व्हॅटिकन सिटी : (स्टेट ऑफ द व्हॅटिकन सिटी), स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा असलेले जगभरच्या रोमन कॅथलिक पंथाचे मुख्य धर्मपीठ. जगातील सर्वांत लहान व स्वतंत्र असे हे राष्ट्र आहे. क्षेत्र सु.४४ हेक्टर. लोकसंख्या ९०० (इ. स. २०००). इटलीची राजधारी ⇨ रोम या शहराच्या वायव्य भागात टायबर नदीच्या पश्चिम काठावरील व्हॅटिकन टेकडीवर व्हॅटिकन सिटी आहे. ते रोम शहराने सर्व बाजूंनी वेढलेले आहे. रोमन कॅथलिक चर्चचे हे आध्यात्मिक व प्रशासकीय केंद्र आहे. आग्नेयेकडील सेंट पीटर्स स्क्वेअर (पिऍझा सॅना पिएत्रो) हा चौक वगळता व्हॅटिकन सिटीच्या इतर सर्व बाजूंनी मध्ययुगीन व प्रबोधनकालीन उंच तटबंदी आहे. व्हॅटिकन सिटीला एकूण सहा प्रवेशद्वारे असून त्यांपैकी पिऍझा, सेंट पीटर्स चर्चच्या दर्शनी भागातील आर्च ऑफ द बेल्स व उत्तर बाजूचे वस्तुसंग्रहालयाकडील प्रवेशद्वार ही तीन प्रवेशद्वारे लोकांसाठी खुली ठेवण्यात आली आहेत.

इटलीबरोबर ११ फेब्रुवारी १९२९ रोजी झालेल्या लॅटरन करारानुसार तत्कालीन फॅसिस्ट शासनाने व्हॅटिकन सिटीच्या सार्वभौमत्वास मान्यता दिली. त्यामुळे सु. ६० वर्षांपूर्वीपासून अनिर्णित असलेला हा ‘रोमन प्रश्न’ निकाली निघाला. व्हॅटिकन सिटीची सर्व घटनात्मक सत्ता पोपच्या हाती असली, तरी पोप प्रामुख्याने आध्यात्मिक व धार्मिक स्वरूपाच्या काऱ्या अधिक व्यस्त असतात. प्रशासकीय सत्ता गव्हर्नरकडे असते. मंत्रिमंडळ सदस्यांची नियुक्ती पोपकडून करण्यात येते. गव्हर्नर व मंत्रिमंडळ पोपला जबाबदार असते.

पोप दुसरे जॉन पॉल यांच्या मृत्यूनंतर (एप्रिल २००५) कार्डिनल योझेफ रात्सिंगर हे व्हॅटिकन सिटीचे प्रमुख आहेत. ते सोळावे पोप बेनिडिक्ट म्हणून ओळखले जातात.

व्हॅटिकन सिटीची स्वतःची टपालव्यवस्था, नभोवाणी (३४ भाषांत प्रसारण) व दूरध्वनी यंत्रणा असून बँकिंग व औषधर्मिती संस्थाही आहेत. येथील बँक-व्यवसायात गुप्तता पाळली जाते. अन्न, पाणी, वीज, नैसर्गिक वायू इत्यादींची आयात केली जाते. येथे आयकर आकारला जात नाही. भांडवलाच्या आयात-निर्यातीवर बंधने नाहीत. १०० स्वीस रक्षक असलेली लष्करी यंत्रणा आहे. स्वतंत्र दैनिक वृत्तपत्रे येथून प्रकाशित केली जातात.

सेंट पीटर्स चर्च, व्हॅटिकन राजप्रासाद, व्हॅटिकन संग्रहालय, मायकेल-अँजेलोच्या अप्रतिम चित्रशिल्पांनी सजविलेले सिस्टाइन चॅपेल, पींतूरीक्क्यो याच्या नावीन्यपूर्ण चित्रकृती असलेले बोर्जा अपार्टमेंट, रॅफेएल्स स्टॅन्झ, व्हॅटिकन ग्रंथालय या व इतर सुंदर वास्तू येथे आहेत. जगभरातील कलावंत, समीक्षक, तसेच चोखंदळ पर्यटक या कलात्मक वास्तूंसाठी येथे येतात. इ. स. चौथ्या शतकात बांधलेले व सोळाव्या शतकात नूतनीकरण केलेले येथील ‘सेंट पीटर्स चर्च’ हे जगातील सर्वांत मोठे चर्च म्हणून ओळखले जाते. येथील व्हॅटिकन राजप्रासाद म्हणजे एकमेकांशी जोडलेल्या अनेक इमारतींचे संकुल असून त्यात सु. एक हजारांवर खोल्या आहेत. वेगवेगळी चॅपेल-दालने, संग्रहालये, ग्रंथालये, सचिवालय अभिलेखागार इत्यादींसाठी त्यांचा वापर होतो. येथील अभिलेखागारात अत्यंत महत्त्वाची धार्मिक व ऐतिहासिक कागदपत्रे व ग्रंथ आहेत. व्हॅटिकन ग्रंथालयात ख्रिस्तपूर्व काळापासूनच्या अनेक जुन्या व दुर्मिळ हस्तलिखितांचा संग्रह आढळतो. येथे सुंदर बागा आहेत. (चित्रपत्र).

संदर्भ : इटली; पोपशासन; रोम.

चौधरी, वसंत