अलीगढ : उत्तर प्रदेश राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण. लोकसंख्या २,५४,००८ (१९७१). उत्तर रेल्वेच्या दिल्ली-कानपूर मार्गावर हे दिल्लीपासून आग्नेयीस १२६ किमी. असून ग्रँड ट्रंक या राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे स्थानक आहे. शहराचे मूळ नाव कोइल. शहराजवळ जुने हिंदू व बौद्ध अवशेष मिळत असले, तरी बाराव्या शतकापर्यंतचा इतिहास अज्ञात आहे. बाराव्या शतकात डोर राजपुतांनी येथे मजबूत किल्ला बांधला. कुत्बुद्दीन ऐबकने त्यांचा पराभव केला. अठराव्या शतकापर्यंत हा किल्ला मुसलमानांच्याच ताब्यात होता. या काळात ‘महम्मदगढ’व ‘साबितगढ’अशीही याची नावे पडली. १७५७ मध्ये जाटांनी हा जिंकून याला ‘रामगढ’असे नाव दिले परंतु १७५९ मध्ये नजफखानाने जाटांचा पराभव करून त्यास ‘अलीगढ’नाव दिले. १७८४ मध्ये हा शिंद्यांकडे आला व शिंद्यांकडून इंग्रजांकडे गेला. १८५७ च्या उठावात अलीगढचा संबंध आल्याचे इतिहासात नमूद आहे.

 

येथे १८६५ पासून नगरपालिका आहे. जिल्ह्याचे ठाणे असल्याने येथे मुलकी कचेऱ्या, दवाखाने, शाळा इत्यादींखेरीज ल्याल ग्रंथालय, घड्याळाचा मनोरा, अनेक मशिदी व दर्गे आहेत. सर⇨सय्यद अहमद यांनी उभारलेल्या⇨अलीगढ मुस्लिम विद्यापीठामुळे शिक्षणक्षेत्रात अलीगढचे महत्त्व वाढले आहे. शहरात कापूस पिंजण्याच्या व तेल गाळण्याच्या गिरण्या असून, येथील मुद्रण-उद्योग व धातु-उद्योग सुप्रसिद्ध आहेत. भारतात होणाऱ्‍या कुलपांपैकी ७० टक्के कुलपे येथे होतात. कुलपांचे उत्पादन सु. दर वर्षी २ कोटींचे आहे.

 

ओक, शा. नि.