मिझोराम : भारताच्या नऊ केंद्रशासित प्रदेशांपैकी एक. क्षेत्रफळ २१,०८७ चौ. किमी. विस्तार २२° ते २४°१९′ उत्तर अक्षांश व ९२°१६ ते ९३°२६ पू. रेखांश. या प्रदेशाच्या मध्यातून कर्कवृत्त जाते. लोकसंख्या ४,८७,७७४ (१९८१).ईशान्य भारतातील या प्रदेशाच्या पश्चिमेस बांगला देश व भारतातील त्रिपुरा राज्य,उत्तरेस आसाम (काचार जिल्हा) व मणिपूर राज्य आणि पूर्वेस व दक्षिणेस ब्रह्मदेश असून,ऐजाल (लोकसंख्या ७५,९७१) ही या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे.

भूवर्णन: मिझोराम हा टेकड्यांचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध आहे. बहुतेक टेकड्यांच्या रांगा एकमेकीला समांतर अशा उत्तर-दक्षिण पसरलेल्या असून त्यांचे उतार तीव्र आहेत. नद्यांच्या खननामुळे या टेकड्यांमध्ये अनेक खोल दऱ्या तयार झालेल्या आहेत. टेकड्यांदरम्यान लहानलहान मैदानी द्रोणी प्रदेश असून त्यांतील सुपीक मृदेमध्ये भाताचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मिझोरामाच्या मध्यातून उत्तर-दिक्षण दिशेने मिझो टेकड्या पसरलेल्या आहेत. या तीव्र उताराच्या टेकड्यांची सरासरी उंची सु. ९०० मी. असून ती मध्यभागी जास्त आहे. दक्षिण भागातील ब्लू मौंटन (फ्वंगपुरी) हे या टेकड्यांमधील सर्वोच्च (२,२६५मी.) शिखर आहे. मिझोरामच्या पूर्व व दक्षिण सरहद्दींवर चिन टेकड्या व ब्रह्मदेशातील आराकान पर्वतरांगेचा विस्तारित भाग असून पश्चिम सरहद्दीवर बांगला देशातील चितगाँग टेकड्यांची रांग आहे.

मिझोरामच्या डोंगराळ भूमीतून अनेक लहानमोठे नदीप्रवाह वाहत असलेले दिसतात. डोंगराळ भागातील खोल निदऱ्यांमधून उत्तरेकडे अथवा दक्षिणेकडे हे नदीप्रवाह वाहत जातात. ढालेश्वरी (त्लावंग), सोनई (त्वीरेल) व तुइव्हावल या नद्या मध्यवर्ती डोंगराळ प्रदेशात उगम पावून उत्तरेस वाहत जाऊन आसामच्या काचार जिल्ह्यात बऱ्‍रा क नदीला मिळतात,तर कर्णफुली ही नदी प्रदेशाच्या दक्षिण टोकापासून उत्तरेस साधारण मध्यभागापर्यंत वाहत जाते व तेथून पुढे ती पश्चिमेस बांगला देशात प्रवेश करते. तेथेच तिच्यावर प्रचंड जलविद्युत्‌ प्रकल्प उभारला गेला आहे. कलदन ही नदी ब्रह्मदेशातून मिझोराममध्ये वाहत जाते. द्रोणी प्रदेशात अनेक सरोवरेही निर्माण झालेली दिसून येतात. दक्षिण भागातील पालक हे सर्वां त मोठे सरोवर असून त्याशिवाय ताम्‌डिल, रुंग्‌डिल इ. सरोवरेही महत्त्वाची आहेत.

