न्यूरेंबर्ग : पश्चिम जर्मनीच्या बव्हेरिया राज्यातील एक इतिहासप्रसिद्ध, तसेच आधुनिक काळातील म्यूनिकखालोखालचे औद्योगिक व व्यापारी शहर. लोकसंख्या ४,९९,०६० (१९७५). हे म्यूनिकच्या उत्तर-वायव्येस १४७ किमी. पेग्‍नित्स नदीच्या दोन्ही तीरांवर सस.पासून २८९–३७५ मी. उंचीच्या दरम्यान वसले आहे. इटली–उत्तर यूरोपच्या मार्गावरील मोक्याचे ठिकाण असल्याने, बव्हेरियाचा ड्यूक तिसरा हेन्‍री याने सु. १०४० मध्ये येथे किल्ला बांधल्याचा उल्लेख १०५० च्या कागदपत्रांत आढळतो. येथे बाराव्या शतकात वसाहती झाल्या. १२१९ मध्ये न्यूरेंबर्गला स्वतंत्र शहराची पहिली सनद मिळाली आणि १२६० च्या सुमारास ते ‘ऱ्हाईनलँड शहर संघा’चे सदस्य बनले. १२२५ मध्ये सेंट झेबाल्ट ह्या सुविख्यात चर्चच्या बांधकामास प्रारंभ झाला. सेंट लोरेन्ट्स हे दुसरे चर्च १२६० मध्ये बांधण्यात आले. हळूहळू न्यूरेंबर्गचे ‘वसाहती’चे स्वरूप बदलू लागून कारागीर, सरदार-दरकदार आणि निर्मितिउद्योग व व्यापार यांचे ते केंद्र बनू लागले. १३५६ पासून पवित्र रोमन साम्राज्याधिपती आपल्या मंत्रिमंडळाची पहिली सभा येथेच घेऊ लागला. प्रसिद्ध जर्मन चित्रकार आल्ब्रेक्त ड्यूरर येथेच जन्मला (१४७१). ड्यूरर व त्याचे समकालीन–ड्यूररचा गुरू चित्रकार मिखाएला व्होल्गेमूट, काष्ठशिल्पज्ञ फाइट श्टोस, पितळधातूवर ओतकाम करणारा कलावंत पेटर फिशर (१४६०–१५२९), शिल्पकार आडाम क्राफ्ट तसेच कवी हान्स झाक्स (१४९४–१५२७) – यांच्यायोगे न्यूरेंबर्गमध्ये कला अनेक अंगांनी समृद्ध झाल्या आणि म्हणूनच ते जर्मन प्रबोधनाचे केंद्र बनले. येथील शिल्पांत इटालियन प्रबोधनशैली व गॉथिक परंपरा यांचे मनोहारी मीलन झाल्याचे दिसून येते. १५२६ मध्ये शहरात जर्मनीमधील प्रारंभीच्या उच्च माध्यमिक शाळांपैकी (जिम्‍नॅशियम) एक स्थापण्यात आली. पंधराव्या व सोळाव्या शतकांत न्यूरेंबर्ग हे जर्मन संस्कृतीचे केंद्र मानले जात होते. धार्मिक चळवळींतही शहराचा सिंहाचा वाटा होता. १५२५ मध्ये मार्टिन ल्यूथरच्या धर्मसुधारणा चळवळीची तत्त्वे याच शहरात स्वीकारण्यात आली. १६१६ मध्ये याकोप व्होल्फ या वास्तुशास्त्रज्ञाने प्रबोधनकालीन प्रासाद-शैलीनुसार न्यूरेंबर्गमधील नगरभवनाची पुनर्रचना केली. त्या काळी न्यूरेंबर्ग हे आर्थिक-सांस्कृतिक वैभवशिखरावर होते. परंतु दोनशे वर्षांच्या आत (१८०६) त्याचे हे सर्वोच्च स्थान जाऊन त्याला बव्हेरियाच्या राजसत्तेखाली जावे लागले. खुष्कीच्या जागतिक व्यापारमार्गांऐवजी जलमार्गीय व्यापारास प्रारंभ आणि तीस वर्षांच्या युद्धामुळे झालेले जर्मनीचे प्रचंड आर्थिक नुकसान ह्या दोन महत्त्वाच्या कारणांमुळे ७ डिसेंबर १८३५ पर्यंत न्यूरेंबर्गचे आर्थिक पुनरुत्थान होऊ शकले नाही. त्या दिवशी न्यूरेंबर्ग–फ्यूर्ट ही पहिली जर्मन आगगाडी धावू लागली. १९३३ पासून हिटलरच्या नॅशनल सोशॅलिस्ट पार्टीची वार्षिक सभा येथे भरू लागली. दुसऱ्या महायुद्धात न्यूरेंबर्गवर जबर बाँबवर्षाव झाल्याने शहाराची फार हानी झाली.

