पाली : कुलाबा जिल्ह्याच्या सुधागड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान व तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या ४,५२३ (१९७१). हे खोपोलीच्या दक्षिण नैर्ऋत्येस खोपोली-नागोठणे या रस्त्यावर खोपोलीपासून सु. ३८ किमी.वर आहे. पालीच्या पूर्वेस सारसगड किल्ला आहे. येथील बल्लाळेश्वर महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक असून, त्याचा उल्लेख गणेश व मुद्‍गल पुराणांत आढळतो. या स्थानाविषयी अनेक आख्यायिका सांगतात. कृतयुगात कल्याणश्रेष्ठी वाण्याच्या बल्लाळ नावाच्या मुलाने बल्लाळेश्वर गणेशाची स्थापना करून त्यावर लाकडी मंदिर उभारले. १७७० मध्ये श्रीमंत बाबुराव फडणीस व मोरोबादादा फडणीस या पितापुत्रांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला.

बल्लाळेश्वर मंदिर,पाली

मंदिर पूर्वाभिमुख असून बल्लाळेश्वर मूर्ती एक मीटर उंचीची, रुंद, सोंड डावीकडे झुकलेली, नाभीत व नेत्रांत हिरे बसविलेली अशी आहे. ही मूर्ती मुरूडवरून येथे आणण्यात . चिमाजी अप्पाने १७३९ मध्ये वसई जिंकून तेथून आणलेली पोर्तुगीज चर्चची घंटा या मंदिरात ठेवलेली आहे. मुख्य मंदिराच्या मागील बाजूस ढुंढी विनायकाचे मंदिर असून त्यातील मूर्ती स्वयंभू आहे. येथे भाद्रपद व माघ शुद्ध चतुर्थ्यांना गणपतिउत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्या वेळी महाराष्ट्रातून असंख्य भाविक लोक या ठिकाणी दर्शनास येतात. मुंबई व पुणे येथून पालीस राज्य मार्ग परिवन महामंडळाच्या बसगाड्यांची नियमित वाहतूक चालते. येथे डाक व तार कार्यालय, शाळा, दवाखाने, वाचनालय इ. सोयी आहेत.

कांबळे, य, रा. सावंत, प्र. रा.