हवामान : मिझोरामचे हवामान आल्हाददायक आहे. येथील हिवाळा व उन्हाळा सौम्य असतात. हिवाळ्यातील तापमान ११°से. ते २४°से. यांदरम्यान,तर उन्हाळ्यातील तापमान १८°से. २९°से. यांदरम्यान असते. खोलगट द्रोणी प्रदेशात किंवा दऱ्याखोऱ्यां मधील हवामान उष्ण व दमट असते परंतु त्यामानाने डोंगरमाथ्यावरील हवामान जवळजवळ वर्षभर थंड असते. बहुधा याच कारणामुळे मिझो लोकांनी आपल्या वसाहती अथवा गावे डोंगरमाथ्यावर वसविलेली दिसून येतात. या प्रदेशात मार्च ते एप्रिल या काळात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होते. या प्रदेशातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५४ सेंमी. असून उत्तरेकडीलप्रदेशापेक्षा दक्षिणेकडील प्रदेशात पावसाचे प्रमाण अधिक आहे (उदा., उत्तरेकडील ऐजाल शहरी वार्षिक सरासरी २०८ सेंमी. पाऊस पडतो तर दक्षिणेकडील लुंगलेई येथे ३५० सेंमी. पडतो ). हिवाळ्यात पाऊस पडत नाही तसेच आकाशही निरभ्र असते. स्वच्छ व निळे आकाश आणि सकाळी पडणारे धुके यांमुळे या डोंगराळ प्रदेशांचे हिवाळ्यातील सृष्टिसौंदर्य विशेष विलोभनीय असते.

वनस्पती व प्राणी: या प्रदेशात समृद्ध वनस्पतिजीवन आढळते. विविध प्रकारची झाडे, झुडपे व गवत तसेच बाबूंची वने सर्वत्र आहेत. डोंगराळ प्रदेशातील टेकड्या नेहमी हिरव्यागार दिसतात. अलीकडे पाइन वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. वन्य प्राणी अभयारण्याच्या दृष्टीने येथील वनस्पतिजीवन व हवामान फारच अनुकूल आहे, परंतु मोठ्या प्रमाणावरील शिकारीमुळे प्राण्यांचे व पक्ष्यांचे प्रमाण खूप घटले आहे. अलीकडे मात्र त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंदुकीच्या वापरावर, प्राणी-पक्षी यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने बंदुकीच्या वापरावर, प्राणी-पक्षी यांच्या शिकारीवर कडक निर्बंध घातले आहेत. हत्ती, वाघ, बिबळ्या, अस्वल, रानटी कुत्रे, शेळ्या, विविध प्रकारची माकडे, रानगवा, हरिण, रानडुक्कर इ. प्राणी येथे पुष्कळ प्रमाणात आहेत. यांचा पिकांना मात्र उपद्रव होतो. जंगली फाउल,धनेश,फेझंट, होले इ. पक्षी या प्रदेशात सर्वत्र दिसतात. 

चौधरी, वसंत 


इतिहास व राज्यव्यवस्था: मिझोराममध्ये मुख्यतः  मिझो जमातीचे लोक आढळतात. मूळ मंगोल वंशाचे हे लोक प्राचीन काळी ब्रह्मदेशाच्या शान प्रांतात स्थायिक झाले. त्यांच्यापैकी लुशाई आणि हमार या दोन टोळ्या पहिल्यांदा भारतात आल्या व लुशाई टेकड्यांच्या परिसरात त्यांनी वस्ती केली. ब्रिटिशांच्या राजवटीत हे लोक वारंवार हल्ले करीत. हा उपद्रव थांबविण्यासाठी ब्रिटिश सैन्याने मिझो प्रदेशात प्रवेश केला व १८९१ मध्ये तो प्रदेश ब्रिटिश हिंदुस्थानात समाविष्ट करण्यात आला. लुशाई हिल्स डिस्ट्रिक्ट या नावाने आसामचा तो एक भाग बनला. मात्र या जमातीच्या अंतर्गत व्यवस्थेत ब्रिटिशांनी ढवळाढवळ केली नाही व त्यामुळे जमात प्रमुखांचे वर्चस्व मिझो लोकांत टिकून राहिले.

स्वतंत्र भारतात प्रारंभी आसामचा एक जिल्हा म्हणूनच हा भाग राहिला. मिझो लोकांच्या विकासाकडे तत्कालीन प्रांतिक सरकारने पुरेसे लक्ष न दिल्यामुळे या लोकांतील असंतोष वाढत गेला. त्यांतच १९५९ मध्ये भीषण दुष्काळाची भर पडली,(काटेरी बांबू वृक्षांच्या अफाट वाढीमुळे दर ४०–५० वर्षांनी त्या भागात असे दुष्काळ पडतात.) परिणामतः १९६६ मध्ये ‘मिझो नॅशनल फ्रंट’ या संघटनेतर्फे सशस्त्र उठाव करण्यात आला. भारतीय सैनिकांच्या मदतीने हा उठाव कठोरपणाने मोडून काढण्यात आला. मिझो बंडखोरीला आळा घालण्यासाठी काही उपायही योजण्यात आले. उदा., गटवार ग्रामपद्धती. या पद्धतीत मिझोंना त्यांच्या निवासस्थानापासून खूप दूर कामासाठी जावे लागे. या भागात रात्री संचारबंदी असे. या यंत्रणेत शेतीकडे पुरेसे लक्ष देण्यास मिझोंना उसंत लाभणे शक्य नव्हते. गटग्रामांतील सुविधाही अपुऱ्या होत्या. परिणामतः गलिच्छ वस्त्यांत त्यांचे रूपांतर झाले व लोकांतील असंतोष वाढतच गेला.

