द्वारकाधीशाचे मंदिर, द्वारका.

द्वारका : गुजरात राज्याच्या जामनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. लोकसंख्या १७,८०१ (१९७१). हे चार धामांपैकी एक असून गोमती नदीकाठी वसले आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ पवित्र ठिकाणांत याची गणना होते. हिंदू लोक यास अत्यंत पवित्र मानतात. हे ओखाच्या दक्षिणेस सु. २५ किमी. आणि जामनगरच्या पश्चिमेस सु. ९६ किमी. आहे. येथे जलमार्गाने व लोहमार्गानेही जाता येते, याचा उल्लेख महाभारत, हरिवंश या ग्रंथात आणि भागवत, वराहस्कंद या पुराणांतही आढळतो. द्वारावतीपुर, द्वारवती, द्वारमती, वनमालिनी इ. नावांनीही हे प्रसिद्ध आहे. नगराभोवती असलेल्या तटाला अनेक द्वारे होती, त्यांवरून यास द्वारका, द्वारावती असे नाव पडले असावे. पूर्वी हे आनर्त देशाच्या राजधानीचे ठिकाण होते. मथुरेत जरासंधापासून यादवांना त्रास होत असे, म्हणून श्रीकृष्णाने या ठिकाणी येऊन विश्वकर्म्याकडून समुद्राकाठी द्वारका नगरी स्थापन केली.

येथे द्वारकाधीशाचे (श्रीकृष्णाचे) सोनेरी कळस असलेले भव्य मंदिर असून त्याचा चार द्वारांचा सभामंडप साठ खांबांवर उभा आहे. मंदिरातील श्यामवर्ण चतुर्भूज उभी कृष्णमूर्ती १·२ मी. उंचीची आहे. तसेच या मंदिराच्या सभोवती अनेक लहान मोठी मंदिरे असून कुंडे व घाट प्रेक्षणीय आहेत. आद्य शंकराचार्यांच्या चार मठांपैकी एक मठ येथे आहे. शहराच्या उत्तरेस १·५ किमी, अंतरावर द्वारका (रूपन) बंदर आहे. येथून पूर्वी मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होत असे, पण ओखा बंदर झाल्यानंतर द्वारकेचे बंदर या दृष्टीने महत्त्व कमी झाले. सध्या येथे एक सिमेंटचा मोठा कारखाना असून त्याची उत्पादनक्षमता दर दिवसाला ३०० टन आहे. येथे यात्रेकरूंसाठी १० धर्मशाळा असून वसंत पंचमी, अक्षय्य तृतीया, गोकुळाष्टमी इ. उत्सवांच्या वेळी मोठी यात्रा भरते. या प्रसिद्ध क्षेत्राच्या ठिकाणी झालेल्या उत्खननात इ. स. पू. दुसऱ्या शतकापासून नंतरचा इतिहास हाती आला. इ. स. पू. दुसऱ्या व पहिल्या शतकांतील लोकवस्तीचा पुरावा रोमन मद्यकुंभ, शंखांच्या बांगड्या व मणी ह्या स्वरूपात मिळाला. इसवी सनाच्या पहिल्या ते चौथ्या शतकांतील थरांत उत्कृष्ट तांबड्या झिलईची मृत्पात्रे सापडली. त्यानंतरच्या सातव्या-आठव्या शतकांतील वास्तू दगडी पायांच्या व कौलारू छपरांच्या होत्या असे दिसते. तेराव्या-चौदाव्या शतकांतील वास्तूंत बहुरंगी काचेच्या बांगड्या, काचेचा मुलामा दिलेली आणि चिनीमातीची मृत्पात्रे आढळली. उत्खननात समुद्राची प्रलयकारी भरती दर्शविणारे वाळूचे प्रचंड थर सापडले. श्रीकृष्णाने स्थापलेली द्वारका हीच असे सागता येण्यासारखा कसलाही निश्चित पुरावा मात्र अद्याप मिळाला नाही.

सावंत, प्र. रा. देव, शां. भा.