हंपी : (विजयानगर ). कर्नाटक राज्यातील एक पुरातत्त्वीय अवशेषांचे स्थळ व मध्ययुगीन विजयानगर साम्राज्याच्या राजधानीचे गाव. हे एक पौराणिक व ऐतिहासिक पुण्यक्षेत्र असून तत्संबंधी अनेक पौराणिककथा-वदंता आढळतात. ते बेल्लारी जिल्ह्यात होस्पेटच्या उत्तरेस सु. १० किमी. वर तुंगभद्रा नदीच्या खोऱ्यात वसले आहे. येथील पंपानामक सरोवरावरून हंपी हे नाव पडले असावे कारण हंपी हे पंपाचे कन्नड अपभ्रंश रूप होय. येथील प्रमुख ग्रामदैवतास – विरूपाक्षास – पंपापती म्हणतात. हरिहर व बुक्क या विजयानगर साम्राज्याच्या संस्थापकांनी आपले गुरू विद्यारण्यस्वामी (माधवाचार्य) यांच्या नावावरून त्यास विद्यानगर असेनाव दिले होते पण विजयानगर असे नाव रूढ झाले. हंपीविषयीचीमाहिती होयसळ वंशाचे कोरीव लेख तसेच निकोलो दी काँती (इटली-१४२०), नूनीश, डोमिंगो पायीश (पोर्तुगाल-१५२०), ⇨ अब्दअल्रझाक (इराण-१४४२) व बार्बोसा या परकीय प्रवाशांच्या प्रवासवृत्तांतून मिळते. हंपीचे क्षेत्रफळ सु. १६४ चौ. किमी. असून त्याभोवती अंतरा-अंतरावर मजबूत सात तट होते. कडेच्या तीन तटांत शेती होती आणि आतील चार तटांत बालेकिल्ला, राजप्रासाद, मंदिरे, बाजार आणि सरदार व सामान्य लोकांच्या वास्तू होत्या. पायीश म्हणतो, ‘हंपी रोम शहरा-एवढे मोठे शहर होते. तेथील राजवाड्यांनी लिस्बन (पोर्तुगाल) येथील किल्ल्याएवढी जागा व्यापली होती. शहरात सुरेख उत्तुंग प्रवेशद्वारे( गोपुरे ), रुंद रस्ते, फळबागा, व्यापारी पेठा आणि मंदिरे यांमुळे शोभा आली असून सर्व सुविधा उपलब्ध होत्या.’

हंपी

विजयानगरच्या कमलपुरा ते हंपी रस्त्याकडेने इतस्ततः विखुरलेले शेकडो पुरातत्त्वीय अवशेष आढळतात. त्यांपैकी हंपीची प्रसिद्ध बाजारपेठ (३२×७३१.५ चौ. मी. क्षेत्र) असून तिच्या बाजूने घरे होती. परकीय प्रवाशांच्या मते, या बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त हिरे, मोती, माणिक इ. मूल्यवान खड्यांचे ढीग असत व उत्तमोत्तम जरतारी रेशमी कापड असे. त्याच्या पूर्वेस नंदीची भव्य मूर्ती व चालुक्य शैलीत बांधलेला मंडप होता तर पश्चिमेला अगदी कोपऱ्यात पंपापती किंवा विरूपाक्ष मंदिर असून त्याचे पूर्वेकडील गोपूर ३६ मी. उंच आहे. त्यात तीन गर्भगृहे असून अनुक्रमे शिव, पंपा व भुवनेश्वरी यादेवतांच्या मूर्ती आहेत. या मंदिराचा काही भाग विजयानगरपूर्व प्राचीन असून तेथील एका शिलालेखानुसार तो ११९९ मध्ये नागवंशातील कालीदेव राजाच्या कारकिर्दीत कुरुगोडूनामक गृहस्थाने बांधल्याचा उल्लेख आहे. पुढे विजयानगरच्या राजांनी त्याचा विस्तार केला व गोपुरे बांधली. विरूपाक्ष हे विजयानगरच्या राजांचे कुलदैवत होते. ही चालुक्य शैलीतील वास्तू सोडता विजयानगर वास्तुशैली या नावाने रूढ झालेली द्राविड वास्तुशैलीची एक उपशैली या काळात अस्तित्वात आलीआणि विकसित झाली. हा हिंदू वास्तुशैलीच्या मंदिरबांधणीचा अखेरचा आविष्कार होय.

या वास्तुशैलीचे दोन ठळक भाग पडतात. धर्मातीत वास्तू आणि धार्मिक-मंदिर वास्तू . राजवाडे, मनोरे, सिंहासन, किल्ले, जलसेतू इ. काही अवशिष्ट धर्मातीत वास्तू होत. येथे राजवाड्यांच्या जोत्यांशिवाय आणि सिंहासनाच्या दोन व्यासपीठांव्यतिरिक्त अन्य फार थोडे अवशेष शिल्लक आहेत. यांतील राजदरबारगृह मोठे असून त्यात सिंहासन आहे. अब्दअल्- -रझाकच्या मते, ही इमारत बालेकिल्ल्यातील सर्वांत उंच इमारत होती. सिंहासनाच्या बाजूंवर अलंकृत मूर्तिकाम आहे. तसेच प्रवेशद्वारावर आणि सिंहासनाच्या मार्गावरील भिंतीवर मूर्तिकाम आढळते. या वास्तू-जवळच कमल महाल, हत्तींच्या पागा, मनोरे, जनानखाना इत्यादींचे जीर्णशीर्ण अवशेष आढळतात. धर्मातीत वास्तूंत इस्लामी पद्धतीच्या कमानी व मूलगामी स्थानिक वास्तुकलेचे पारंपरिक सज्जे यांचे समतोल मिश्रण आढळते. काही ठिकाणी भित्तिचित्रांचे नमुने आढळतात. त्यांपैकी त्रिपुरांतक कथा आणि द्रौपदी स्वयंवर ही दृश्ये विजयानगर शैलीची उत्कृष्ट उदाहरणे होत.