कित्येक शतकांपासून धातूंवरील कारागिरी हे न्यूरेंबर्गमधील प्रमुख उद्योगधंदे होते. मध्ययुगीन काळापासून येथे तोफा, बंदुका, तलवारी तसेच घड्याळे व होकायंत्रे यांचे उत्पादन होत असे. न्यूरेंबर्गची फार पूर्वीपासून मुद्रण, विज्ञान व यांत्रिक शोध यांचे केंद्र म्हणून ख्याती झाली होती. कोबेर्गरने येथे आपला पहिला छापखाना १४७० मध्ये उभारला होता, तर रेगिओमोनटानुस (योहानस म्यूलर) या जर्मन खगोलशास्त्रज्ञाने आपली पहिली वेधशाळा येथे स्थापिली. १५०० च्या सुमारास ‘न्यूरेंबर्गची अंडी’ या नावाने विशेष प्रसिद्धीस आलेली खिसाघड्याळे येथेच निर्माण केली जात होती. त्यानंतर सोन्याचे तारकाम, जाळी, तारा, सुया, टाचण्या, धातूंची खेळणी वगैरेंचे उत्पादन सुरू झाले. शहरात वीजउपकरणे, सूक्ष्मयंत्रे, कापड, टंकयंत्रे, अवजड यंत्रोद्योग, सायकली, कार्यालयीन यंत्रे, कातडी वस्तू, पेन्सिली तसेच सर्व प्रकारचे ब्रश यांचे उद्योग असून एकूण कामगारांपैकी ८०% धातुउद्योगांत व त्यांपैकी ५०% विद्युत् उद्योगांत गुंतलेले आहेत. जगात प्रसिद्धी पावलेला जिंजरब्रेडही येथलाच. दुसऱ्या महायुद्धानंतर येथे आतंरराष्ट्रीय खेळणी-जत्रा भरविण्यात येऊ लागल्याने न्यरेंबर्ग हे जागतिक खेळण्यांचे मोठे केंद्रच बनले. प्रतिवर्षी येथे आंतरराष्ट्रीय खेळणी-जत्रेबरोबरच तदानुषंगिक प्रदर्शने भरविण्यात येतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जित राष्ट्रांनी १९४५–४६ या काळात नाझी पुढाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय लष्करी न्यायाधिकारणापुढे न्यूरेंबर्ग येथेच खटले भरल्यामुळेही हे शहर अधिक प्रसिद्धी पावले.

न्यूरेंबर्ग हे यूरोपीय व्यापारमार्गांजवळच मोक्याचा ठिकाणी वसलेले असल्याने, त्याचा विकास झपाट्याने होऊ शकला. मध्ययुगात या शहरात बारा राजमार्ग येऊन मिळत असल्याने सबंध यूरोपचे ते व्यापार व वाहतूक-केंद्र म्हणून गणले जाई. जर्मन प्रजासत्ताक संघराज्याचे (प. जर्मनीचे) व यूरोपचे महामार्ग (इटली–स्कँडिनेव्हिया, फ्रान्स–बोहीमिया, स्वित्झर्लंड–पोलंड) यांचे केंद्रस्थान म्हणूनही ते विख्यात आहे. त्याचप्रमाणे न्यूरेंबर्ग हे म्यूनिक–बार्लिन व फ्रँकफुर्ट–कोलोन या द्रुतगती महामार्गांना (ऑटोबान्स) जोडलेले आहे. १९७० मध्ये न्यूरेंबर्ग हे यूरोपा कालव्याने ऱ्हाईन, मेन आणि डॅन्यूब या नद्यांशी जोडण्यात आले. शहराचा विमानतळ फ्रँटफुर्ट–आम–मेन येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडलेला आहे.

न्यूरेंबर्गमध्ये रेल्वे व टपालसेवा यांची विभागीय कार्यालये, नगरपालिकीय न्यायालय तसेच परिक्रम व अपील न्यायालये आहेत. शहरात एर्लांगेन-न्यूरेंबर्ग विद्यापीठाची अर्थशास्त्रीय व सामाजिक विज्ञानविषयक शाखा, ओहम अनुप्रयुक्त तंत्रविद्या निकेतन, कला अकादमी (१६६२) इ. उच्च शिक्षणसंस्था आहेत. कला अकादमी ही जर्मनीमधील सर्वांत जुनी संस्था आहे. इतर अशाच प्रकारच्या जुन्या संस्थांमध्ये एक वाङ्‍मयीन संस्था (१६४४) आणि सार्वजनिक वाचनालय (६०० वर्षांपूर्वीचे) यांचा समावेश होतो. यांशिवाय जर्मानिक नॅशनल म्यूझीयम (१८५२) ह्या राष्ट्रीय संग्रहालयात जर्मन संस्कृतीचा इतिहास प्रारंभापासून आजतागायत प्रदर्शित केलेला असून, ड्यूररच्या कलाकृतींचा संपूर्ण संच जतन केलेला आहे. शहरात एक संगीतिकागृह, दोन नाट्यगृहे, एक संगीतदालन इ. सांस्कृतिक कार्यक्रमकेंद्रे तसेच शनर ब्रुनेन कारंजे, सेंट झेबाल्ट व सेंट लोरेन्ट्स ही चर्च, नगरभवन, ड्यूररचे निवासस्थान इ. प्रेक्षणीय वास्तू आहेत.

डिसूझा, आ. रे. गद्रे, वि. रा.