श्रीशैलम् : आंध्र प्रदेश राज्यातील तीर्थक्षेत्र व बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक प्रसिद्ध पीठ. ते कुर्नूल जिल्ह्याच्या नंदीकोटकूर तालुक्यात कृष्णा नदीच्या पूर्वकाठावरील एका पर्वतावर सस.पासून सु. ४६९ मी. उंचीवर वसले आहे. हैदराबादच्या दक्षिणेस सु. २३२ किमी.वरील हे ठिकाण चारही दिशांना उंच शिखरांनी वेढले आहे. येथे श्रीशैलम्जाण्यासाठी चार व्दारे असून त्यांना त्रिपुरांतक (पूर्व), आलमपूर (पश्चिम), सिद्धवट (दक्षिण) आणि महेश्वर (उत्तर) अशी नावे आहेत. श्रीशैलम्‌ला मलै (पर्वत) किंवा नल्लमलै (नीलमलाई) म्हणतात. या स्थानासंबंधी अनेक पुराणकथा व आख्यायिका प्रचलित आहेत. त्यांपैकी एक कथा येथील भिंतीवर कोरलेली आहे. दुसऱ्या एका कथेनुसार विष्णुपत्नी ‘ श्री ’ हिने ऋषिकन्या बनून या पर्वतावर तप केले. शिव तिला प्रसन्न झाला. या पर्वताशी माझे नाव कायमचे निगडित असावे, असा तिने वर मागितला. शिव ‘तथास्तु’ म्हणाला. तेव्हापासून हे स्थान ‘ श्रीपर्वत ’ वा ‘ श्रीशैलम् ’ म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील स्वयंभू शिवलिंगाचा शोध चंद्रावती नामक राजकन्येला लागला. तिच्या विनंतीवरून तिने वाहिलेल्या मल्लिका व अर्जुन यांच्या फुलांची माळ शिवाने मस्तकी धारण केली, म्हणून येथील शिवलिंग ‘ मल्लिकाजुन ’ नावाने प्रसिद्ध झाल्याची कथा प्रचलित आहे. आणखी एका आख्यायिकेनुसार शिवाने येथील चेंचू जमातीतील तरूणीशी लग्न केले. साहजिकच तो चेंचू जमातीचा जावई झाला. या संबंधामुळे चेंचू लोक स्वत:ला देवस्थानाचे रक्षक मानतात. उत्सवात ते देवाचा रथ ओढतात.

मल्लिकार्जुन मंदिराच्या मागे भ्रमरांबाचे मंदिर आहे. येथे सतीचा म्हणजे पार्वतीचा कंठ गळून पडला, म्हणून हे शक्तिपीठ झाले. भ्रमरीच्या रूपात तिने महिषासुराला मारले, म्हणून तिला भ्रमरांबा म्हणतात.

मल्लिकार्जुन मंदिराच्या भोवती भव्य दगडी तटबंदी (१८० मी. x १५० मी. x ७.५ मी.) आहे. भिंतीच्या बाहेरील बाजूवर शिल्पांकन असून त्यात शैव पुराणातील कथा, देव-देवतांच्या मूर्ती, कामशिल्पे इ. अलंकरण आहे. येथील धातूच्या मूर्तीं पैकी शिव-पार्वती, सोमस्कंद, नटराज व गणपती यांच्या मूर्ती उल्लेखनीय आहेत. मुख्य मंदिराच्या चारही बाजूंस गोपुरे आहेत. त्यांपैकी उत्तर द्वाराची गोपुरे शिवाजी महाराजांनी बांधली असून त्यांना ‘ शिवाजी गोपुरम् ’ म्हणतात. त्यांच्या उत्तरेला अर्ध्या किमी.वर महाराजांनी एक मंदिर बांधले होते. ते कालौघात पडले. तेथे महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेऊन केंद्र शासनाच्या मदतीने १९९९ मध्ये ‘ शिवाजी स्फूर्तिकेंद्र ’ ही स्मारक-वास्तू बांधली आहे. मुख्य मंदिराचे शिखर गोपुरांपेक्षा अधिक उंच आहे. विजयानगरच्या दुसऱ्या हरिहरने या मंदिराची पुनर्रचना केली. मुख्य मंदिराच्या बांधकामाविषयी कालनिश्चिती नाही. तज्ज्ञांच्या मते ते इ. स. आठव्या-नवव्या शतकात केव्हातरी बांधले असावे. इतर काही लहान मंदिरांपैकी वृद्ध मल्लिकार्जुनाचे मंदिर मागील बाजूस आहे. येथील प्रत्येक मंदिराचे पुजारी वेगवेगळ्या जातींचे आहेत. मुख्य मंदिराचे पुजारी लिंगायत असल्यामुळे मल्लिकार्जुनाला ‘ लिंगचकवर्ती ’ असेही म्हणतात. मंदिराच्या परिसरात वीरशैवांचे अनेक मठ असून त्यांतील पंडिताराध्याचा मठ प्रसिद्ध आहे. पंडिताराध्य हा वीरशैवांच्या पंचाचार्यांपैकी एक होता. याशिवाय श्रीशैलम् हे मध्ययुगात तांत्रिक धर्माचे प्रमुख केंद्र होते. मंत्रयान व वज्रयान या बौद्ध संप्रदायांचा उगम येथेच झाला. ⇨कापालिकां चे (एक शैवपंथ) येथे वास्तव्य होते. तद्‌वतच शैव आणि शाक्त तांत्रिकांनीही या पर्वतावर बस्तान बसविले होते.