मिझोराम हा १९७२ मध्ये केंद्रशासित प्रदेश करण्यात आला तथापि मिझो बंडखोरी चालूच राहिली. ८ सप्टेंबर १९७४ रोजी ‘अशांत प्रदेश’म्हणून हा प्रदेश जाहीर करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंसाचार, हल्ले,उठाव यांना प्रतिबंध करण्यासाठी नागरी प्रशासनाला सैनिकी मदत पुरविण्यासाठी असलेला कायदाही या प्रदेशात लागू करण्यात आला. लालडेंगा व इतर मिझो नेते या प्रदेशातील राजकीय आंदोलनाचे नेतृत्व करतात. सामान्यपणे या प्रदेशात मिझो नॅशनल फ्रंटच्या अस्तित्वामुळे राजकीय अस्थिरता टिकूनच आहे. हिंसाचार,लुटालू ट यांमुळे जीवन काहीसे विस्कळित झालेले आहे. यांतच भर म्हणून चकमा व मिझो या दोन जमातींतील संघर्षाला तोंड फुटले आहे. तथापि भारताच्या ईशान्य सीमेवरील व मोक्याच्या व महत्त्वाच्या प्रदेशात राजकीय स्थैर्य व शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रयत्न जारी आहेत. [→ मिझो]. मिझोराममध्ये एकसदनी विधिमंडळ असून त्यात ३३ सदस्य असतात. नायब राज्यपाल मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार पाहतो. मंत्रिमंडळात तीन मंत्री असून दोन राज्यमंत्री होते (१९८४).

गौहाती उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रातच मिझोरामचा अंतर्भाव होतो. या प्रदेशात तीन जिल्हे, नऊ उपविभाग, तीन स्वायत्त गिरिप्रदेश समित्या (कौन्सिले),सहा नगरे किंवा शहरे, २३ पोलीस ठाणी आणि ३०१ ग्रामपंचायतवजा समित्या आहेत. ऐजाल, लुंगलेई, छिम्‌तुइपुई अशी जिल्ह्यांची नावे आहेत. 

जाधव, रा.ग. 


