राजमहेंद्री : भारतातील आंध्र प्रदेश राज्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे व महसुलाचे मुख्य ठिकाण व मद्रास-हावडा या रुंदमापी लोहमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक. लोकसंख्या २,१६,५१४ (१९८१ अंदाजे). गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर हे वसले आहे. जवळच नदीवर सु.२·५ किमी. लांबीचा लोहमार्गासाठी पूल आहे. नदीच्या तीरावरील गोदावरी नावाचे दुसरे रेल्वे स्थानक राजमहेंद्रीपासून ३ किमी. अंतरावर आहे. मद्रास-कलकत्ता राष्ट्रीय महामार्ग क्रं.५ येथेच गोदावरी नदी ओलांडतो.

चालुक्य राजा राजराजा नरेंद्र (कार.१०२२–६१) याने १०२२ मध्ये राजमहेंद्री वसविले. म्हणून ‘राजराजा नरेंद्रपुरम्’, ‘राजमहेंद्रवरम्’, ‘राजमंदिरम्’ इ. नावांनी हे ओळखले जात असे. नन्नयभट्ट याच्या तेलुगू महाभारताच्या प्रस्तावनतेत राजमहेंद्रीचा उल्लेख सापडतो. हे चालुक्यांच्या राजधानीचे ठिकाण होते.

विद्यमान राजमहेंद्रीत जुने प्रेक्षणीय राजवाडे, किल्ल्यांच्या तटबंदी, भिंती याचें अवशेष आढळतात. प्रशिक्षण महाविद्यालय, कला महाविद्यालय आणि अनेक महत्त्वाच्या शैक्षणिक संस्था यामुळे शैक्षणिक दृष्ट्या हे महत्त्वाचे केंद्र आहे. अनेक ख्यातनाम कवी, कलावंत, लेखक, समाजसुधारक यांचे राजमहेंद्री हे जन्मस्थान आहे. १८६६ साली येथे नगरपालिकेची स्थापना झाली. १८६४ मध्ये स्थापन झालेला राज्यातील मोठा मध्यवर्ती तुरुंग येथे आहे. लोहमार्ग-जलमार्ग यांतील दळणवळणाच्या दृष्टीने हे मध्यवर्ती व महत्त्वाचे केंद्र आहे.

येथे मध्यवर्ती तंबाखू संशोधन केंद्र आहे. येथून तांदूळ, नारळ, फळे, कागद, खनिज तेल, कापड, लाकूड, सिगारेटी इत्यादीचा व्यापार चालतो. कलाकुसरयुक्त मातीची भांडी, लाकडी फर्निचरचे तऱ्हेतऱ्हेचे प्रकार यांसाठी राजमहेंद्री प्रसिद्ध आहे. ही लाकडाची मोठी बाजारपेठ असून सु. एक कोटी रु.ची येथे उलाढाल चालते. तंबाखू उद्योग तसेच लाकूड, कापड, कागद यांच्या गिरण्या यांमुळे हे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनले आहे. ‘प्रकृती विद्याश्रम’ हे निसर्गोपचार केंद्र व क्षयरोग उपचार केंद्र येथे आहे.

राजमंहेद्री हे धार्मिक दृष्ट्याही महत्त्वाचे आहे. मार्कंडेय व कोटिलिंगेश्वर यांची देवालये येथे आहेत. बनारसला जाणारे भाविक येथील कोटिलिगंम् घाटावर गोदावरी स्नानासाठी येतात. विशेषतः बारा वर्षांनी एकदा प्रकट होणाऱ्या गोदावरी पुष्करमच्या स्नानासाठी भाविक श्रध्देने येथे येतात. पर्यटंकासाठी येथे आकर्षक निवासस्थानांची सोय आहे.

पंडित, भाग्यश्री