मंदिराच्या उत्तरेला कल्याणमंडप असून त्यात शिव-पार्वतीच्या उभ्या मूर्ती आहेत. उत्सवप्रसंगी त्यांचा लग्नसोहळा साजरा करतात. मंदिरासमोर स्वतंत्र नंदीमंडप असून त्यात नंदीची भव्य मूर्ती आहे. परिसरात अनेक तीर्थकुंड आहेत. मुख्य मंदिराच्या पूर्वद्वारातून कृष्णा नदीकडे उतरण्यासाठी सु. ८५२ पायऱ्यांचा रस्ता आहे. येथे कृष्णा एका खोल दरीतून वाहते. तिला पाताळगंगा म्हणतात. मुख्य मंदिराच्या जवळपास असलेल्या मंदिरांपैकी अंबाजी हे देवीमंदिर शक्तिपीठ मानले जाते. तसेच दहा किमी. वरील हाटकेश्वर व बिल्वबनातील एकम्मा देवीचे मंदिर आणि साक्षी गणपती मंदिर ही उल्लेखनीय आहेत. महाशिवरात्रीला श्रीशैलम् येथे मोठा उत्सव साजरा करतात. शिवरात्रीच्या अगोदर पाच दिवस या उत्सवाचा प्रारंभ होतो आणि तो वैशाख महिन्यापर्यंत चालतो. याच कालावधीत भ्रमरांबाचाही उत्सव होतो. या यात्राकाळात हजारो भाविक जमतात.

येथील ‘ शिवाजी स्फूर्तिकेंद्रा ’च्या भव्य दुमजली वास्तूत प्रशस्त सभागृह आहे. त्यात छत्रपतींची सिंहासनारूढ ३.५ मी. उंचीची ब्रॉझची मूर्ती आहे आणि चारही बाजूंना शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंगांवर काढलेली छायाचित्रे लावली आहेत. शिवाय केंद्रात आदिवासींसाठी मोफत होमिओपॅथी चिकित्सालय, फिरते रूग्णालय व एक वनौषधी रोपवाटिका असून भविष्यात तेथे आयुर्वेद संशोधन, योगविदया कार्यशाळा, साहित्य प्रकाशन वगैरे प्रकल्प कार्यान्वित करण्याचा शासनाचा विचार आहे. येथून जवळच सु. १३ किमी.वर ५१२ मी. लांबीचे श्रीशैलम् हे धरण कृष्णा नदीवर बांधण्यात आले असून बहु-उद्देशीय प्रकल्प म्हणून त्याचा मोठया प्रमाणात उपयोग झाला आहे. याच्या परिसरातील निसर्गसौंदर्य, श्रीशैलम् अभयारण्य (व्याघ प्रकल्प), घनदाट जंगल यांमुळे आंध्र प्रदेश शासनाने हे स्थळ पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित केले आहे.

देशपांडे, सु. र.