आर्थिक स्थिती: मिझोराममधील बहुसंख्य लोक सुशिक्षित व प्रगत असले,तरी नैसर्गिक आपत्ती व अडचणींमुळे या प्रदेशाचा आर्थिक विकास घडवून आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यापुढे आहे. डोंगराळ व अत्यंत अवघड,दुर्गम प्रदेश असल्याने येथील नैसर्गिक साधनसंपत्तीचा अद्याप पुरेसा शोध लागलेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळात या प्रदेशाच्या आर्थिक विकासाच्या अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. १९५९ मध्ये पडलेल्या भयंकर दुष्काळामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी १९६३ पासून नवीन धोरण अंमलात आणून त्यानुसार या प्रदेशाचे नऊ विभाग करण्यात आले आहेत. शेती, मृद्‌संधारण,शिक्षण,दळणवळण व लोकांचे आरोग्य या सर्वच बाबतींत प्रगती होत आहे. येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय असून बहुतेक भागात ‘झूम’ अथवा फिरती शेती केली जाते. एकूण सु. ८७% लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत. लागवडीखालील क्षेत्राच्या फक्त १७% क्षेत्रालाच जलसिंचनाचा फायदा मिळतो. झूम शेतजमिनी वैयक्ति क मालकीच्या नसून गावठाणाच्या मालकीच्या आहेत. स्थिर पायऱ्यापायऱ्यांची शेतजमीन मात्र शेतकऱ्यांना वाटून दिलेली असते. डोंगरउताराच्या शेतीत प्रामुख्याने मका व भात ही पिके घेतली जातात. यांशिवाय कडधान्ये, कापूस, तंबाखू, चहा व जलसिंचनाची सोय असलेल्या प्रदेशांत ऊस, मिरची, आले, हळद, बटाटे, केळी, अननस, संत्री, तीळ, कागदी लिंबू इ. पैशाची पिकेही घेतली जातात. कॉफी,रबर,काजू,वेलदोडे यांच्या लागवडीचेही प्रयत्न सुरू आहेत. आले व तीळ यांच्या उत्पादनात चांगली प्रगती दिसून येत आहे. १९८०–८१साली मिझोराममध्ये पुढीलप्रमाणे कृषिउत्पादन झाले (आकडे टनांमध्ये): तांदूळ ८५,२९०आले १,६२९ ऊस ५०,८२० बटाटे २,७५५ हळद ३१७ मिरची १,४५८मका ६,१६६कापूस १,२४०व तंबाखू ३४७. १९८२ साली मिझोराममध्ये ४७,८५३ गुरे व ६,७९,३१२ कोंबड्या होत्या. यांशिवाय ४,२९४ म्हशी ३,११४ रानगवे ७७,१३४ डुकरे ८६७ मेंढ्या २७,५४५ शेळ्या व १,४८४ घोडे होते. त्यांच्यासाठी २२ दवाखाने, ४३ आरोग्यकेंद्रे व एक रुग्णालय होते.

मिझोराममधील ३२% क्षेत्र जंगलांनी व्यापलेले असून त्यापैकी १५,९३५ चौ. किमी. क्षेत्र राखीव जंगलांखाली आहे. डांपा वन्य प्राणी अभयारण्याखाली ५७२ चौ. किमी. आणि तावी वन्य प्राणी अभयारण्याखाली २१० चौ. किमी. क्षेत्र आहे.

या केंद्रशासित प्रदेशात मोठे उद्योगधंदे नाहीत. बहुतेक लोक पारंपरिक कुटिरोद्योग करतात. यांत प्रामुख्याने हातमाग व हस्तव्यवसाय यांचा समावेश असतो. मिझो हे मुळचे कुशल विणकर असून ते उत्तम प्रतीचे गालिचे तयार करतात परंतु हे काम हाताने अत्यंत हळू होते व आर्थिक दृष्ट्या तोट्याचे ठरते. येथील टोपल्या व हॅट प्रसिद्ध आहेत. या उद्योगांशिवाय रेशीम उत्पादन, भाताच्या गिरण्या,छापखाने,रेडिओ दुरूस्ती,फळांवर प्रक्रिया करून ती डबाबंद करणे,आल्याचा उपयोग करून पेये तयार करणे,साबण, विटा तयार करणे इ. व्यवसाय चालतात. १९८३ साली मिझोराममध्ये नोंदविलेली एकूण ५७३ उद्योगकेंद्रे होती.

या प्रदेशात एकूण ५० डिझेल विद्युत्‌शक्तिनिर्मिती केंदे असून त्यांपासून निर्माण होणारी वीज स्थानिक घरगुती वापरासाठी उपयोगी पडते. या केंद्राची एकूण वीजनिर्मितिक्षमता ६·३७ मेवॉ. असून १९८२–८३ साली १३·३६ मेवॉ. विजेचा वापर झाला. आसाम व मेघालय राज्यांतून वीज घेतली जाते. मिझोराममधील सेर्लुई जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्पाचे काम प्रथमावस्थेत होते (१९८४). एप्रिल १९८३ पर्यंत मिझोराममधील एकूण ९८ गावांना वीजपुरवठा करण्यात आला होता.

जलद व सुलभ वाहतुक करणे हा येथील सर्वांत मोठा प्रश्न आहे. ऐजाल,सिल्चर,लुंगलेई, चांफाई,व्हेर्व्हेक,फाइलांग,डेमग्री,सैहा इ. गावांदरम्यान चांगले मोटाररस्ते आहेत. एकूण ३,२५३ किमी लांबीच्या रस्त्यांपैकी १,१९७ किमी. डांबरी आहेत. येथे सु. ४०४किमी. लांबीचा राज्यमार्ग असून त्याच्या रुंदीकरणाची योजना आहे. मिझोराममध्ये १९८२ साली एकूण ३,८४५ नोंदणीकृत वाहने होती. या प्रदेशात तारसेवाही उपलब्ध आहेत.  

