पालारनदी : दक्षिण भारतातील कर्नाटक, आंध्र प्रदेश व तमिळनाडू राज्यांतून वाहणारी नदी. लांबी ३७० किमी. जलवाहन क्षेत्र २,६८४ चौ.किमी. कर्नाटक राज्याच्या कोलार जिल्ह्यात नंदीदुर्ग टेकडयांमध्ये उगम पावून प्रथम आग्नेयीस व पुढे दक्षिणेस सु. ७५ किमी. वाहत जाऊन आंध्र प्रदेश राज्यातील चित्तूर जिल्ह्यात प्रवेश करते. या राज्यातून सु. ५० किमी. वाहून तमिळनाडू राज्यात प्रवेश करते. तमिळनाडूत ती प्रथम ईशान्येस, नंतर पूर्वेस व शेवटी आग्नेयीस असे एकूण सु. २४५ किमी. वाहत जाऊन महाबलीपूरच्या दक्षिण नैर्ऋत्येस १८ किमी.वर बंगालच्या उपसागराला मिळते. पॉनी व चेय्यार ह्या हिच्या प्रमख उपनद्या होत. नदीकाठी वानियमवाडी, अंबूर, वेल्लोर, कांचीपुरम्, अर्काट, चिंगलपुट ही प्रमुख शहरे वसली आहेत. नदीवर वेटमंगल व रामसागरसारखे अनेक तलाव बांधले असून वेटमंगलचे पाणी कोलार गोल्ड फील्डला पुरविले जाते. अर्काटजवळ १८५७ मध्ये बांधलेल्या धरणापासून मुख्यतः चिंगलपुट, जिल्ह्यातील जमिनीला पाणीपुरवठा केला आहे.

पवार, चं. ता.