स्पोकॅन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पश्चिम किनाऱ्यावरील वॉशिंग्टन राज्यातील याच नावाच्या परगण्याचे मुख्यालय आणि एक औद्योगिक व व्यापारी केंद्र. लोकसंख्या २,०८,९१६ (२०१०). हे राज्याच्या पूर्व भागात, स्पोकॅन नदीकाठी, स्पोकॅन धबधब्याच्या पायथ्याशी वसलेले आहे.

येथे १८१० मध्ये नॉर्थ वेस्ट कंपनीचे व्यापारी ठाणे होते. १८७१ मध्ये जेम्स ग्लोव्हर याने हे शहर वसविले. येथील स्पोकॅन इंडियन जमाती-वरून हे ठिकाण ‘स्पोकॅन’ म्हणून ओळखले जाई. १८८१ मध्ये येथपर्यंत उत्तर (नॉर्दर्न) पॅसिफिक लोहमार्गाची बांधणी करण्यात आली व ती उद्योगसंस्थांच्या विस्तारासाठीही कारणीभूत ठरली. त्याच वेळी याला शहराचा दर्जा प्राप्त झाला. १८८९ मध्ये लागलेल्या आगीमुळे हे शहर उद्ध्वस्त झाले होते. त्यानंतर त्याची पुनर्निर्मिती करण्यात आली. १८९० मध्ये या शहराचे नामकरण अधिकृत रीत्या स्पोकॅन असे करण्यात आले.

पुरेशी जलशक्ती तसेच खनिजे, वने व कृषी दृष्ट्या समृद्ध भूप्रदेश यांमुळे हे औद्योगिक, व्यापारी व वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. या ठिकाणी ग्रँड कूली हे काँक्रीटचे मोठे धरण बांधलेले आहे. येथे ॲल्युमिनियम, अन्नपदार्थ, सिमेंट, कागद, यंत्रसामग्री, दुग्धजन्य पदार्थ इ. निर्मितिउद्योग आहेत. कोलंबिया पठारावरील सुपीक प्रदेशामुळे येथे धान्याची घाऊक बाजारपेठ आहे. परिसरातील पशुपालन, खाणकाम, गहू व फळफळावळ इत्यादींच्या उत्पादनांमुळे शहराचे महत्त्व वाढले आहे.

स्पोकॅन वॉशिंग्टन राज्यातील प्रमुख शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. येथे गन्झॉग विद्यापीठ (१८८७), विटवर्थ महाविद्यालय (१८९०) व फोर्ट राइट महाविद्यालय आहे. या शहराच्या परिसरात अनेक उद्याने असून त्यांपैकी रिव्हरफ्रंट पार्क, क्लिफ, मनिटो व मौंट स्पोकॅन (उंची १,७९३ मी.) ही उद्याने विशेष प्रसिद्ध आहेत. शहराजवळ कॉलव्हील व कनिक्शु ही राष्ट्रीय वने आहेत. ‘किने कॉवल्सङ्ख म्यूझीयम हे तेथील आदिवासी कला संस्कृतीमुळे ऐतिहासिक दृष्ट्या प्रसिद्ध असून हिस्टॉरिकल म्यूझीयम, स्पोकॅन व्हॅली, पायोनिअर म्यूझीयम, स्पोकॅन गृह आणि स्पोकॅन नदीवरील निसर्गसुंदर धबधबा इ. पर्यटकांची आकर्षण केंद्रे आहेत.

निगडे, रेखा