चौंडे, मा. ल. 


लोक व समाजजीवन : मिझोराममधील ‘मि’ याचा अर्थ माणूस व ‘झो’ म्हणजे डोंगर. डोंगर-प्रदेशात राहणारे लोक असा त्याचा अर्थ होतो. मिझोराममधील ९४·२०% लोक हे आदिवासी जमातीचे आहेत. एकूण ४,९३,७५७ लोकसंख्येपैकी मिझो जमातीची लोकसंख्या ३,४०,८२६ होती (१९८१). मिझो जमातीत अनेक उपशाखा आहेत आणि त्यांची मूळ स्थाने मणिपूर, त्रिपुरा, ब्रह्मदेश, बांगलादेश यांसारख्या इतरही प्रदेशांत आढळतात. चकमा आणि टायप्रस या इतर महत्त्वाच्या जमाती होत. लुशाई या मिझोंच्या प्रमुख उपशाखेत साक्षरतेचे प्रमाण ८६% आहे. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केलेल्या कार्यामुळे यांपैकी बहुतेकांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. बहुतेक लोक प्रॉटेस्टंट पंथीय आहेत. धर्मांतरपूर्व मिझो जमात ही जडप्राणवादीच होती. त्यामुळे जमातीतील वैदू किंवा मांत्रिक लोकांना महत्त्व होते. मिझो आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा हे लोक उपयोग करतात. मात्र मिझो भाषेसाठी ते रोमन लिपीचा वापर करतात. चकमा जातीचे लोक अजूनही बौद्धधर्मीय आहेत व बंगाली भाषा बोलतात.

मिझोराममधील बहुतेक गावांतून प्राथमिक शिक्षणाच्या शासकीय वा खाजगी शाळा आहेत. या प्रदेशात ३२६ पूर्व-प्राथमिक,७७० प्राथमिक, ३३१ माध्यमिक व १,४०३उच्च माध्यमिक शाळा असून ११ महाविद्यालये, एक विद्यापीठ (नॉर्थ-ईस्टहिलयुनिव्हर्सिटी),एक तंत्रविद्या निकेतन,दोन शिक्षक-प्रशिक्षण संस्था व एक शिक्षणशास्त्र संस्था आहे. शालेय शिक्षणासाठी स्वतंत्र मंडळाची १९७७ मध्ये स्थापना करण्यात आली.या प्रदेशातील सरासरी साक्षरतेचे प्रमाणे ५९% आहे.

या प्रदेशात सात रुग्णालये, १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १५पूरक आरोग्य केंद्रे, ७२ डॉक्टर, ६३ विशेषज्ञ डॉक्टर, ७०९ परिचारिका व आरोग्य सेवक, ७२ औषधी तज्ञ होते. या प्रदेशातील रूग्णालयातून एकूण ५६० खाटांची सोय असून ५० खाटा असलेले एक क्षय रुग्णालय आहे.

महत्त्वाची स्थळे : ऐजाल हे मिझोरामच्या राजधानीचे ठिकाण प्रदेशाच्या मध्यभागी असून व्यापारी केंद्र व थंड, आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. याचा परिसर बांबू व कापूस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लुंगलेई (लोकसंख्या १७,७७३–१९८१) हे ऐजालच्या दक्षिणेस सु. ९३ किमी. वरील शहर बांबूची बने, तांदूळ व कापूस उत्पादनांसाठी महत्त्वाचे आहे. यांशिवाय मिझोराममध्ये कोलोसिब (८,२५६),चांफाई (७,२८८),सैहा (७,९१९),सेर्चिप (६,४५८) ही अन्य शहरे आहेत.

जाधव, रा.ग.

कलात्मक कापडवीण : मिझो स्त्रियांचा पारंपरिक उद्योग

उत्सवप्रसंगीच्या वेशभूषेतील मिझो युवती

भात सडणारी मिझो स्त्री

मिझोंचे लोकप्रिय चेरो वा बांबूनृत्य

भारतातील मिझोरामचे स्थान

 

मिझोराम राज्याचा नकाशा