बँकॉक : थायलंडची राजधानी. लोकसंख्या ४८,७०,५०९ (१९७८). हे सयामच्या आखातापासून ४० किमी. चाऊ फ्राया नदीच्या पूर्व काठावर वसलेले आहे. नदीचा त्रिभूज प्रदेश व लगतचे सयामचे आखात. यांमुळे बँकॉक हे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे एक उत्तम बंदर ठरले आहे. शहरातील कालव्यांचे जाळे, त्यांतून होणारी जलवाहतूक, तसेच तरती बाजारपेठ यांमुळे बँकॉकला ‘पूर्वेचे व्हेनिस’ म्हणून गौरविले जाते.

वाट अरूण

थायलंडच्या विद्यमान चक्री राजवंशातील पहिला राम (कार. १७८२-१८०९) याने १७८२ मध्ये हे शहर वसवून तेथे राजधानी केली. शहराची तटबंदी, शाही राजवाडा तसेच वाट पो व वाट फ्राकाएओ ही मंदिरे त्याच्या कारकीर्दीत बांधण्यात आली. वाट फ्राकाएओतील बुद्धाची निळी मूर्ती भारतात बनविली आहे, असे मानतात. या मंदिराच्या भिंतीवर रामायणातील प्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. पुढे १८५१ पर्यंतच्या कालखंडात इतर बुद्धमंदिरांबरोबरच उंच मनोऱ्यानसाठी प्रसिद्ध असलेल्या वाट अरूण या मंदिराची उभारणी करण्यात आली. चौथ्या रामच्या कारकीर्दीत (१८५१-६८) बँकॉक परदेशी व्यापारास खुले करण्यात आले. राजा चुलालंगकर्ण किंवा पाचवा राम (कार. १८६८-१९१०) याच्या कारकीर्दीत शहराच्या सार्वत्रिक विकासासाठी योजना तयार करण्यात येऊन रस्ते, पूल, टपाल-तारायंत्र (१८८५), बँकॉक ते अयोध्या या पहिल्या राज्य लोहमार्गाची सुरूवात (१९००) यांसारख्या दळणवळणविषयक सुधारणा करण्यात आल्या. संगमरवरी बुद्धमंदिर, इटालियन वास्तुशैलीतील दरबार वास्तू इ.भव्य रचना याच्या कारकीर्दीतच झाल्या. दुसऱ्या महायुद्धात बाँबहल्ल्यामुळे शहराचे बरेच नुकसान झाले. काही काळ ते जपानच्या अंमलाखाली होते.

थायलंडचे प्रमुख औद्योगिक व व्यापारी केंद्र म्हणून बँकॉकला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भात सडण्याच्या व लाकूड कापण्याच्या मोठमोठ्या गिरण्या येथे असून त्यांमध्ये हजारो लोक गुंतलेले आहेत. यांशिवाय साखर, कागद, सिमेंट, साबण, सुती कापड, अन्नप्रक्रिया, तेलशुद्धीकरण, विद्युत्‌साहित्य, औषधे इ. उद्योगांचा विकास झालेला आहे. येथील तेलशुद्धीकरण कारखाना मोठा असून त्याची वार्षिक क्षमता १७ लाख मे. टन आहे. येथून तांदूळ, रबर, सोने, चांदी, कातडी, मासे यांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. बँकॉक हे जडजवाहिरांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध असून चांदीचे व ब्राँझचे दागदागिने तसेच रत्नां च्या व्यापारात हे अग्रेसर आहे. देशातील व परदेशांतील अनेक बँकांची कार्यालये येथे असून औद्योगिक वित्त महामंडळाचे प्रधान कार्यालयही येथेच आहे. संयुक्त राष्ट्रांची ‘इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया अँड द पॅसिफिक’ (एस्कॅप) व ‘साउथ ईस्ट एशिया ट्रीटी ऑर्गनायझेन’ (सीटो) या संघटनांची प्रधान कार्यालये, तर ‘युनिसेफ,’ ‘यूनेस्को,’ ‘हू’ (जागतिक आरोग्य संघटना) यांची विभागीय कार्यालये या शहरात आहेत. येथील लोकसंख्येत ९०% थाई, ९% चिनी, ०.०२% भारतीय, ०.०२% अमेरिकन आणि राहिलेले यूरोपीय आहेत. लोकसंख्यावाढीचे प्रमाण जास्त असून लोकसंख्येचे दर चौ. किमी. ला घनता प्रमाणही जास्त आहे. शहराच्या एकूण उद्योगव्यवसायांत चिनी लोकांचे प्रभुत्व आहे. देशाचे शैक्षणिक केंद्र म्हणून बँकॉकला महत्त्व असून येथे पाच विद्यापीठे, तसेच कला अकादमी आहे. देशातील प्रमुख दैनिके, मासिके, साप्ताहिके बँकॉकमधूनच – प्रामुख्याने थाई, चिनी व इंग्रजी भाषांतून-प्रकाशित होतात. १९७१ मध्ये येथून २२ दैनिके, २० साप्ताहिके व कित्येक मासिके प्रकाशित होत होती. रेडिओ व दूरचित्रवाणी प्रसारणाची केंद्रेही येथे आहेत. थायलंडचे प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून बँकॉकची ख्याती आहे. येथील वाट किंवा बुद्धमंदिरे जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांची संख्या तीनशेहून अधिक असून, त्यांतून थाई वास्तुशैलीची वैशिष्ट्ये दिसून येतात. वाट येथील सुवर्ण बुद्धमंदिरे अत्यंत प्रसिद्ध आहेत. येथील राष्ट्रीय संग्रहालयात दुर्मिळ पुरावशेष पहावयास मिळतात. शहरात राष्ट्रीय ग्रंथालय व अनेक वाचनालये आहेत. येथे अनेक चित्रपटगृहे, निशागृह (नाइटक्लब) असून ‘सिल्पकर्ण राष्ट्रीय रंगमंदिरा’त नृत्यनाट्यांचे प्रयोग सादर करण्यात येतात.

लिमये, दि. ह. गाडे, ना. स.