बाल्हीक : बाल्हीक या प्राचीन देशवाचक संज्ञेचा प्रथम उल्लेख अथर्ववेदात केल्याचे आढळते. त्याचे बाहिक, वाहिक, वाहलीक, टक्का-देश, मद्रदेश, आरट्ट इ. नामोल्लेखही केल्याचे दिसते.

याच्या स्थाननिश्चितीविषयी मतभेद आहेत. रामायण महाभारतातील उल्लेखांवरून हा देश उत्तर भारतात बिआस व सतलज या नद्यांदरम्यान होता. त्रिकांड शेष या प्राचीन कोशानुसार रावी, बिआस व सतलज नद्यांच्या खोऱ्यातील त्रिगर्त व बाहलीक ही एकाच देशाची नावे होत. पाणिनीच्या मते ‘वाहिक’ हे पंजाबचेच दुसरे नाव होय. रामायणातही हा देश त्याच खोऱ्यात कैकय देशाच्या उत्तरेस असल्याचा उल्लेख मिळतो. महाभारतातील एका कथेनुसार बाही आणि हीक या दोन असुरांच्या बिआस नदीच्या परिसरातील वास्तव्यामुळे या प्रदेशास ‘बाल्हीक’ हे नाव पडले असावे. काहींच्या मते हा देश या खोऱ्यातील प्राचीन काळातील उदीच्य नावाच्या विभागात होता. भारतात बोलल्या जाणाऱ्या तत्कालीन सात भाषांपैकी बाल्हीक भाषा उदीच्य व खस लोक बोलत असत व ती त्यांची स्वदेशी भाषा होती, असे भरताने नाट्यशास्त्रात सांगितले आहे. येथे राहणाऱ्या वाहिक (बाल्हीक) नामक आर्येतर लोकांविषयी महाभारतात उल्लेख आहे. साधारणपणे वाहिक लोकांची वस्ती सतलज व सिंधू नद्यांदरम्यानच्या प्रदेशात व रावी नदीच्या पश्चिम तीरावर जास्त होती. त्यांच्या राजधानीचे नाव शाकल (आधुनिक सियालकोट) होते. येथील लोक आधुनिक बाल्ख (बल्ख-बॅक्ट्रिया) प्रदेशातून आले असावेत.

भारतविद्यातज्ञ लासेनच्या मताप्रमाणे मध्य आशियातील अफगाणिस्तानच्या उत्तर सरहद्दीवरील वंक्षु नदीच्या (विद्यमान अमुदर्या नदीच्या) दक्षिणेस असलेले ⇨ बाल्ख नावाचे नगर व त्याचा प्रदेश म्हणजेच बाल्हीक देश होय. चिनी प्रवासी ह्यूएनत्संग व महाकवी कालिदास यांच्या मते हा प्रदेश प्राचीन काळी भारतातच होता. बॅक्ट्रा, झैनिस्पा अशीही त्याची नावे आढळतात. ग्रीकांच्या अंमलाखाली आल्यावर हाच प्रदेश बॅक्ट्रिया म्हणून ओळखला जाऊ लागला असावा. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दिग्विजयाच्या वर्णनात त्याच्या राज्याच्या उत्तर सीमेवर बाल्हीक देश होता, असा उल्लेख आहे. चंद्रगुप्ताने सिंधू नदी पार करून बॅक्ट्रियापर्यंत चाल केली व कुशाणांचा उच्छेद केल्याचाही उल्लेख आहे. बाल्हीक हे एकेकाळी पारशी धर्माचे केंद्र होते.

ह्यूएनत्संगचे प्रवासवर्णन व अमरकोशातील उल्लेख यांवरून हा ‘केशराचा देश’ म्हणून प्रसिद्ध होता. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात बाल्हीक येथील चामड्याच्या व्यवसायाचा उल्लेख आहे. ग्रीक अंमलाखाली येथील मूळ संस्कृतीचा ऱ्हास झाला, असे म्हटले जाते.

चौंडे, मा. ल.