धार्मिक-मंदिर वास्तूंत येथील पंपापती (विरूपाक्ष), कृष्णस्वामी, विठ्ठलस्वामी आणि हजार रामस्वामी ही प्रमुख अवशिष्ट मंदिरे असून त्यांपैकी कृष्णस्वामी, विठ्ठलस्वामी व हजार रामस्वामी ही मंदिरे व गोपुरे ⇨ कृष्णदेवराय (कार.१५०९-२९) या प्रसिद्ध राजाने बांधली. यांपैकी हजार रामस्वामी व विठ्ठलस्वामी ही मंदिरे एकाच समविधानाचीव उत्थित शिल्पांनी अलंकृत असून हजार रामस्वामीमंदिरातील मंडपाच्या आतील भिंतींवर रामायणातील कथांचे शिल्पांकन आहे. त्यात गर्भगृह व मंडप ही दालने जोडलेली असून अम्मान मंदिर स्वतंत्र आहे. पूर्वेकडील गोपुरातून प्रवेशद्वार आहे. ते राजप्रासादाजवळ असल्यामुळे राज-घराण्यातील स्त्री-पुरुषांचे ते नियमित दर्शनाचे स्थान असावे. त्याच्या आग्नेयीस एक नागरी इमारत होती. ती रझाकच्या मते, दिवाणखानाकिंवा शासकीय काऱ्यालय असावे. तिच्या नजीकच हत्तींच्या तबेल्याच्या पूर्वेस दोन छोटी भग्नावस्थेतील जैन मंदिरे असून आग्नेयीस रंगनाथमंदिर आहे. त्यात हनुमानाची सु. तीन मीटर उंचीची मूर्ती आहे.याच्या नैर्ऋत्येस पट्टनाडा येल्लम्मा या ग्रामदेवतेचे छोटे मंदिर आहे. विठ्ठलस्वामी मंदिर पूर्वाभिमुख असून त्याचे बांधकाम अपूर्ण आहे.त्याच्या पूर्व, दक्षिण व उत्तरेस भव्य गोपुरे आहेत. मूळ मंदिर तीन दालनांत विभागलेले असून उघडा मंडप भिन्न प्रकारच्या कलाकुसरयुक्त अलंकृत स्तंभांनी व्यापला आहे. या मंडपात काही संगीत स्तंभ (म्यूझिकपिलर्स) असून त्यांवर दगडी कपार वा टिचकी मारली असता संगीत-ध्वनी निर्माण होतात. मंदिरातील तुळया, छत, देवळ्या, छज्जे यांतूनकोरीव काम आढळते. अम्मान मंदिर, कल्याण मंडप, मंदिरासमोरीलअलंकृत दगडी रथ इत्यादींतून भव्यतेचा प्रत्यय येतो. येथील दगडीरथावर सुरेख गरुडाची मूर्ती आहे. द्राविड वास्तुशैलीची सर्व वैशिष्ट्येयेथे आढळतात. गोपुरांवर चुनेगच्चीतील मूर्तिकाम असून एकूण मंदिर वास्तुशैली भव्य व दिमाखदार आहे. हंपी येथील स्वतंत्र मूर्तींत नरसिंह (६.७५ मी. उंच) आणि गणेश या प्रसिद्ध मूर्ती आहेत. नरसिंहाच्या मूर्तीखाली शिलालेख असून तो १५२४ मध्ये कृष्णदेवरायाने एकसंध दगडात खोदून घेतला, असा उल्लेख आहे. येथील काही मंडपांच्यापीठांवर कोरीव शिल्पपट्ट असून त्यांत अश्वारूढ सैनिक, हत्तीचीमिरवणूक, नृत्यांगना, संगीतकारांचे जथे आणि कोलाट्टम हे लोकनृत्य दाखविले आहे. हंपीच्या कमलपुरा या उपनगरात पुरातत्त्वीय शासकीय संग्रहालय असून त्यातील काही दुर्मीळ अवशेषांमध्ये सती (वीरकल) व वीरगळ यांचा अंतर्भाव आहे.

पहा : विजयानगर साम्राज्य.

संदर्भ : 1. Dallapiccola, A. L. Verghese, A. Sculptures at Vijayanagara : Iconography and Style, New Delhi, 1998.

2. Michell, G. Wagoner, P. B. Vijayanagara : Architectural Inventory of The Sacred Centre, New Delhi, 2001.

3. Settar, Shadakshari, Hampi : A Medieval Metropolis, Dharwad, 1990.

4. Sewel, Robert, A Forgotten Empire, 1977.

५. देशपांडे, सु. र. भारतीय शिल्पवैभव, आवृ. २ री, पुणे, २०१३.

देशपांडे, सु. र.

Close Menu
Skip to content