बडानगर : पश्चिम बंगाल राज्याच्या चोवीस परगणा. जिल्ह्यातील औद्योगिक केंद्र आणि कलकत्याचे एक उपनगर. लोकसंख्या १,३६,८४२ (१९७१) हे कलकत्त्याच्या उत्तरेस सु. दहा किमी. हुगळी नदीच्या पूर्व तीरावर वसले आहे. सोळाव्या शतकात येथे पोर्तुगीजांची वसाहत होती. तदनंतर हे डचांचे प्रमुख व्यापारी केंद्र बनले. १७९५ मध्ये ते ब्रिटिशांच्या ताब्यात गेले. १८६९ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. १८९९ मध्ये शहर दोन भागांत विभागून उत्तरेकडील अर्धा भाग कामारहाटी या नावाने ओळखला जाऊ लागला. ताग व कापड गिरण्यांसाठी बडानगर प्रसिध्द असून सरकी काढणे व गासड्या बांधण्याचे व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतात. यांशिवाय रसायने, एरंडेल, आगकाड्या, कृषी, व औद्योगिक यंत्र-निर्मिती, इ. उद्योगही चालतात.

चौधरी, वसंत