हो-चि-मिन्ह सिटी : व्हिएटनाममधील एक औद्योगिक, व्यापारी व सर्वांत मोठे शहर. १९७६ पर्यंतचे नाव सायगाव. लोकसंख्या सूऑई तिएन थीम पार्क७७,८१,७०० (२०१४). ते दक्षिण व्हिएटनाममध्ये मेकाँग नदीच्या त्रिभुजप्रदेशाच्या उत्तर भागात दक्षिण चिनी समुद्रापासून पश्चिमेस सु. ८० किमी.वर सायगाव नदीकाठी वसले आहे. याचा प्राचीन इतिहास ज्ञात नाही तथापि सतराव्या शतकात व्हिएटनामी वंशाचे लोक दक्षिणे-कडे प्रवास करीत अखेरीस सायगाव या खेड्यात पोहोचले. त्यावेळी कंबोडियातून आलेले ख्मेर नामक लोक तिथे राहत होते आणि हा प्रदेश कंबोडिया राज्यात अंतर्भूत होता. अठराव्या शतकात काही फ्रेंच व्यापारी व मिशनरी तिथे स्थायिक झाले. तसेच काही चिनी व्यापारी शेजारच्या चो लोन गावात वस्ती करून होते. फ्रेंच वसाहतवाल्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास आग्नेय आशियात प्रवेश करून इंडोचायनात वसाहत केली आणि १८५९ मध्ये सायगाव हस्तगत केले आणि मध्य व्हिएटनाममधील अनाम राज्याचा सम्राट तू डूक (कार. १८४७–८३) यास अंकित करून त्याच्याकडून फ्रेंचांनी काही प्रदेश हस्तगत केला (१८६२). त्यामुळे सायगावसह कोचीन चायनाचा संपूर्ण प्रदेश फ्रेंचांच्या आधिपत्याखाली आला आणि सायगाव ही कोचीन चायनाची फ्रेंचरक्षित ( प्रोटेक्टोरेट) राजधानी झाली. त्यावर फ्रेंचांचे १८६२ ते १९५४ दरम्यान आधिपत्य होते. त्यास राजधानीचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर नगराचा चेहरा-मोहरा बदलला आणि ते आग्नेय आशियातील एक व्यापारी व औद्योगिक शहर म्हणून विकसित झाले. दुसऱ्या महायुद्धात ते जपानने पादाक्रांत केले (१९४०). तरीसुद्धा फ्रेंचांचे वसाहतिक अधिकार अस्तित्वात होते. दुसऱ्या महायुद्धात सायगावचे वित्तीय नुकसान फारसे झाले नाही. जपानच्या शरणागतीनंतर (१९४५) व्हिएटमिन्ह संघटनेने स्वातंत्र्याची घोषणा केली आणि कम्युनिस्ट पॉलिट ब्यूरोने हो–चि–मिन्ह याची व्हिएटनामचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली. त्यावेळी सायगावमध्ये दंगेधोपे झाले. फ्रेंच सैन्याने परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. जिनीव्हा करारानुसार फ्रान्सने सायगाववरील ताबा सोडला (१९५४). तेव्हा पहिल्या इंडोचायना युद्धाला तोंड फुटले आणि हे युद्ध (व्हिएटनाम युद्ध) १९५४–७५ असे दीर्घकाळ चालले. व्हिएटनाम युद्धाच्या काळात अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचा प्रमुख लष्करी तळ सायगावला होता. उत्तर व्हिएटनाम-मधील कम्युनिस्ट फौजांनी ३० एप्रिल १९७५ रोजी सायगाव हस्तगत केले आणि त्याचवेळी सायगावचे नामांतरण ‘हो-चि-मिन्ह सिटी’ असे केले. तिथे वसाहत काळात फ्रेंच शासनाने पाश्चात्त्य वास्तुशैलीचे बंगले, सदनिका, सार्वजनिक वास्तू, दुतर्फा वृक्षांनी वेढलेले फरसबंदी रूंद रस्ते बांधले. शिवाय शहरात दक्षिणोत्तर रेल्वे रूळ टाकून शहरांतर्गत रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध केली. साहजिकच त्यास सर्वदेशीय स्वरूप प्राप्त झाले. मेकाँग नदीच्या त्रिभुज प्रदेशातील तांदळाच्या उत्पन्नाचे हे मोठे कोठार बनले. शेजारच्या बंदरातून त्याची निर्यात होते. शहरातील जुन्या वास्तूंत रोमन कॅथलिक नोेत्र दाम कॅथीड्रल, जिॲक लाम पॅगोडा (१७४४) सूऑई तिएन थीम पार्कइ. वास्तू महत्त्वाच्या असून शहरात रसायने, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चामड्याच्या वस्तू ,पादत्राणे, मद्य, वस्त्रप्रावरणे इ. निर्मितिउद्योग आहेत व अन्नप्रक्रिया उद्योगही चालतो. याशिवाय मद्यनिर्मितीचा उद्योग आहे. शहरात व्हिएटनाम नॅशनल युनिव्हर्सिटी ही व्हिएटनाममधील उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी एक मोठी शिक्षणसंस्था आहे. तसेच आधुनिक सुविधांनी युक्त रुग्णालये व हॉस्पिटल्स आहेत. वस्तुसंग्रहालय आणि सूऑई तिएन थीम पार्क ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. समुद्रकिनाऱ्यावर निसर्गरम्य गुहा असून समुद्रातून ठिकठिकाणी वर आलेल्या पाषाण जिव्हा पर्यटकांचे आकर्षण आहेत. शहराजवळच बंदरातून मोठ्या बोटींची ये-जा चालते आणि सर्व आधुनिक सुविधांनी ते सुसज्ज आहे व तिथे मोठी कोठारेआहेत. शहराजवळच तान सोन व्हत नामक विमानतळ आहे. 

 

कम्युनिस्ट राजवटीने देशातील आयात वस्तूंवर निर्बंध लादले तसेच औद्योगिक कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. शिवाय वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्याचा प्रयत्न कम्युनिस्ट राजवट करीत आहे कारण १९८० च्या दशकानंतर शहराचा सर्वांगीण विकास होऊनसुद्धा लोकसंख्या भरमसाठ वाढली. त्यामुळे घरांची टंचाई, वीज, पाणी यांची कमतरता हेप्रश्न उद्भवले असून शहराला प्रदूषणाची समस्या भेडसावू लागली आहे. 

देशपांडे, सु. र.