गिफू : जपानच्या होन्शू बेटावरील गिफू विभागाचे मुख्य ठाणे. लोकसंख्या ३,८५,७२७ (१९७०). हे किंका पर्वताच्या पायथ्याशी नागारा नदीवर नागोयाच्या वायव्येस ३० किमी. असून लोहमार्ग केंद्र आणि औद्योगिक शहर म्हणून महत्त्वाचे आहे. सुती, रेशमी व गरम कापड, धातुकाम व यंत्रे यांचे उद्योग येथे असून कागदकाम आणि इतर कलाकुसरीच्या वस्तूंसाठी गिफूची ख्याती आहे. नागारा नदीवर मच्छीमारीसाठी खास तयार केलेले करढोक पक्षी वापरण्यात येतात. विद्यापीठ, ग्रंथालये, उद्याने, मंदिरे इत्यांदीमुळे शहर आकर्षक बनले आहे.

ओक, द. ह.