ब्रेनर खिंड : आल्प्स पर्वतश्रेणीतील ऑस्ट्रिया व इटली या देशांच्या सरहद्दीवरील इतिहासप्रसिद्ध खिंड. आल्प्समधील इतर खिंडींपेक्षा ही सर्वांत कमी उंचीची असून सस. पासून १,३७१ मी. उंच व सु. ९५ किमी. लांब आहे. या खिंडीमुळे इन्सब्रुक (ऑस्ट्रिया) व बॉल्‌त्सानॉ (इटली) ही दोन गावे जोडलेली असून मध्य आल्प्सच्या अट्स्टाल व पूर्व आल्प्सच्या त्सिलरटाल या रांगांचे विभाजन झाले आहे.

उत्तरेकडून इटलीमध्ये प्रवेश करण्याचा प्रमुख मार्ग म्हणजे ब्रेनर खिंड होय. रोमन काळापासून या खिंडीचा उपयोग होत आलेला आहे. इ. स. पाचव्या शतकात ट्यूटॉनिक स्वारांनी या खिंडींचा उपयोग केल्याचा उल्लेख आहे. मध्ययुगीन काळात या खिंडीमधून पूर्वकडील व भारतातील मालाची वाहतूक केल्याचे आढळते. चौदाव्या शतकापासून यूरोपातील व्यापारासाठी या खिंडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेला. ऑस्ट्रिया – इटली यांना जोडणारा रस्ता या खिंडीतून गेलेला असून त्याचे बांधकाम १७७२ मध्ये करण्यात आले. पुढे इन्सब्रुक ते व्हेरोना यांना जोडणाऱ्या लोहमार्गाचे काम १८६७ मध्ये पूर्ण करण्यात आले. या लोहमार्गामुळे ऑस्ट्रिया व इटली या दोन्ही देशांतील प्रमुख शहरांशी व बंदरांशी दळणवळण सुलभ झाले. पहिल्या महायुद्धानंतर ही खिंड इटली आणि ऑस्ट्रिया यांची सरहद्द बनली. १९४५ मध्ये अमेरिकन सैन्याने ही खिंड पार केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या प्रारंभकाळात हिटलर आणि मुसोलिनी यांच्या अनेक भेटी या खिंडीच्या परिसरात झाल्या.

ओक, द. ह. गाडे, ना. स.