कावासाकी : जपानच्या मध्य होन्शू प्रांतातील कानागावा जिल्ह्याचे मुख्य ठाणे जपानचे महत्त्वाचे औद्योगिक शहर आणि बंदर. लोकसंख्या ९,७३,४८६ (१९७०). टोकिओ-योकोहामाच्या औद्योगिक दृष्टया विकसित भागात हे वसले असून, किहीन औद्योगिक वसाहतीचे मुख्य केंद्र हेच आहे. दुसऱ्या महायुध्दात हे पूर्णतः उद्ध्वस्त झाले पण आता याची पुनर्रचना करण्यात आली आहे. याच्या किनारी भागात भारी उद्योगधंदे, मध्यभागी यंत्रे व यांत्रिक अवजारांचे कारखाने आणि वायव्य भागात रासायनिक कारखाने आहेत. कोबो डैशी या देवतेचे प्रसिद्ध गेंजी मंदिर येथेच आहे.

ओक, द.ह.