हावडा ब्रीज

हावडा : हावरा (हौरा). पश्चिम बंगाल राज्यातील हावडा जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १०,७२,१६१ (२०११). हे पश्चिम बंगाल राज्यातील दुसरे मोठे शहर आहे. ते कोलकात्याचे उपनगर आहे. ‘हावरा’ हा शब्द बंगाली असून त्याचा अर्थ पाणी व चिखल यांचा साठा-ढीग-संग्रह असा होतो. हावडा हुगळी नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेले आहे. कोलकाता व हावडा ही शहरे हुगळी नदीवरील चार पुलांद्वारे एकमेकांस जोडलेली आहेत. ‘हावडा ब्रीज’ (रवींद्र सेतू) हा हुगळी नदीवर १९४३ मध्ये बांधलेला, ४५७ मी. गाळ्याच्या एकाच कमानीचा भव्य लोखंडी पूल प्रेक्षणीय आहे. पूर्व रेल्वे व दक्षिण-पूर्व रेल्वे विभागातील हावडा हे प्रमुख प्रस्थानक असून ते रेल्वेने देशातील इतर प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. येथे एकूण सहा लोहमार्ग येऊन मिळतात. हावडा शहरास ५०० वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन वंग देशात याचा समावेश होत होता. परदेशी प्रवाशांच्या प्रवासवर्णनांत, तसेच इ. स. १४९५ मध्ये विप्रदास पिपीलाई याने लिहिलेल्या ‘मानस मंगल’ या बंगाली कवितेत याचा उल्लेख आहे. हावडा येथे १९१४ मध्ये रेल्वेकर्मशाळेची स्थापना झाली. तसेच १९१४ नंतर दुसऱ्या महायुद्धकाळापर्यंत प्रकाश अभियांंत्रिकी उद्योगाची येथे भरभराट झाली. औद्योगिक परिसरातच नियोजनरहित कामगार वसती बेसुमार वाढल्यामुळे हावडाचे जलदगतीने शहरीकरण झाले. १८६२ मध्ये हावडा नगरपालिकेची स्थापना झाली आणि १९८० मध्ये यास महानगरपालिकेचा दर्जा मिळाला.

हावडा हे हुगळी नदीवरील औद्योगिक शहर असून येथील’ हुगळी औद्योगिक संकुल’ उद्योगांचे केंद्र आहे. येथे जहाजबांधणी केंद्र, सूतगिरण्या, तागाच्या गिरण्या व कागदगिरण्या आहेत. यांशिवाय येथे काच व पोलाद, आगपेट्या, यंत्रसामुग्री, वीजेची उपकरणे, मोटारी, रबर इ. निर्मितीचे कारखाने आहेत.

हावडा येथे १८५६ मध्ये स्थापन झालेली बंगाल अभियांत्रिकी व विज्ञान विद्यापीठ ही प्रतिष्ठित शिक्षणसंस्था आहे. तसेच १९३७ मध्ये स्थापन झालेले डॉन बॉस्को स्कूल, संत्रगुच्छी येथील केंद्रीय विद्यालय, सेंट ॲग्नीस कॉन्व्हेंट स्कूल, सेंट थॉमस चर्च स्कूल, सेंट अलॉम शिअस हायस्कूल, बेंगाल एंजिनिअरिंग कॉलेज इ. शहरातील सर्वांत जुन्या शिक्षणसंस्था आहेत.

शहरापासून जवळच हुगळी नदीच्या पश्चिम तीरावरील रामकृष्ण मठ आणि मिशन मुख्यालय, बेलूरमठ, जगदीशचंद्र बोस भारतीय वनस्पती शास्त्रीय उद्यान (स्था. १७८६) विद्यमान जगदीशचंद्र बोस व त्यामधील विशाल वटवृक्ष प्रसिद्ध असून ती पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत.

कुंभारगावकर, य. रा.