहाद्याच्या परिसरात मद्यनिर्मिती (पुरुषोत्तमनगर), सूतगिरणी (लोणखेडा), सल्फा प्लॅंट केमीनोव्ह केमिकल कारखाना, शक्ती स्टील फॅक्टरी इ. असून कागदनिर्मितीचे कारखानेही सुरू होत आहेत.

शहादा – कुकडेल नगरपालिकेची स्थापना २८ जानेवारी १८६९ रोजी झाली. शैक्षणिक सुविधांच्या बाबतीत शहादा हे जिल्ह्यातील एक प्रगत शहर आहे. अनेक शासकीय कार्यालये येथे आहेत. गोमाई नदीच्या काठावर नगरपालिकेमार्फत घाट बांधलेला असून, त्याजवळच पंचमुखी महादेव, रामेश्वर आणि दत्त यांची मंदिरे आहेत.

शहराच्या ईशान्येस १६ किमी. अंतरावर बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर ‘प्रकाशे’ हे इतिहासप्रसिद्ध प्राचीन धर्मस्थळ गोमाई व तापी नद्यांच्या संगमावर वसले आहे. या ठिकाणी १९५० नंतर उत्खनने करण्यात आली. त्यांत ताम्रपाषाणयुगापासून मौर्य काळापर्यंतचे अवशेष (विशेषतः मृत्पात्रे) उपलब्ध झाले आहेत. त्यावरून प्रकाशेच्या प्राचीनत्वाची कल्पना येते. येथील केदारेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर, पुष्पदंतेश्वर आणि मनसापुरी देवी ही मराठा वास्तुशैलीतील मंदिरे प्रसिद्ध असून केदारेश्वर मंदिरानजिकचे पाषाणघाट (४७ x १७ मी.) प्रशस्त आहेत. विशेषतः संगमेश्वर व पुष्पदंतेश्वर मंदिरांतून अस्पष्ट शिलालेख आढळतात. या मंदिराचे बांधकाम बहुधा अहिल्यादेवी होळकर यांनी करून घेतले असावे. सिंहस्थात येथे फार मोठी यात्रा भरते. धुळे जिल्ह्यातील हे एक पवित्र तीर्थक्षेत्र असून यास ‘खानदेशची काशी’ म्हणतात.

देशपांडे, सु. र.